Wednesday, 19 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.06.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ जून २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  राज्याचा वीस हजार दोनशे ब्याण्णव कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर
Ø  अर्थसंकल्प फुटल्याचं सांगत विरोधकांचा सभात्याग; आरोप निराधार - मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा
Ø  मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला सिंगापूर इथल्या कंपनीकडून अर्थसहाय्य
Ø  वाहन चालक परवान्यासाठी किमान शैक्षणिक पात्रतेची अट रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय 
आणि
Ø  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज पुरस्कार मारंभपूर्वक प्रदान
****

 राज्याचा वीस हजार दोनशे ब्याण्णव कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये तुटीचा अतिरिक्त अर्थसंकल्प काल विधिमंडळात सादर झाला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत, तर विधानपरिषदेत अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात कृषीसिंचनासाठी दोन हजार सातशे वीस कोटी रुपये तरतूद आहे. राज्यातल्या चार कृषी विद्यापीठांसाठी सहाशे कोटी रुपये, जलसंपदा विभागासाठी बारा हजार पाचशे सत्त्याण्णव कोटी, जलयुक्त शिवार योजनेसाठी आठ हजार नऊशे शेहेचाळीस कोटी, कृषी उच्चदाब वीज पुरवठ्यासाठी पाच हजार कोटी, आरोग्य दहा हजार पाचशे एक्क्याऐंशी कोटी, रस्ते विकास सुमारे अठरा हजार कोटी, नगरविकास पस्तीस हजार कोटी, सामाजिक न्याय विभागासाठी बारा हजार तीनशे तीन कोटी, तर गृहनिर्माण विभागासाठी सात हजार एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.

 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी शासन लवकरच निर्णय घेत असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं. या योजनेतून आतापर्यंत पन्नास लाख सत्तावीस हजार खातेदारांसाठी चोवीस हजार एकशे दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यत निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली.

 ज्येष्ठ, निराधार, दिव्यांग आणि विधवा या सर्व दुर्बल घटकांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना तसंच श्रावणबाळ योजनेअंतर्गत अर्थसहाय्यात वाढ करण्यात आली असून दरमहा एक हजार रूपये आता देण्यात येतील.

 ऐंशी टक्के अपंगत्व असलेल्या दिव्यांगांसाठी शासनाकडून घरकुल उभारणी, इयत्ता पाचवी ते दहावीच्या इतर मागास प्रवर्गातल्या मुलींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, पर्यटन पोलिस योजना, २५ लाख गावं टंचाईमुक्त करण्याचा निर्धार, ग्रामविकासासाठी खादी ग्रामोद्योग मार्फत बारा बलुतेदारांसाठी प्रोत्साहन योजना, तसंच आदी घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या.

 नवीन औद्योगिक धोरणांतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग पार्क उभारण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. सध्या पथदर्शी प्रकल्प म्हणून पन्नास तालुक्यात अशा पार्क उभारल्या जाणार असून, त्यासाठी तीनशे कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. धनगर समाजाच्या कल्याणासाठी एक हजार कोटी तर इतर मागास प्रवर्गातल्या मुलांच्या वसतिगृहासाठी दोनशे कोटी रुपये तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

 बीड इथल्या कपिलधार आणि अमळनेर इथल्या सखाराम महाराज संस्थानसह तीर्थक्षेत्र विकासासाठी पन्नास कोटी, अटल आनंदवन योजनेसाठी तीस कोटी, तीर्थक्षेत्र बसस्थानक आधुनिकीकरणासाठी शंभर कोटी, सरपंच मानधन वाढीसाठी दोनशे कोटी, एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेसाठी १४० कोटी, अल्पसंख्याक महिला आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शंभर कोटी, विभागीय आणि जिल्हा क्रीडा संकुलाचा कायापालट करण्यासाठी तीनशे कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
 औरंगाबाद जिल्हयात करोडी इथं राज्यस्तरीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असून वाळूज इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिडांगण उभारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
 इतर मागासवर्गीय महामंडळासाठी दोनशे कोटी रुपये तरतूद करत असल्याचं, अर्थमंत्र्यांनी सांगितलं.  व्यावसायिकांसाठी या अर्थसंकल्पात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

 दरम्यान, अर्थसंकल्प सामाजिक संपर्क माध्यमांतून फुटल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सदस्यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सदनात घोषणाबाजी केली. विधानसभेत विरोधकांनी या मुद्यावरून सभात्याग केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प फुटल्याची चर्चा निराधार असल्याचा निर्वाळा दिला. विधान परिषदेत या मुद्यावरून सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं, अर्थसंकल्प सादर होत असताना सदनाचं कामकाज थांबवल्याबद्दल सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांनी सभापतींकडे नाराजी व्यक्त केली.
****

 एकात्मिक पाणी पुरवठा -वॉटर ग्रीड- प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक गावात नळाद्वारे पिण्याचं पाणी देण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. परभणी शहराला पाणी पुरवठा करण्याबाबत सदस्य जयप्रकाश मुंदडा यांनी प्रश्न विचारला होता.

