Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 20
June 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जून
२०१९ दुपारी १.०० वा.
****
सर्वसमावेशक, बळकट, सुरक्षित
आणि विकसनशील भारत निर्माण करण्याच्या दिशेनं सरकार वाटचाल करत असल्याचं राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांसमोर अभिभाषण करताना म्हटलं
आहे. सर्वांची साथ, सर्वांचा विकास आणि सर्वांचा
विश्र्वास प्राप्त करण्याची प्रेरणा या मागं असून पहिल्या दिवसापासूनच प्रशासनातील
त्रुटींमुळं लोकांना कोणतीही अडचन येऊ नये
या करता आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा पुरवण्यासंदर्भात केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं
राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. या सरकारनं
गेल्या कार्यकाळात केलेल्या कामगिरीचं मूल्यमापण करून लोकांनी या लोकसभेच्या निवडणुकीत
या सरकारला आणखी बळ दिलं असल्याचं ते म्हणाले. यावेळी सुमारे निम्मे खासदार प्रथमच
निवडून आले असून इतिहासात प्रथमच सर्वाधिक महिला खासदार निवडून आल्या आहेत, याकडे राष्ट्रपतींनी
लक्ष वेधलं. देशातील प्रत्येक शेतकऱ्याला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत
मदत मिळणार असल्याचं तसंच लहान दुकानदार, व्यापारी यांच्यासाठी सुरू करण्यात आलेल्या
निवृत्ती वेतन योजनेला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याची माहितीही राष्ट्रपतींनी
आज या अभिभाषणात दिली.
****
सातारा जिल्हातील कोयनानगर इथं आज सकाळी भुकंपाचे दोन
सौम्य धक्के जाणवले. पहिला धक्का सकाळी सात वाजून ४७ मिनिटांनी तर दुसरा धक्का सकाळी
आठ वाजुन २७
मिनिटांनी जाणवला. या भुकंपाची तिव्रता
रिश्टर स्केलवर अनुक्रमे ४ पूर्णांक आठ दशांश आणि तीन रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. या धक्यामुळे काही
भागात लोक घाबरुन रस्त्यावर आले होते. भूकंपाचा केंद्रबिंदु कोयनेपासून ३२ किलोमीटर अंतरावरील देवरुख या गावी
असून यात कोणतीही हाणी झाल्याच वृत्त नसल्याची माहिती
आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
संसदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षांच्या
प्रमुखांची काल नवी दिल्लीत ‘एक देश एक निवडणूक’ या संकल्पनेविषयी चर्चा
करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
झाली. ‘एक देश एक निवडणूक’ या संकल्पनेच्या
विविध पैलूंची पडताळणी करण्यासाठी पंतप्रधान एका समितीची स्थापना
करणार आहेत, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या
बैठकीनंतर वार्ताहरांना दिली. एका निश्चित कालमर्यादेत ही समिती आपला
अहवाल सादर करेल. या संकल्पनेला बहुतांश पक्षांनी पाठिंबा दिला, भाकपा आणि माकपा यांसारख्या काही पक्षांचे याबाबत मतभेद आहेत पण त्यांनी या
संकल्पनेला विरोध केलेला नाही, असही राजनाथ
सिंह यावेळी म्हणाले.
****
भाजप आणि शिवसेना युतीमध्ये सर्व
समसमान असावं, असं शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत शिवसेनेच्या
त्रेपन्नाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. भाजपासोबत ज्या मुद्यांवरून
वाद होता, ते मुद्दे भाजप अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी सोडवल्याचं
ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, भाजपा- शिवसेना युती फक्त
निवडणुकीपुरती नसून, या युतीच्या माध्यमातून राज्य सुजलाम सुफलाम
करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
नांदेड-पनवेल-नांदेड
या विशेष रेल्वेगाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही गाडी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर
आणि ऑक्टोबर या चार महिन्यांत नियमित वेळापत्रकानुसार धावणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
****
बारावीच्या पुनरपरिक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीनं
अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळानं चोवीस जूनपर्यंत मुदतवाढ दिली
आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर ही आवेदनपत्रं भरता येणार आहेत.
****
विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळख असलेल्या अमरावती
जिल्ह्यातील चिखलदरा पर्यटन स्थळावर सोळा जूनपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. चिखलदरा
तालुक्यात ५० पेक्षा अधिक गावांना टँकरनं पाणीपुरवठा होत आहे. या तालुक्यातील मोठा या गावी
विहिरीत सोडलेले टँकरचं पाणी ओढून काढत असताना पंधरा वर्षांच्या मनीषा सिताराम धांडे
या विहीरित पडुन गंभीर जखमी झालेल्या मुलीचा आज पहाटे नागपूर
येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
यवतमाळ
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीसाठी घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा ऐनवेळी
तांत्रिक बिघाडामुळं रद्द झाल्यानं आज परीक्षा केंद्रांवर एकच गोंधळ उडाला. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिकाच्या १३३
व शिपायाच्या चौदा अशा १४७ जागांसाठी ऑनलाईन परीक्षेद्वारे नोकर भरती
करण्यात येत होती.
*****
***
No comments:
Post a Comment