Sunday, 14 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 14.07.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जुलै २०१ सकाळी ७.१० मि.
****

v गोवा मंत्रीमंडळात चार नव्या मंत्र्यांचा समावेश
v काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती; तर पाच जणांची पहिल्यांदाच कार्याध्यक्षपदी नेमणूक
v नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. सुनील निकम यांची निवड
आणि
v विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लढत
****

 गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळात काल चार नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले माजी विरोधी पक्ष नेते चंद्रकांत वळेकर, माकल लोबो, जेनिफर मोन्सेरात आणि भाजपचे फिलिप रॉड्रीग्ज यांना राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या फेरबदलानंतर गोवा फॉरवर्ड पक्षाच्या विजय सरदेसाई, विनोद पालेकर आणि जयेश साळगावकर या तिघांना तर रोहन खाऊंटे या अपक्ष आमदाराला मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. भाजपची विधानसभेतील सदस्य संख्या आता २७ झाली आहे.
****

 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची जबाबदारी स्वीकारून अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय पाच जणांची पहिल्यांदाच कार्याध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर आणि मुझ्झफर हुसेन यांचा समावेश आहे. आमदार के.सी. पडवी यांना विधिमंडळ गट नेतेपदी नियुक्त करण्यात आलं आहे. याबरोबरचं पक्षानं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य आठ समित्या स्थापन केल्या आहेत, यामध्ये जाहीरनामा समितीच्या प्रमुखपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना प्रदेश समन्‍वय समितीचं अध्‍यक्ष करण्यात आलं आहे तर नाना पटोले यांच्याकडे प्रचार समितीच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
****

 विद्यापीठ अनुदान आयोग- युजीसीनं घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी-नेट परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. ८१ विषयांमध्ये देशपातळीवर ही परीक्षा घेतली होती. सुमारे सात लाख परीक्षार्थींपैकी पन्नास हजार नशे पंचेचाळीस उमेदवार सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र झाले आहेत. मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दिलेल्या माहितीत एकूण चार हजार सातशे छपन्न उमेदवार ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी पात्र ठरल्याचं म्हटलं आहे.
****

 कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी विधानसभेत विश्वासमत सिद्ध करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून नाराज आमदारांपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री जी परमेश्वर आणि जलसंधारण मंत्री डी के शिवकुमार यांनी गृहनिर्माण मंत्री एम टी बी नागराज यांची भेट घेऊन राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. त्याचप्रमाणे रामलिंग रेड्डी, मुनीरत्ना आणि रोशन बेग यांचंही मन वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री कुमारस्वामी किमान चार मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचंही सूत्रांनी म्हटलं आहे.
****

 दूरसंचार कंपन्यांनी देशातल्या ग्राहकांना दर्जेदार, गतीमान आणि अबाधित सेवा द्यावी, असा आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिला आहे. अकोला इथं भारत संचार निगम लिमिटेडच्या कार्यालयात खाजगी दूरसंचार ऑपरेटर आणि भारत संचार निगम लिमिटेड यांच्या सेवाविषयीच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते.
****

 पशुवैद्यक क्षेत्रातल्या उद्योजकतेच्या संधी युवा पशुपालक, बेरोजगार तरुण तसंच ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज असल्याचं मत पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नागपूर इथंपशुवैद्यक शास्त्रातील प्रगती तसंच शेतकऱ्यांची समृध्दताया विषयावरच्या परिषदेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. पारंपरिक पुरक व्यवसायाच्या मर्यादांमुळे शेतीला मदत होईल, अशा प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी पशुवैद्यक क्षेत्रातलं आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असं ते म्हणाले.
****

 चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आंध्र प्रदेशातल्या  श्रीहरिकोटा इथलं भारतीय अवकाश संशोधन केंद्र- इस्त्रो आज मध्यरात्रीनंतर २ वाजून ५१ मिनिटांनी हे यान नेल्लौर जिल्ह्यातून प्रक्षेपित करणार आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अन्य महत्त्वपूर्ण व्यक्ति उपस्थित राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. याआधी  २००८ मध्ये भारतानं चांद्रयानाचं यशस्वी प्रक्षेपण केलं होतं, या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली होती.
***
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 जालना, परतूर आणि मंठा तालुक्यातल्या १७६ गांवासाठी ग्रीड पध्दतीनं तयार करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेची उर्वरित कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. लोणीकर यांनी काल रोहिना जलशुध्दीकरण केंद्रासह मापेगाव इथल्या कामांची पाहणी केली. २४३ कोटी ३४ लाख रुपये किमतीच्या या योजनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लवकरच शुभारंभ करण्यात येणार असल्याचं लोणीकर यांनी यावेळी सांगितलं.
****

 नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. सुनील निकम हे निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नेते हरीहरराव भोसीकर यांचा ११ विरूद्ध ९ मतांनी पराभव केला.
****

 माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त काल नांदेड इथं ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचं व्याख्यान  झालं. अर्धापूर इथं शंकरराव चव्हाण महाविद्यालयामध्ये शारदा भवन शिक्षण संस्थेचे सचिव नरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं, तसंच जलसाक्षरतेवर परिसंवादही घेण्यात आला. जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर पोलिस ठाण्यातला हवालदार उल्हास चव्हाण याला एक हजार रूपयांची लाच घेतांना काल लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहाथ पकडलं. पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामिन मिळवून देण्यासाठी चव्हाण यानं पाच हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती एक हजार रूपये ठरल्यानंतर त्याला लाचेची रक्कम घेतांना पथकानं सापळा रचून अटक केली.
****

 इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा आज अंतिम सामना यजमान इंग्लंड आणि न्यूजीलंड यांच्यात होणार आहे. लंडनच्या लॉर्डस, मैदानावर होणाऱ्या हा सामना नवा विश्वजेता ठरवेल. आतापर्यंत इंग्लंडनं चारवेळा तर न्यूझीलंडनं दोनवेळा अंतिम फेरीत प्रवेश केला, मात्र हे दोन्ही संघ आतापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकू शकलेले नाहीत.
****

 विंबल्डन टेनिस स्पर्धेतलं एकेरीचं विजेतेपद सातव्या मानांकित रोमानियाच्या सिमोना हालेपनं पटकावलं आहे. अकराव्या मानांकित सेरेना विल्यम्सचा तिनं काल ६-, -२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पुरूष एकेरीत विजेतेपदासाठी आठ वेळा विजेत्या रॉजर फेडररची लढत आज प्रथम मानांकित नोवाक जोकोविकशी होईल.
****

 लोकअदालतीत पक्षकार मनापासून सहभागी झाल्यास वाद नक्की मिटतो असं मत बीडच्या जिल्हा आणि  सत्र न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे. बीड इथं जिल्हा न्यायालयात लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या. या अदालतीत दोनशेहून अधिक प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. औरंगाबादमध्ये लोकअदालतीत दोन हजार ४३ प्रकरणांत तडजोड करण्यात आली.
****

 औरंगाबाद शहरातल्या देवळाई चौकातलं भारतीय स्टेट बँकेचं एटीम मशिन शुक्रवारी रात्री चोरट्यांनी फोडून ते पळवून नेलं. यावेळी मशिनमधले रोख २५ लाख रूपये होते.
****

 जालना पोलिस स्थानकातल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस अधिक्षक एस.चैतन्य यांनी काल निलंबित केलं. ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या एका महिलेशी या कर्मचाऱ्यांनी अरेरावी करत चुकीची वागणूक दिली, असा आरोप त्यांच्याविरूद्ध होता. चौकशीत हे दोन्ही कर्मचारी दोषी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
*****
***

No comments:

Post a Comment