Sunday, 14 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 14.07.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –  14 July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जुलै २०१९ दुपारी .०० वा.
****

 गोवा इथं यंदाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणार असल्याचं, माहिती आणि सूचना प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. भारतीय चित्रपट  संचालन समितीची बैठक जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज गोवा इथं झाली. त्यानंतर वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. यावर्षी रशियादेखील या महोत्सवात आंतरराष्ट्रीय सहयोगी बनण्यासाठी इच्छुक असल्याचं ते म्हणाले. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या अनुषंगानं या महोत्सवात विशेष प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यंदा या महोत्सवाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असून, त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****

 राजधानी दिल्लीत संसदेच्या प्रांगणात आज दुसऱ्या दिवशी स्वच्छता अभियान राबण्यात आलं. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, खासदार मंडळी आणि कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
****

 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सकाळी आंधप्रदेश मधल्या तिरुपती पर्वतावर जाऊन भगवान बालाजी व्यंकटेशाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी तिथल्या पदमावती अम्मावरी आणि श्री कपिलेश्वर स्वामींचंही दर्शन घेतल्याचं ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
****
 त्तीसगढ इथं माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी आज दोन माओवाद्यांना ठार केलं, तर एकाला अटक करण्यात आली आहे. दंतेवाडा जिल्ह्यात किरणडूल क्षेत्रात आज सकाळी जिल्हा राखीव पोलीस आणि माओवाद्यांमध्ये ही चकमक झाली. या दोन्हीं माओवाद्यांवर पाच लाख रूयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं, असं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
****

 पंजाब सरकारमधले कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिध्दू यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याकडे सोपवला आहे. यासंदर्भातील पत्रही आपण काँग्रेस अध्यक्षांकडे  दहा जून रोजी पाठवलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे .
****

 अमरावती जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरवात झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. मात्र, दहा दिवसांपासून पावसानं पुन्हा दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचं संकट येण्याची भीती निर्माण झाली आहे. दोन-तीन दिवसात पाऊस न आल्यास किमान तीन लाख हेक्टरमध्ये दुबार पेरणी करावी लागणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यात एका शेतात १२ फुटी मगर मृतावस्थेत आढळली आहे. वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाहणीत मगरीच्या अंगावर जखम आढळली. २४ तासांपूर्वी विषबाधित मासे खाल्ल्यामुळे मगरीचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान सांगलीतल्या माधवनगर - बुधगाव रस्त्यावर अज्ञात वाहनांच्या धडकेत तरसाचा मृत्यू झाला. नागरिकांनी, तरसाचा मृतदेह वन्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 मुघलकालीन उद्यानशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या औरंगाबाद शहरातल्या ऐतिहासिक हिमायतबागेत आज सकाळी हेरिटेज वॉक घेण्यात आला. दिल्ली दरवाजापासून सुरू झालेल्या या वॉकमध्ये समर पॅलेस, बारादरी, शक्कर बावडी, चांदनी चबुतरा या ऐतिहासिक वास्तू दाखवण्यात आल्या. यावेळी इतिहासतज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी आणि रफत कुरेशी यांनी उपस्थित इतिहासप्रेमी नागरिक आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी असलेल्या पुरावशेषांची माहिती दिली. त्याचबरोबर चंद्रशेखर बोर्डे, ॲड. स्वप्नील जोशी आणि डॉ. किशोर पाठक यांनी इथल्या समृद्ध पक्षीजीवन आणि वनस्पतींचीही माहिती दिली.
****

 भारताची धावपटू हिमा दास हिनं झेक प्रजासत्ताक इथं सुरू असलेल्या क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदकाची कमाई केली. गेल्या ११ दिवसांतलं तिचं हे तिसरं आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे. आसाममधल्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हिमानं गेल्या वर्षी, २० वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली होती.
****

 इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या १२ व्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज यजमान इंग्लंड आणि न्यूजीलंड यांच्यात होणार आहे. लंडनच्या लॉर्डस, मैदानावर होणाऱ्या या सामन्यात नवा विश्वविजेता क्रिकेट संघ निश्चित होणार आहे. आतापर्यंत इंग्लंडनं चार वेळा, तर न्यूझीलंडनं दोन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला, मात्र हे दोन्ही संघ आतापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकू शकलेले नाहीत.
****

 विंबल्डन टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीत विजेतेपदासाठी स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर याची लढत आज सर्बियाच्या प्रथम मानांकित नोवाक जोकोविकशी होणार आहे. रॉजरनं यापूर्वी आठ वेळा या स्पर्धेतल्या विजेतेपदाचा बहुमान पटकावला आहे.
*****
***

No comments:

Post a Comment