Tuesday, 2 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.07.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०२ जुलै  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
मुंबई आणि परिसरात आज सलग पाचव्या दिवशी पावसाची संततधार कायम आहे. यामुळे मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर या चार जिल्ह्यातलं जनजीवन जवळपास ठप्प झालं आहे. या चारही जिल्ह्यात अनेक सखल भागात पाणी साचलं असून, विमानसेवा तसंच उपनगरी रेल्वेगाड्यांवरही याचा परिणाम झाला आहे.
दरम्यान, कल्याण इथं एक भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला, मध्यरात्रीनंतर दीड वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या भिंतीच्या ढिगाऱ्याखालून चौघांना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं.
मुंबईत मालाड इथं भिंत कोसळून तेरा जण ठार झाले, तर पुण्यातही अशाच घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाला भेट देऊन, आपत्ती निवारण कार्याचा आढावा घेतला, तसंच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
हवामान विभागानं आजही मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं आज मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे, मात्र अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांच्या आज नियोजित परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आजच्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे.
****
दरम्यान, मुंबई-पुणे दरम्यान काल झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे या मार्गावरची रेल्वेसेवा अजूनही सुरळीत झालेली नाही. नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस आज नाशिक पर्यंतच धावेल, तर मुंबई ते नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस आज नाशिक इथूनच सुटणार आहे. मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
****
विश्व संवाद केंद्राचा देवर्षी नारद पुरस्कार आज औरंगाबाद इथं, बीडचे पत्रकार प्रमोद कुलकर्णी यांना समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. या निमित्तानं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माध्यमं या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. मराठवाडा महसूल प्रबोधिनी सभागृहात सायंकाळी चार वाजता होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
****


No comments:

Post a Comment