Tuesday, 16 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.07.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –  16 July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ जुलै २०१९ दुपारी .०० वा.
****

 ग्रामीण तसंच दुर्गम भागातली गावं रस्त्यांनी जोडण्यासाठी शहरी भागातल्या महामार्गांवर पथकर आकारणं, अपरिहार्य असल्याचं, केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज लोकसभेत परिवहन विभागासाठीच्या अर्थसंकल्पीय अनुदान मागण्यांवरच्या चर्चेत बोलत होते. द्रूतगती महामार्गांमुळे दोन शहरातला प्रवासाचा वेळ कमी होतो, मोठ्या प्रमाणावर खर्च अपेक्षित असलेले असे प्रकल्प राबवण्यासाठी बांधा वापरा आणि हस्तांतरित करा - बीओटी तत्वावर काम करावं लागत असल्याचं, गडकरी यांनी सांगितलं. गेल्या पाच वर्षांत आपल्या मंत्रालयानं चाळीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले, त्यापूर्वीच्या पाच वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण साठ टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती त्यांनी दिली.
****

 पोस्टमन भरतीसाठीची परीक्षा फक्त इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून घेण्याच्या निर्णयाविरोधात अण्णाद्रमुकच्या सदस्यांनी आज सकाळी राज्यसभेत शून्यकाळात जोरदार घोषणाबाजी केली. सभापतींच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरून या सदस्यांनी गदारोळ केल्यानं, सभापती व्यंकय्या नायडू यांनी कामकाज आधी बारा वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ सुरुच राहिल्यानं, कामकाज पुन्हा दहा मिनिटांसाठी आणि त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.

 लोकसभेतही याच मागणीवरून सदस्यांनी प्रश्नोत्तर काळानंतर हा मुद्दा उपस्थित करून घोषणाबाजी केली. मात्र अध्यक्षांनी सदनाचं कामकाज सुरू ठेवलं. संबंधित सदस्यांनी या मुद्यावरून सभात्याग केला.
****

 कनार्टक विधानसभेच्या अध्यक्षांनी आपले राजीनामे स्वीकारावेत, असं कर्नाटकातल्या दहा आमदारांनी म्हटलं आहे, ते आज सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणाच्या सुनावणीत बोलत होते. राजीनामा देणं हा आपला मूलभूत हक्क असून, विधानसभा अध्यक्षांनी तो नामंजूर केल्यास निर्माण होणाऱ्या स्थितीला आपण बांधील नसल्याचं, या आमदारांनी स्पष्ट केलं. फक्त आपल्याला अपात्र ठरवण्यासाठीच हे राजीनामे प्रलंबित ठेवल्याचा आरोप, या आमदारांनी केला. कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी सरकारला पुढच्या काही दिवसांतच विश्वासमत सिद्ध करायचं आहे, त्या पार्श्वभूमीवर आमदारांचे राजीनामे नामंजूर करून, त्यांना पक्षाकडून जारी होणारं व्हिप पाळण्याची सक्ती केली जाऊ शकते, असं ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितलं.
****

 मुंबईत डोंगरी भागात एक चार मजली इमारत कोसळून सुमारे चाळीस ते पन्नास लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. दक्षिण मुंबई भागातली ही इमारत आज दुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास कोसळली. आपत्ती निवारण पथक, अग्निशामक दल आणि महानगर पालिकेच्या वतीनं इथं मदत कार्य सुरू आहे.
****
 गुरुपौर्णिमेचा सण आज साजरा होत आहे. या निमित्तानं सर्वत्र गुरुपूजनासह विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु पौर्णिमेनिमित्त शिक्षक, गुरु आणि मार्गदर्शकांना अभिवादन केलं आहे. समाजाच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व गुरुंना नमन करत असल्याचं, त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.
****


 बीड इथं, पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानात दारिद्र्य रेषेखालील ५० कुटुंबांना नवीन गॅस जोडणी आणि नवीन शिधापत्रिका वाटपला काल  जिल्हा परिषद अध्यक्ष सविता गोल्हार आणि बीड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते प्रारंभ झाला. रहिवासी पुरावा देऊ न शकणाऱ्या पारधी समाजातल्या दारिद्र्यरेषेखालील ५० कुटुंबांना नवीन गॅस जोडणी आणि शिधापत्रिका देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय  यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले होते. या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात आली.
****

 उद्दिष्टाच्या २० टक्क्यांपेक्षा कमी कर्जवाटप केले असेल, अशा बँकामधील शासकीय खाते दुसऱ्या बँकेत नेण्यात येतील, असा इशारा यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिला. ते काल बँक अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
*****
***

No comments:

Post a Comment