Wednesday, 19 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.06.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
शेतकऱ्यांसाठी तीन आणि पाच अश्र्वशक्ती विद्युत क्षमता असलेल्या कृषी पंपांना सौर ऊर्जा पद्धतीनं वीज वितरीत करण्यात येणार असून त्याहून अधिक क्षमता असलेल्या कृषी पंपांना पारंपारिक पद्धतीनं वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पंचवीस हजार सौर कृषीपंप महावितरण मार्फत बसवून दिले जाणार आहेत, असंही उर्जा मंत्र्यांनी नसीम खान यांनी विचारलेल्या एका प्रश्र्नाच्या उत्तरात सांगितलं.
****
आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाबाबत येत्या दहा दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री प्रा.अशोक उईके यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत आमदार योगेश घोलप यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
****
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसमोरचे प्रश्न, अडचणी तातडीनं सोडवण्याबाबत प्रयत्न सुरु असल्याचं शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितलं. ज्या‍विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राप्त गुणांबाबत साशंकता असते त्यांच्यासाठी गुणपडताळणी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती देणं आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुर्नमुल्यांकन करणं आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गातून पदव्युत्तर वैद्यकीय तसंच दंत अभ्यासक्रमांसाठी आरक्षण उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीनं शासनकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी आज विधानपरिषदेत दिली. सुमारे दोन हजार वाढीव जागांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला असल्याचंही महाजन यांनी यावेळी नमुद केलं.
****
नाम फाऊंडेशन आणि हिमालय आयुर्वेदिक कंपनीमार्फत मराठवाड्यात कमी पाण्यात आणि नैसर्गिक आपत्तीतही तग धरणारी आयुर्वेदिक उत्पादनं करार शेती पद्धतीनं घेण्यात येणार आहेत. प्रतिष्ठानचे संस्थापक अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात करार शेतीचा प्रारंभ यापुर्वीच करण्यात आला असून कुतूब खेडा आणि केकत जळगाव इथल्या एकूण दहा शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचं परिक्षण करून त्यांच्या शेतीची यासाठी निवड करण्यात आली होती. वर्षभरापासून त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थितीत तुळशीची शेती चांगलं उत्पन्न देत असल्याची माहितीही मकरंद अनासपुरे यांनी दिली. या प्रकल्पात सहभागी शेतकऱ्यांनी यावेळी त्यांची यशकथा सांगितली.
****
पालघर जिल्ह्यात बोईसर- चिल्हार रस्त्यावर आज बस आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात बस चालकासह चारजण जखमी झाले आहेत. बोईसरकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या या बसचा ब्रेक निकामी झाल्यानं ही दूर्घटना झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धुळे शहरात काल रात्री उशिरा सशस्त्र टोळक्यानं गोरक्षक तरुणांवर हल्ला केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. वडजाई रोड परिसरात हा हल्ला करण्यात आला होता. चाळीसगाव रोड पोलिसांत या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
नाशिक शहरातील मुथूट फायनान्सवर गेल्या शुक्रवारी पडलेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी दोघांना गुजरातमधून ताब्यात घेतलं आहे. पप्या आणि जितेंद्र सिंग या दोघांची नावं आहे. उंटवाडी भागातील या दरोड्यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एक कर्मचारी मृत्यूमुखी पडला होता तर दोन जखमी झाले होते. पोलिस या दरोड्याचा आठ पथकं तयार करून तपास करत असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
धुळे जिल्यातील साक्री तालुक्यात विना परवाना उत्पादीत बियाणं विक्रीसाठी ठेवणाऱ्या दहिवेल येथील कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. धुळे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयानं येथून दोन लाख ७३ हजार रुपयांच्या बियाण्यांचा साठा जप्त केला आहे. विनापरवाना बियाणं उत्पादीत करुन शेतकऱ्यांची आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी वेलकम क्रॉप कंपनीचे व्यवस्थापक तसंच कृषी सेवा केंद्राच्या मालकासह चौघांविरुद्ध धुळे पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

No comments:

Post a Comment