Monday, 15 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.07.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –  15 July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ जुलै २०१९ दुपारी .०० वा.
****

 देशातलं अपघाती मृत्यूचं प्रमाण हे आपल्या विभागाचं मोठं अपयश असल्याचं, केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज लोकसभेत मोटार वाहन कायदा सुधारणा विधेयक मांडताना बोलत होते. अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आपला विभाग मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असून, प्रशासकीय यंत्रणेतल्या कच्च्या दुव्यांमुळे, रस्ते अपघातांचं प्रमाण अद्यापही कमी झालं नसल्याचं, गडकरी म्हणाले. तमिळनाडूमध्ये रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूचं प्रमाण कमी झाल्याबद्दल गडकरी यांनी राज्यसरकारचं अभिनंदन केलं.
****

 अयोध्येत रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी गेल्या २५ वर्षांपासून रखडल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं, केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्यासाठी विशेष न्यायालयाला सहा महिने मुदतवाढ देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे आज करण्यात आली, त्यावेळी न्यायालयानं या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांच्यासह भाजप तसंच हिंदुत्ववादी नेत्यांच्या विरोधात हा खटला सुरू आहे. या प्रकरणाची सुनावणी रायबरेली इथल्या विशेष न्यायालयाऐवजी, लखनऊच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या.
****

 लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले स्वयंघोषीत आध्यात्मिक गुरू आसाराम याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला. अभिकर्ता तुषार मेहता यांनी, या जामीनअर्जाच्या विरोधात युक्तिवाद करताना, या प्रकरणी अद्याप दोनशे दहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदवणं बाकी असल्याचं सांगितलं. त्यानंतर न्यायमूर्ती एन व्ही रामन यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं, ही याचिका फेटाळून लावली. सुरत इथल्या दोन बहिणींनी आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई याच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. त्यासंदर्भात हा खटला सुरू आहे.
****

 कर्नाटकातल्या काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी, काँग्रेसच्या नेत्यांना भेटण्यास मनाई केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांची आपल्याला भीती वाटत असल्यानं, आपण त्यांना भेटणार नाही, अशा आशयाचं पत्र या आमदारांनी, मुंबई पोलिसांना दिलं आहे. मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या या आमदारांनी, आपण सर्वजण एक असल्याचं सांगितलं.
****
         
         ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॅाप्टर खरेदी व्यवहारप्रकरणी, मध्यस्थ राजीव सक्सेना याचा जामीन रद्द करावा, अशी मागणी, सक्तवसुली संचालनालयानं दिल्ली न्यायालयाकडे केली आहे. तपास संस्थेनं, सक्सेना तपास कार्यात सहकार्य करत नसल्याचं न्यायालयाला सांगितलं. या प्रकरणी विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी सक्सेना यांना नोटीस बजावली असुन, पुढील सुनावणी येत्या गुरुवारी घेणार असल्याचं सांगितलं.
****

 जम्मु काश्मीर इथं आज पहाटे पाकिस्तानकड्न नियंत्रण रेषेवर घुसखोरी करतानां एकाला, सुरक्षा दलाच्या सैनिकांनी ठार केलं. सांबा जिल्ह्यातल्या रामगढ भागातून भारतीय हद्दीत प्रवेश करत असताना, एस.एम.पूर च्या पोलिस चौकी ही कारवाई केली असल्याचं पोलिस दलानं सांगितलं.
****

पालघर जिल्ह्यात विरार जवळ अर्नाळा समुद्रात ३ जण बुडाले, यापैकी एका तरुणीचा बुडून मृत्यू झाला, तर एकीला वाचवण्यात यश आलं आहे. एक जण अद्याप बेपत्ता असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. मध्यप्रदेशातल्शा जबलपूर इथले सुमारे १७ यात्रेकरू हजला जाण्यासाठी मुंबईत आले होते, हे सर्वजण काल सायंकाळी अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आले असता, ही दुर्घटना घडली.
****

 कोल्हापूर जिल्ह्यानं प्रधानमंत्री किसान योजनेत राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख 43 हजार 592 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान योजनेमध्ये आपली नावं नोंदवली आहेत. यापूर्वी दोन हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता मात्र आता ही अट रद्द केल्यामुळं शेतकऱ्यांचा या योजनेत सहभाग वाढला अस़ुन, या शेतकऱ्यांना तीन टप्प्यात सहा हजार रुपये अनुदान मिळणारं असल्याची माहिती ,जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.
****

 जर्मनी इथं सुरु असलेल्या  आतंरराष्ट्रीय नेमबाजी खेळ महासंघाच्या ज्युनिअर विश्व कप स्पर्धेच्या पहिल्याचं दिवशी, भारतानं दोन सुवर्ण पदकांसहीत सहा पदकं कमावली आहे.
*****
***

No comments:

Post a Comment