दरम्यान, परभणी शहराला पाणी पुरवठ्याच्या योजना सप्टेंबर अखेर पूर्ण करण्यात येतील आणि शहरातील नागरिकांना प्रति व्यक्ती एकशे पस्तीस लिटर पाणी दिलं जाईल, असं एका उपप्रश्नाला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी सांगितलं.

 दरम्यान, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला सिंगापूर इथली कंपनी अर्थसाहाय्य करणार आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली. मंत्रालयात या कंपनीच्या शिष्टमंडळानं काल लोणीकर यांच्याशी चर्चा करून, अर्थसहाय्य करण्यास मान्यता दिली.
****

 अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांचा भाग दोन अर्ज भरून घेणं आणि पुढील प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आहे. शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी काल ही माहिती विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली.
****

 लोकसभेत कालही उर्वरित नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली. शपथग्रहणानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.

दरम्यान, संसदेच्या या सत्रातउद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन्ही सदनांच्या संयुक्त सभेला संबोधित करतील. तर येत्या पाच जुलैला, चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.
****

 लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे ओमपकाश बिर्ला यांनी काल आपलं निवडणूक अर्ज दाखल केला. लोकसभा अध्यक्षांच्या निवडीची औपचारिक घोषणा आज केली जाणार आहे.

 दरम्यान, काँग्रेस पक्षानं, लोकसभेतल्या पक्षनेतेपदी पश्चिम बंगाल मधले पक्षाचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांची नियुक्ती केली आहे.
**** 

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी असलेली किमान शैक्षणिक पात्रतेची अट काढून टाकण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. या क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी वाढाव्यात, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं, रस्ते वाहतुक मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. यासाठी केंद्रीय मोटार वाहन अधिनियमात सुधारणेची प्रक्रिया मंत्रालयाकडून सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशभरातला सुमारे २२ लाख वाहनचालकांचा तुटवडा दूर होण्याची शक्यता आहे.
****

 नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि दिग्दर्शक वेद राही यांना ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांच्या हस्ते काल नाशिक इथं प्रदान करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना वेद राही यांनी महाभारतात गीता तर महाराष्ट्रातल्या ज्ञानेश्वरीत अद्भुत ज्ञान सामावलं असल्याचं नमूद केलं. यावेळी विद्यापीठाचे बाबुराव बागुल कथा पुरस्कार आणि विशाखा काव्य पुरस्कारही प्रदान करण्यात आले. नांदेड इथले अमृत तेलंग यांना, प्रथम क्रमांकाचा विशाखा काव्य पुरस्कार देण्यात आला.
****

 बीड जिल्ह्यात गर्भाशयं काढून टाकण्याच्या अनेक शस्त्रक्रिया झाल्याच्या प्रकारांची आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत ही माहिती दिली. शिवसेना सदस्य नीलम गोऱ्हे यांनी हा प्रश्र्न उपस्थित केला होता.
****

 हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या गोरेगाव पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याला काल एक हजार रूपये लाच घेतांना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहाथ पकडलं. डी यू शेळके असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. गुन्ह्याचा तपास जलदगतीनं करण्यासाठी आणि आरोपींना लवकर अटक करण्यासाठी शेळके यानं लाच मागितली होती.
****

 जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाकडून जिल्ह्यातल्या ५५५ गावं आणि १२६ वाड्यांना ७०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसंच टंचाई निवारणार्थ ७१४ विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं असल्याचं आमच्य वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे निघालेली, शेगावचे संत श्री गजानन महाराज यांची पालखी काल सकाळी हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यात दाखल झाली. सातशे भाविकांचा सहभाग असलेल्या या पालखीचं ठिकठिकाणी भाविक आणि प्रशासनानं स्वागत केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. संत निवृत्तीनाथांच्या पालखीनं काल त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरकडे प्रस्थान झालं. पालखीचं आज नाशिक शहरात आगमन होणार आहे.
****

 परभणी जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांच्याबद्दल कथित अपशब्द वापरल्याबद्दल शिवसेनेनं निषेध केला आहे. भरोसे यांच्याबद्दल भाजप पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.
****

क्रिकेट
 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल इंग्लंड ने अफगाणिस्तानवर १५० धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत, सहा बाद ३९७ धावा केल्या, अफगाणिस्तानचा संघ मात्र ५० षटकात आठ बाद २४७ धावाच करू शकला. दरम्यान, या स्पर्धेत आज न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका संघात सामना होणार आहे.
*****
***

No comments:

Post a Comment