आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२४ जून २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
मराठवाडा आणि विदर्भात दुधामुळेच क्रांती घडून येईल, असा
विश्वास राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप रथ यांनी व्यक्त केला आहे. ते
काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. या भागातून दूध संकलनात दरवर्षी मोठी वाढ होत
असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातल्या नांदेड, लातूर आणि उस्मानाबादसह विदर्भातल्या
सात जिल्ह्यातल्या सुमारे आठ हजारावर दूध उत्पादकांनी कोणत्याही अनुदानाशिवाय दुभती
जनावरं खरेदी केल्याची माहितीही दुग्ध विकास मंडळाचे अध्यक्ष रथ यांनी यावेळी दिली.
****
औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठीच्या जलवाहिनीचं
काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येईल असं उद्योग राज्यमंत्री अतुल सावे
यांनी म्हटलं आहे. सावे यांची उद्योग राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल औरंगाबाद इथं
काल त्यांचा औद्योगिक संघटनांतर्फे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
****
परभणी जिल्ह्याच्या मानवत नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी
काल सरासरी ५९ टक्के मतदान झालं. शिवसेना भाजप युतीचे प्राध्यापक सखाहरी पाटील, कॉंग्रेस-
राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पुजा खरात आणि अपक्ष उमेदवार रतन वडमारे यांच्यात ही
लढत झाली. परभणी महापालिकेच्या दोन प्रभागांसाठीही काल पोटनिवडणूक झाली.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात येळेगाव जिल्हा परिषद गट,
औंढा नागनाथ पंचायत समिती गण आणि हिंगोली नगर परिषदेच्या एका प्रभागासाठी पोटनिवडणुकीचं
मतदान काल झालं. या सर्व ठिकाणी आज मतमोजणी करुन निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
****
बीड जिल्ह्यात सलग दुस-या दिवशीही पावसानं हजेरी लावली
असून जिल्ह्यातील तीन महसूली मंडळात अतिवृष्टी झाली आहे. काल रात्री केज तालुक्यातल्या
केज, हरिश्चंद्र पिंपरी आणि होळ या महसुली मंडळात अतिवृष्टी झाली. दोन दिवसांत बीड
जिल्ह्यात जून महिन्याच्या सरासरीच्या ४३ टक्के येवढा पाऊस झाला आहे. कृषी विभागानं
चांगला पाऊस पडल्या शिवाय शेतक-यांनी पेरणी करू नये असं आवाहन केलं असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे .
****
No comments:
Post a Comment