Friday, 19 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.07.2019 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ जुलै २०१ सकाळी ७.१० मि.
****
** अयोध्या जमीन वादप्रकरणी ३१ जुलैपर्यंत मध्यस्थी सुरू ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
** चालू आर्थिक वर्षासाठीचं वित्त विधेयक लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर
** विधानसभा निवडणूक मतपत्रिकेद्वारे व्हावी - अजित पवार यांची मागणी
** मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी सर्व यंत्रणा सज्ज - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
आणि
** मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क घेणाऱ्या महाविद्यालयांवर फौजदारी कारवाईचा इशारा
****
अयोध्येत रामजन्मभूमी वादप्रकरणात ३१ जुलैपर्यंत मध्यस्थी प्रक्रिया सुरू ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. काल झालेल्या सुनावणीत मध्यस्थी समितीचे प्रमुख निवृत्त न्यायमूर्ती एफ एम खलिफुल्ला यांनी आतापर्यंतच्या कार्यवाहीचा अहवाल काल न्यायालयाला सादर केला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या घटनापीठानं, या प्रकरणी अंतिम अहवाल एक ऑगस्ट रोजी सादर करण्याचे निर्देश समितीला दिले असून, या प्रकरणी पुढच्या सुनावणीबाबत दोन ऑगस्टला निर्णय घेणार असल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे. मध्यस्थ समितीचा अहवाल गोपनीय राहील, असं न्यायालयानं नमूद केलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेबाबत दिलेल्या निर्णयानंतर पाकिस्ताननं त्यांना मुक्त करून मायदेशी परत पाठवावं असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पाकिस्तानला कळवलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाबाबत परराष्ट्र मंत्री डॉ.एस जयशंकर यांनी काल संसदेत निवेदन केलं, त्यात ही माहिती दिली. न्यायालयाच्या या निर्णयातून, या प्रकरणी भारताची भूमिका रास्त असल्याचं स्पष्ट होतं, असं परराष्ट्र  मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
चालू आर्थिक वर्षासाठीचं वित्त विधेयक काल लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकात करण्यात आलेल्या कर प्रस्तावांमधील सुधारणांची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. या विधेयकामुळे मेक इन इंडिया आणि स्टार्ट अप योजनांना प्रोत्साहन मिळेल असं सांगताना सीतारमण यांनी, या विधेयकातल्या अनेक मुद्यांकडे लक्ष वेधलं.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळानं १५व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवला आहे. संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा, यासाठी कालमर्यादेचं बंधन नसणारा निधी उपलब्ध व्हावा यासाठी, सुधारित प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे.
****
र्नाटक विधानसभेत काल विश्वासमत प्रस्तावावर मतदान होऊ शकलं नाही. चर्चेदरम्यान वारंवार व्यत्यय येत असल्यानं, विधानसभा अध्यक्षांनी सदनाचं कामकाज काल दिवसभरासाठी स्थगित केलं. काल या प्रस्तावावर मतदान न झाल्यानं, विरोधी पक्ष भाजपनं विधानभवनात निदर्शनं केली.
****
भारतीय कृषी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी नेमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चस्तरीय समितीच्या पहिल्या बैठकीला कालपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समितीचे निमंत्रक आहेत. कृषीक्षेत्राचा कायापालट, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ तसंच कृषीक्षेत्रातल्या सुधारणा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत या बैठकीत चर्चा सुरु आहे. ही समिती दोन महिन्यात अहवाल सादर करणार आहे.
****
राज्यातील विधानसभा निवडणूक मतपत्रिकेद्वारे व्हावी अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. मतदान यंत्रांशी छेडछाड केली जाऊ शकते अशी जनतेला शंका असल्यानं त्यांचा लोकशाहीवरील विश्र्वास कायम रहावा यासाठी मतपत्रिकेद्वारे निवडणूक व्हावी, असं त्यांनी काल एका संदेशात म्हटलं आहे. विधानसभेची आगामी निवडणूक मतपत्रिकेद्वारे व्हावी, अशी मागणी काँग्रेस तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरच्या रविवारी, येत्या २८ तारखेला सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ५५ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांना 1800-11-7800 या टोल फ्री क्रमांकावरुन तसंच ‘मायगव्ह ओपन फोरमद्वारेही’ आपले विचार कळवता येतील.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
भारताच्या चांद्रयान-दोनचं प्रक्षेपण येत्या सोमवारी म्हणजे बावीस जुलैला दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी केलं जाणार आहे. भारतीय अंतराळ संशोधक संघटना इस्रोनं काल ही माहिती दिली. हे प्रक्षेपण पंधरा जुलैला होणार होतं, मात्र तांत्रिक अडचणीमुळं ते रद्द करावं लागलं. 
