Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18
June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्याचा वीस हजार २९२ कोटी ९४ लाख रुपये तुटीचा अतिरिक्त
अर्थसंकल्प विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर विधानपरिषदेत दीपक केसरकर
यांनी आज सादर केला. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रीलियन डॉलर म्हणजे ७० लाख कोटी रुपये करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुनगंटीवार
यांनी सभागृहात सांगितलं. या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा तीन लाख १४ हजार ६४० कोटी
१२ लाख रुपये आणि महसुली खर्च तीन लाख ३४ हजार ९३३ कोटी सहा लाख रुपये अंदाजित केलेला
आहे.
दरम्यान, अर्थसंकल्प समाज माध्यमांतून फुटल्याचा आरोप
करत विरोधी पक्ष विधानसभेतून सभात्याग केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप
फेटाळून लावला आहे. गृहनिर्माण विभागासाठी यात सात हजार १९७ कोटी ६८ लाख ३४ हजार रुपयांची
तरतूद प्रस्तावित असल्याचं मुनगंटीवार यांनी जाहीर केलं. ऐंशीटक्के दिव्यांगांसाठी
शासन घरकूल बांधून देणार असून यासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली
आहे. ज्येष्ठ, निराधार, दिव्यांग आणि विधवा या सर्व दुर्बल घटकांसाठी संजय गांधी निराधार
अनुदान योजना तसंच श्रावणबाळ योजनेअंतर्गत अर्थसहाय्यात वाढ करण्यात आली असून दरमहा
एक हजार रूपये आता देण्यात येतील. यासाठी सुमारे एक हजार ५०० कोटी रुपये इतका आर्थिक
भार शासनावर येणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. धनगर समाजाच्या कल्याणासाठी
एक हजार कोटी रुपयांची तरतूद तसंच धनगर समाजातील बेघरांसाठी दहा हजार घरकूल बांधून देण्याची घोषणा त्यांनी यावेळी
केली. ओबीसी मुलांच्या वसतिगृहासाठी २०० कोटींची तरतूद केल्याचं सांगितलं. विभागीय
आणि जिल्हा क्रीडा संकुलाचा कायापालट करण्यासाठी ३०० कोटी खर्च करण्याचे प्रस्तावित
असून त्यापैकी दिडशे कोटी रूपये चालू वर्षात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. औरंगाबाद
जिल्हयात करोडी इथं राज्यस्तरीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असून वाळूज
इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिडांगण उभारण्याचं विचाराधीन असल्याचं अर्थमंत्र्यांनी
जाहीर केलं. इयत्ता पाचवी ते दहावीत शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींसाठी क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांच्या नावानं शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय झाल्याची
माहितीही अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
एकात्मिक पाणी पुरवठा - वॉटर ग्रीड - प्रकल्पाच्या
माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक गावात नळाद्वारे पिण्याचं पाणी देण्यात येणार आहे,
असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.
परभणी शहराला पाणी पुरवठा करण्याबाबत सदस्य जयप्रकाश मुंदडा यांनी प्रश्न विचारला होता.
राज्यात दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागात प्रती व्यक्ती वीस लिटर पाणी दिलं जातं
असून त्यात वाढ करण्यासाठी आढावा घेण्यात येईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान,
परभणी शहराला पाणी पुरवठ्याच्या योजना सप्टेंबर अखेर पूर्ण करण्यात येतील आणि शहरातील
नागरिकांना प्रति व्यक्ती एकशे पस्तीस लिटर पाणी दिलं जाईल, असं एका उपप्रश्नाला उत्तर
देताना नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी सांगितलं.
****
दरम्यान, अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांचा
भाग दोन अर्ज भरून घेणं आणि पुढील प्रक्रिया उद्यापासून सुरू करण्यात येणार असल्याची
माहिती शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली.
****
बीड जिल्ह्यात गर्भाशयं काढून टाकण्याच्या अनेक शस्त्रक्रीया
झाल्याच्या प्रकारांची राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील
समिती मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज
विधान परिषदेत ही माहिती दिली. शिवसेना सदस्य निलम गोरे यांनी हा प्रश्र्न उपस्थित
करताना बीड जिल्ह्यातील काही उस तोडणी कामगार महिलांनी कामात अडथळा ठरत असल्यामुळं गर्भाशयं काढून टाकण्याच्या शस्त्रक्रीया केल्याची
माहिती दिली होती.
****
भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्याच्या धर्मापुरी
गावालगत एक खासगी प्रवासी वाहतूक करणारं वाहन आज दुपारी पुलावरून ८० फुट खोल नदीत पडल्यानं
झालेल्या अपघातात सहा जण ठार झाले असून अन्य सहा प्रवासी गंभीर झाले आहेत. मृतांमध्ये
पाच मुली आणि एका महिलेचा समावेश असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील सुतगिरणीत काम करणाऱ्या
महिला कामगारांच्या रिक्षाला झालेल्या भिषण अपघातात तीन महिला कामगार ठार तर सात गंभीर
जखमी झाल्या आहेत. आज सकाळी शिरपूर जवळ रिक्षाला मालवाहू कंटेनरनं धडक दिल्यानं ही
दुर्घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment