Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 15 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ जुलै
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
v वाहन प्रणालीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे चांद्रयान -२चं प्रक्षेपण स्थगित
v राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे ५० आमदारही
निवडून येण्याची शक्यता नसल्याचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा दावा
v मराठवाड्यात २२ जुलैनंतर कृत्रिम पाऊस पाडला जाणार - रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर
आणि
v अत्यंत रोमहर्षक सामन्यानंतर चौकारांच्या संख्येच्या आधारावर यजमान
इंग्लंडनं न्यूझीलंडला पराभूत करत क्रिकेट विश्वचषकावर पहिल्यांदाच कोरलं आपलं नाव
****
वाहन प्रणालीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे
चांद्रयान -२चं प्रक्षेपण
स्थगित करण्यात आलं आहे. आज पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी आंध्र
प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या भारतीय अवकाश संशोधर संस्था – इस्त्रोच्या
सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण होणार होतं. प्रक्षेपणाच्या २० तास अगोदर काल सकाळी ६ वाजून ५१ मिनिटांनी यानाच्या प्रक्षेपणासाठीची
संपूर्ण तयारी सुरु झाली होती. मात्र प्रक्षेपणाच्या
५६ मिनिटं आधी वाहन प्रणालीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे
हे प्रक्षेपण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रक्षेपणाची
पुढची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असं इस्त्रोच्या
प्रवक्त्यानं सांगितलं.
****
विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी आणि
पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या कमी झालेल्या सर्व जागा अधिकच्या
जागा वाढवून भरून काढण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ चळवळीच्या शिष्टमंडळाशी मुंबई इथं चर्चा
करताना काल ते बोलत होते. या आरक्षणामुळे खुल्या गटातल्या ज्या
पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदा होऊ शकले नाही, त्यांनी खासगी
शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा, त्यांच्या यंदाच्या शिक्षण
शुल्काची प्रतिपूर्ती सरकारतर्फे करण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा मुख्यमंत्री
होणे हे केवळ स्वप्नच राहील, आणि आघाडीचे ५० आमदारही निवडून येणार
नाहीत, असा दावा जल संपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. नाशिक इथं जिल्हा नियोजन मंडळाच्या
बैठकीनंतर वार्ताहरांशी काल ते बोलत होते. ऑक्टोबर महिन्यात १२ किंवा १३ तारखेला विधानसभा
निवडणुका होतील, त्याआधी आघाडीचे अनेक आमदार भाजपात येतील असं
ते म्हणाले. कालच्या बैठकीत नाशिकसाठी ७९१ कोटी रुपयांच्या वार्षिक
आराखड्याला मंजुरी देण्यात आली. नाशिक जिल्ह्याच्या काही भागात
पाऊस झाला आहे, मात्र गंगापूर धरण क्षेत्रात पावसानं ओढ दिली
असून पाऊस समाधानकारक झाला तर शहरातली पाणी कपात आठ दिवसात रद्द केली जाईल,
असं ते म्हणाले.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांवर विमानतळासारख्या
सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात असून साडेसहाशेंहून अधिक बस स्थानकांचं
यादृष्टीनं काम सुरु असल्याचं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
ते काल वर्धा इथं बोलत होते. जिल्ह्यातल्या
विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यात सुरु असलेल्या तेहतीस कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन
त्यांनी यावेळी केलं.
****
मराठवाड्यात येत्या २२ जुलैनंतर कृत्रिम पाऊस
पाडला जाणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली
आहे. कृत्रिम पावसाची प्रक्रिया
पूर्ण झाली असून, शासनानं त्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधीही मंजूर
केला आहे. यामध्ये औरंगाबाद, सोलापूर आणि
अहमदनगर या तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. २२ तारखेनंतर
येणाऱ्या ढगांमध्ये पाण्याची घनता जास्त असेल, त्यावेळी कृत्रिम
पावसाचा प्रयोग निश्चित यशस्वी होऊ शकतो, असं हवामान खात्यानं
म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या हक्काचं कृष्णा
खोऱ्यातलं पाणी आणण्यासह सोलापूर -तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी आपण संसदेत पाठपुरावा करत असल्याचं खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
यांनी म्हटलं आहे. उस्मानाबाद इथं शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक, संयुक्त महाराष्ट्राच्या
लढ्याचे अग्रणी उद्धवराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित जीवन गौरव
पुरस्कार प्रदान सोहळा आणि कर्करोग निदान शिबिराच्या
उद्घाटन प्रसंगी काल ते बोलत होते. यावेळी बार्शी इथले
डॉक्टर बी. एम नेने यांना खासदार निंबाळकर यांच्या हस्ते उद्धवराव पाटील जीवन गौरव पुरस्कारानं
सन्मानित करण्यात आलं.
दरम्यान,
सोलापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी
भूसंपादन प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यासह अन्य प्रश्नांवर काल खासदार निंबाळकर यांनी रेल्वे आणि महसूल अधिकाऱ्यांची एक संयुक्त
बैठक घेतली. उस्मानाबाद रेल्वेस्थानकाजवळच्या जुन्या मार्गाला जोडल्या जाणाऱ्या नव्या मार्गाची पाहणी केली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारित केलं जात आहे.
