Thursday, 18 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.07.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
भारतीय कृषी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी नेमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चस्तरीय समितीच्या पहिल्या बैठकीला नवी दिल्लीत सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समितीचे निमंत्रक आहेत. हरयाणा, अरुणाचल प्रदेश आणि गुजरातचे मुख्यमंत्री तसंच केंद्रीय कृषी ग्रामीण विकास आणि पंचायत राजमंत्री नरेंद्र सिंग तोमर बैठकीला उपस्थित आहेत. कृषीक्षेत्राचा कायापालट आणि शेतक-यांचं उत्पन्न वाढवण्याबाबत तसंच कृषीक्षेत्रातल्या सुधारणा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत बैठकीत चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्र्यांची ही उच्चस्तरीय समिती आपला अहवाल दोन महिन्यात सादर करणार आहे.
****
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात एक लाख स्वयंरोजगार निर्मितीचं शासनाचं उद्दीष्ट असून त्याद्वारे दहा लाख रोजगार निर्मिती केली जाईल तसंच या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मुंबईत केली. उद्योग विभागाच्या पुढाकारानं आयोजित बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात देसाई बोलत होते.
****
राज्यातील विधानसभा निवडणूक मतपत्रिकेद्वारे व्हावी अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. मतदान यंत्रांशी छेडछाड केली जाऊ शकते अशी जनतेला शंका असल्यानं त्यांचा लोकशाहीवरील विश्र्वास कायम रहावा यासाठी मतपत्रिकेद्वारे निवडणूक व्हावी, असं त्यांनी आज एका संदेशात म्हटलं आहे. येत्या सप्टेंबर, ऑक्टोबरमधील ही निवडणूक मतपत्रिकेद्वारे व्हावी, अशी मागणी काँग्रेस आणि मनसे या पक्षांनीही केली आहे.
****
शिर्डी विमानतळाच्या विकासकामासंदर्भात केंद्रसरकार राज्य सरकारबरोबर एकत्रित काम करील, असं नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज लोकसभेत सांगितलं. विमानतळाचा विकास ही एक निरंतर प्रक्रिया असून, सरकार सर्वच विमानतळ सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे, असं त्यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यासंदर्भात पूरक प्रश्न विचारला होता.
****
भारताच्या चांद्रयान-दोनचं प्रक्षेपण येत्या सोमवारी म्हणजे बावीस जुलैला दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी केलं जाणार आहे. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधक संघटनेनं आज याची माहिती दिली. हे प्रक्षेपण पंधरा जुलैला होणार होतं, मात्र तांत्रिक अडचणीमुळं ते रद्द करावं लागलं. 
****
उस्मानाबाद जिल्हात तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग इथं अप्पर तहसील कार्यालय सुरु करण्यात येईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते आज तुळजापूर येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. मराठवाड्यात कमी पाऊस झाल्यानं कृत्रिम पावसासाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचंही पाटील यावेळी म्हणाले.
****
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज औरंगाबाद इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या पुतळ्याला विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी अभिवादन केलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोकशाहिर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्रातर्फे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचं व्याख्यान झालं. पुढलं वर्ष अण्णाभाऊसाठेंचं जन्मशताब्दी वर्ष असून तोवर विद्यापीठात त्यांचं पूर्ण साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल असं कुलगुरू येवले यावेळी म्हणाले.
****
परभणी जिल्ह्यातील पालम इथं दोन गटांत काल रात्री झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या हाणामारीवेळी दगडफेक, जाळपोळीचा प्रकार घडला. त्या पार्श्र्वभूमीवर पालम बाजारपेठ आज दिवसभर बंद होती, अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
परभणी जिल्हातील पाथरी तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनाला आज लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. ज्ञानोबा सोनबा काळे असं या कारकुनाचं नाव असून शेतातील आखाड्यास लागलेल्या आगीत जळालेल्या साहित्याची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून सहा हजार रुपयांची लाच त्यानं मागितली होती. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात आज भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्यात आली. नदीतील सात यांत्रिक बोटी महसूल आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं जिलेटिनच्या साहाय्यानं स्फोट करुन नष्ट केल्या आहेत. या बोटींची किंमत अंदाजे पस्तीस लाख रुपये असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
****

No comments:

Post a Comment