Tuesday, 18 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.06.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 June  2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ जून २०१९ दुपारी .०० वा.
****

 शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या आमदारांनी आज मुंबईत विधीमंडळ परिसरात निदर्शनं केली. 

 महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी खुप मोठ्या संकटात सापडल्याचं नमुद करत या आमदारांनी सलग दुसऱ्या दिवशी हे आंदोलन केलं. सरकार विरोधी पक्षांच्या कोणत्याही मागणीकडे लक्ष देत नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.  विरोधी पक्षातील नेते अजित पवार, धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं.

 दरम्यान, आज विधिमंडळात चालू आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. काल राज्याचा २०१८-१९ चा आर्थिक पाहणी अहवाल विधान सभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर विधान परिषदेत अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सादर केला.
****

 सतराव्या लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आजही सुरु आहे. काल संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही सदस्यांचा शपथविधी झाला. उर्वरित सदस्यांना आज शपथ दिली जात आहे.

दरम्यान, लोकसभेच्या या सत्रात उद्या लोकसभा अध्यक्षांची निवड होईल, परवा गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन्ही सदनांच्या संयुक्त सभेला संबोधित करतील. तर येत्या पाच जुलैला, चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.
****

 भाजपचे खासदार ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदाचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असतील. ते राजस्थानच्या कोटा इथून दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. लोकसभा अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.
****

 जम्मू-कश्मीरमधे अनंतनाग जिल्ह्यात मरहमा बिजबेहडा इथं आज पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलांदरम्यानच्या चकमकीत एक जवान शहीद झाला तर दोन दहशतवादी मारले गेले आहेत. लष्कराचा आणखी एक जवान यात जखमी झाला आहे. दहशतवादी जैश ए मोहम्मदशी संबंधित आहेत. मारला गेलेल्यातील एकाचं नाव सज्जाद भट्ट असून तो गेल्या फेब्रुवारीत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर हल्ल्यासाठी वापण्यात आलेल्या वाहनाचा मालक आहे. त्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते.  दरम्यान, अरिहाल पुलवामामधील स्फोटात काल जखमी झालेले दोन जवान आज  शहीद झाले. एका वाहनात विस्फोटकं ठेऊन हा स्फोट घडवण्यात आला होता. त्यात किमान नऊ सैनिक आणि एक नागरिक जखमी झाला आहे.
****

 छत्तीसगडमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी आज ठार झाली. धमतारी जिल्ह्यात रायपूरपासून सुमारे १२० किलोमीटर अंतरावर सकाळी सहा वाजता ही चकमक झाली. विशेष कृती दलाचं एक पथक या भागात दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईसाठी मोहीमेवर होतं, त्यावेळी या अज्ञात महिला नक्षलवाद्याला ठार करण्यात आल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****

 देशभरातल्या सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना संरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं आज पुढं ढकलली आहे. पश्चिम बंगाल आणि तर राज्यात सरकारी रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांनी संप मागं घेतल्यानं या याचिकेवर तत्काळ सुनावणीची गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या संदर्भात केंद्र सरकारला नोटीस काढण्याची गरज नाही परंतु आरोग्य सेवकांच्या सुरक्षेबाबत काळजी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे.
****

 कैलास मानसरोवर यात्रेचा दुसरी तुकडी काल उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यातून पुढील प्रवासासाठी धारचूलाला रवाना झाली असून यात ४५ भाविक आहेत. दरम्यान,जम्मू काश्मीर इथं सुरू असलेल्या वैष्णव देवीच्या पवित्र गुहेत पंधरा जूनपर्यंत सुमारे 32 लाख 76 हजार भाविकांनी पवित्र गुहेत दर्शन घेतल्याचं वृत्त आहे.
****

 अमरावती जिल्ह्यातील सव्वाशे ग्रामपंचायतीच्या होत असलेल्या पोटनिवडणुकीत राखीव प्रभागात जात वैधता प्रमाणपत्रा अभावी १२८ जागा रिक्त राहिल्या आहेत. विविध ठिकाणी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं चाळीस सदस्य बिनविरोध निवडून आले आहे. एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल असलेल्या एकोणीस जागांसाठी तेवीस जून रोजी मतदान होणार आहे. जुलै ते सप्टेंबर 2019 या दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालूक्यातील भिमा नदी पात्रामध्ये वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करून चार ट्रॅक्‍टर, ट्रॉली आणि वाळू असा सुमारे तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे नोंदवले आहेत.
*****
***

No comments:

Post a Comment