****
मराठवाड्यात कमी पाऊस झाल्यानं कृत्रिम पावसासाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल तुळजापूर येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात नळदुर्ग इथं अप्पर तहसील कार्यालय सुरु करण्यात येईल, अशी घोषणाही पाटील यांनी केली. मराठा आरक्षण जसं उच्च न्यायालयात टिकलं तसं ते सर्वोच्च न्यायालयातही टिकू दे अशी प्रार्थना आपण देवी चरणी केली असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित महाविद्यालयावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा सामाजिक न्याय आणि  विशेष सहाय मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिला आहे. औरंगाबाद विभागात, राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा खाडे यांनी काल घेतला, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती तसंच मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी तातडीनं करुन कोणताही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देशही खाडे यांनी यावेळी दिले.
****
शेतरस्त्यांच्या विकासाचे प्रस्ताव प्रशासनास सादर करावेत, असं आवाहन राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केलं आहे. ते काल बीड इथं तीस आडत गाळ्यांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. पंडीत दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजनेअंतर्गत पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात शिधापत्रकांचं वाटपही यावेळी करण्यात आलं. वॉटरग्रीड प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य शासनाने ५० कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहितीही त्यांनी दिली.
****
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त काल औरंगाबाद इथं अण्णाभाऊ यांच्या पुतळ्याला विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी अभिवादन केलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्रातर्फे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचं व्याख्यान झालं. पुढलं वर्ष अण्णाभाऊसाठेंचं जन्मशताब्दी वर्ष असून, विद्यापीठात त्यांचं पूर्ण साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल असं कुलगुरू येवले यांनी यावेळी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूरला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी शिवसेनेनं काल रास्ता रोको आंदोलन केलं. कळमनुरीचे तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांना याबाबत निवेदन सादर करून, आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्याच्या पाथरी तहसील कार्यालयातल्या अव्वल कारकुनाला काल लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. ज्ञानोबा सोनबा काळे असं या कारकुनाचं नाव असून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून सहा हजार रुपयांची लाच त्यानं मागितली होती. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यात पावसानं खंड दिला असून पीकं वाळून गेली आहेत सरकारनं भोकर तालूका दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर करावा. तसंच कृत्रिम पाऊस पाडावा या मागणीसाठी काल पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्यावतीनं तालुका प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं.
****
हिंगोली जिल्ह्याच्या अनेक भागात काल दुपारी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे खरीपाच्या पिकांना जीवदान मिळालं असून शेतकऱ्यामध्ये समाधानाचं वातावरण आहे.
****
परभणी शहरात काल प्लास्टिक बंदी मोहिम राबवण्यात आली. जुना पाथरी नाका ते जुन्या बस स्थानकापर्यंत असलेल्या अनेक दुकानांमधून प्लास्टिक पिशव्या जप्त करत जवळपास ५५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समित्यांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं बोलत होते. या संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी या तालुकास्तरीय समित्या गठित केल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मुंबईहून गोरखपुरला जाणाऱ्या अंत्योदय हमसफर गोरखपूर एक्सप्रेसचं एक चाक काल पहाटे इगतपुरी कासारा घाटात रुळावरून घसरलं, चालकानं यावेळी प्रसंगावधान दाखवल्यानं संभाव्य अपघात टळला. पहाटे साडे तीन वाजता ही घटना घडली. यामुळे या मार्गावरची वाहतुक विस्कळित झाली होती.
****

No comments:

Post a Comment