Tuesday, 2 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.07.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जुलै २०१९ दुपारी .०० वा.
****
मुंबई महापालिका बरखास्त करून, महापालिकेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. मुंबईत तुंबलेल्या पाण्यासंदर्भात ते आज विधान सभेत स्थगन प्रस्तावावर बोलत होते. नालेसफाई संदर्भात महापालिकेची चौकशी करून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पवार यांनी केली. यासंदर्भात राज्य सरकारनं अध्यादेश काढून आवश्यक ती कार्यवाही तातडीनं करावी, असं पवार म्हणाले.
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही या संदर्भात चौकशी करून, दोषींवर कारवाईची मागणी केली.
काँग्रेसचे आरेफ नसीम खान यांनी, या आपत्तीत बेघर झालेल्या नागरिकांना तातडीची मदत म्हणून पन्नास हजार रुपये देण्याची मागणी केली.

दरम्यान, मुंबईत मालाड इथं भिंत पडून ठार झालेल्या अठरा जणांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाख रुपये मदत, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या दुघर्टनेतल्या जखमींवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. मुंबई महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी आपत्ती निवारण कामाचा आढावा घेतला.
****
दरम्यान, मुंबई विमानतळावर एक विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना घडली. सुदैवानं विमानातले सगळे प्रवासी सुखरुप असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

जोरदार पावसामुळे, रेल्वेमार्गांवर पाणी साचल्यानं, रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात पाणी भरल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुजरात वरून येणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यात. तर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या पालघर पासून सुरतपर्यंत वेगवेगळ्या स्थानकावर अडकून पडल्या असल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.
****
कृषी क्षेत्रात आमुलाग्र परिवर्तन घडवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीच्या निमंत्रकपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती देशभरातल्या कृषी क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासोबतच शेतीतून उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे. कृषी विकासासाठी एक कालबद्ध कार्यक्रम राबवण्यासंदर्भात दोन महिन्यांच्या अवधीत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. कर्नाटक, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री, केंद्रीय ग्राम विकास आणि पंचायतराज मंत्री हे समितीचे सदस्य तर निती आयोगाचे सदस्य रमेशचंद हे सदस्य सचिव असतील.
****
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पथकांनी बँकांमधल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आज देशभरात पन्नास ठिकाणी छापे घालून तपाससत्र सुरू केलं आहे. बारा राज्यं आणि केंद्रशासीत प्रदेशातल्या अठरा शहरांमध्ये आज ही कारवाई सुरू आहे. या प्रकरणी आतापर्यंत चौदा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, यामध्ये अनेक कंपन्या, त्यांचे प्रवर्तक तसंच संचालक आणि अनेक बँक अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देयक थकवणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचे पूर्ण अधिकार राज्य सरकारांना दिलेले असल्याचं, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच ग्राहक कल्याण मंत्री रामविलास पासवान यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.
****
नाशिक शहरातल्या सातपूर परिसरात एका बांधकाम प्रकल्पातला जलकुंभ कोसळून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुष कामगाराचा समावेश आहे. आज सकाळी साडे आठ वाजता ही दुर्घटना घडली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन जणांना बाहेर काढण्यात, अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवल आहे.
****
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, भारत आणि बांग्लादेश दरम्यान आज बर्मिंगहॅम इथं सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या या सामन्याचं धावतं समालोचन आकाशवाणी वरुन दुपारी २ वाजून ३० मिनिटांपासून प्रसारित केलं जाईल. या स्पर्धेत सध्या भारत अकरा गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असून, उपांत्य फेरीत प्रवेशासाठी भारताला फक्त एका गुणाची आवश्यकता आहे.
****

No comments:

Post a Comment