Wednesday, 17 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.07.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –  17 July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जुलै २०१९ दुपारी .०० वा.
****

 कर्नाटक विधानसभेतल्या राजीनामा सादर केलेल्या बंडखोर आमदारांना विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्याची सक्ती करण्यात येऊ नये, असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं दिले. या निर्णयामुळे, उद्या विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार असलेल्या एच.डी.कुमारस्वामी सरकारपुढच्या अडचणी वाढण्याची स्थिती आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं, कर्नाटक विधानसभेचे सभापती के. आर.रमेशकुमार यांनी बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा, असंही सांगितलं. याबाबतीत संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घेणार असल्याचं सभापती रमेशकुमार यांनी म्हटलं आहे. आता निर्णयापासून मागं फिरण्याचा आणि विधानसभेच्या  कामकाजाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया या बंडखोर आमदारांनी मुंबईत दिली आहे.

तर, बंडखोर आमदारांचा नैतिक विजय झाला असल्याचं मत भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केलं आहे.
****

 आयकर विवरणपत्रात या वर्षी एक एप्रिल रोजी अधिसूचना जारी केल्यापासून कोणताही बदल केलेला नाही, असं सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं एका अधिकृत निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे. आयकर विवरणपत्रात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्यामुळे आयटीआर- दोन आणि आयटीआर- तीन मध्ये विवरणपत्र दाखल करताना, करदात्यांना अडचणी येत असल्याचं समाजमाध्यमांमध्ये पसरलेलं वृत्त चुकीचं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.  आतापर्यंत एक कोटी अडोतीस लाख करदात्यांनी विवरणपत्र दाखल केली असल्याचंही मंडळानं सांगितलं आहे.
****

 पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात आज नेदरलँडमधील हेग इथं आंतरराष्ट्रीय न्यायालय निर्णय देणार आहे. हेरगिरी आणि दहशतवाद या आरोपांखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं जाधव यांना २०१७ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. या विरोधात भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. मे २०१७मधे न्यायालयानं जाधव यांना सुनावलेल्या शिक्षेच्या अंमलबजावणीपासून पाकिस्तानला परावृत्त केलं होतं. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर फेब्रुवारीमधे राखून ठेवलेला निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अहमद युसूफ आज सुनावणार आहेत.
****

 देशात २०१८-१९ या वर्षात `प्रधानमंत्री पीक विमा` योजनेंतर्गत पाच कोटी एकसष्ट लाख शेतकऱ्यांना विमासंरक्षणाच्या कक्षेत आणल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिली आहे. विमासंरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी, शेतीचं नुकसान झालेल्या पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांना त्यांच्या दाव्याची रक्कम दिली गेली आहे, अशी माहिती त्यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. देशातल्या पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी किमान पन्नास टक्के क्षेत्रापर्यंत विमा संरक्षणाची व्याप्ती वाढवण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचंही तोमर यांनी सांगितलं.
****

 इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदंबी श्रीकांत यांनी आज आपले एकेरीचे सामने जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. पाचव्या मानांकित सिंधूनं जपानच्या आया आहोरीचा, तर आठव्या मानांकित श्रीकांतनं जपानच्या केंता निशीमोतो याचा पराभव केला.
****

 जर्मनीच्या सुहल इथं सुरू असलेल्या कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत नेमबाज विजयवीर सिद्धू यानं काल राजकंवर सिंह सिंधू आणि आदर्श सिंह सोबत पुरूषांच्या २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं. या स्पर्धेत आतापर्यंत भारतानं सात सुवर्ण, सात रजत आणि दोन कांस्य पदकं अशी एकूण सोळा पदकं जिंकली असून, पदतालिकेत पहिलं स्थान कायम ठेवलं आहे.
****

 अमरावती जिल्ह्यातल्या पाणी टंचाईच्या योजनांना शासनानं येत्या एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्यानं पाणीसाठे कोरडेच असल्यामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली आहे.
****

 रायगड जिल्हयातल्या नऊ शहरांतल्या तीनशे अट्ठ्याण्णव इमारती धोकादायक असल्याचं जिल्हा प्रशासनानं केलेल्या एका पाहणीतून समोर आलं आहे. यामध्ये दहा शासकीय इमारतींचा देखील समावेश आहे. यात कर्जत शहरात सर्वाधिक म्हणजे दोनशे सव्वीस इमारती धोकादायक असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागात इमारती कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनानं जिल्हायतल्या धोकादायक इमारती, पूल आणि धरणांचं सर्वेक्षण केलं, त्यातून ही माहिती समोर आली आहे.
*****
***

No comments:

Post a Comment