****
धूरमुक्त महाराष्ट्र उपक्रमात बीड जिल्ह्यात
आजपासून पंडित दीनदयाळ उपाध्याय अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी
आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली. यासंदर्भात
घेण्यात आलेल्या बैठकीत संबंधितांना आवश्यक कारवाई करण्याच्या
सूचना त्यांनी काल दिल्या. या अभियानात धूरमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी १०० टक्के कुटुंबांना मोफत गॅस
जोडणी दिली जाणार आहे. या अंतर्गत पात्र कुटुंबांना १०० टक्के
शिधापत्रिका आणि धान्य वाटप हे उद्दिष्ट देऊन या अभियानाचा प्रारंभ राज्यस्तरावर मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षपदी कुंडलिक
अतकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्ष देविदास कुलकर्णी यांच्या निधनामुळे
हे पद रिक्त झालं होतं. परिषदेच्या कार्यकारिणीच्या काल
झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
***
क्रिकेट :
अत्यंत रोमहर्षक आणि चुरशीच्या झालेल्या सामन्यानंतर
चौकारांच्या संख्येच्या आधारावर यजमान इंग्लंडनं न्यूझीलंडला पराभूत
करत क्रिकेट विश्वचषकावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं. काल,
लंडनमधल्या लॉर्डस मैदानावर खेळतांना न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम
फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या संघानं पन्नास षटकात आठ
बाद २४१ धावा केल्या. प्रत्युतरात इग्लंडनंही पन्नास षटकात सर्वबाद २४१ एवढ्याचं धावा केल्यामुळे
हा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे क्रिकेटच्या
एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्यांदाच उत्कृष्ट षटक- सुपर ओव्हरचा
वापर करण्यात आला. या षटकात इग्लंडनं बिनबाद १५ धावा केल्या.
जिंकण्यसाठी १६ धावा करण्याची गरज असताना न्यूझीलंडनंही या एक बाद पंधरा धावा करत बरोबरी केली. त्यामुळे संयोजकांनी सामन्यात सर्वाधिक २४ चौकार फटकावल्याच्या आधारावर इग्लंडला विजेता घोषित केलं.
इग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला
सामनावीर तर, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यिमसनला स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार
देण्यात आला.
****
इंग्लंडमध्ये झालेल्या विम्बल्डन टेनिस
स्पर्धेत पुरुष एकेरी गटात, सार्बियाच्या नोवाक जोकोविचनं स्विसर्त्झलंडच्या रॉजर फेडररचा पराभव करुन विजेतेपद पटकावलं. तब्बल
पाच तास चाललेल्या या रोमहर्षक अंतिम सामन्यात ७-६, १-६, ७-६, ४-६ आणि १३-१२ अशा गुण फरकासह जोकोविचनं ही लढत जिंकली. पहिला आणि तिसरा सेट जोकोविचनं टायब्रेकरवर जिंकला.
****
तुर्कस्थानच्या इस्तंबुल इथं यासार डोगु रैंकिंग सिरीज
कुस्ती चषक स्पर्धेत महिलांच्या ५३ किलो वजन गटात विनेश फोगाटनं
सुवर्ण पदक पटकावलं. अंतिम सामन्यात विनेशनं रशियाच्या एकातेरिना
पोलिशचुक हिला नमवून सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. तर पुरुषांच्या
८६ किलो वजनी गटात दीपक पुनियानं रजत पदक तर १२५ किलो वजनी गटात सुमितनं कांस्य पदक
मिळवलं.
याआधी पुरुषांच्या ६१ किलो ग्राम फ्री स्टाईल वजनी गटात राहुल आवारेनं तर महिलांच्या ५० किलो ग्राम वजनी गटात सीमा बिस्लानं आणि ५९ किलोग्राम
वजनी गटात मंजु कुमारीनं सुवर्ण पदक जिंकल असून उत्कर्ष काळेनं
६१ किलोग्राम वजनी गटात कांस्य पदक जिंकलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या राजूर बसस्थानकात
काल दुपारी एका वृध्द महिलेचा बसच्या चाकाखाली दबून मृत्यू झाला. नंदाबाई खाकरे, असं मृत महिलेचं नाव असून, त्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या वडोज खुर्द इथल्या
रहिवासी होत्या. बसस्थानकात चालक बस
मागे घेत असताना ही दुर्घटना घडली.
दरम्यान, जालना-औरंगाबाद मार्गावरील
बदनापूरजवळ काल दुपारी झालेल्या अन्य एका कार अपघातात पती-पत्नीसह ११ आणि नऊ वर्षांच्या
दोन मुली गंभीर जखमी झाल्या. जखमींवर जालना इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
येत्या दोन
दिवसात कोकणात बहुतेक ठिकाणी, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर उत्तर- मध्य महाराष्ट्र,
मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
****
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री दिवंगत शंकरराव
चव्हाण यांच्या ९९ व्या जयंती निमित्त काल नांदेड इथं विविध कार्यक्रम घेण्यात आले.
जिल्ह्यातल्या धनेगाव इथं चव्हाण यांच्या समाधीस्थळी विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केलं.
*****
***
No comments:
Post a Comment