Saturday, 20 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.07.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२०  जुलै  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 सर्व केबल ऑपरेटर आणि डी टी एच वाहिन्यांनी दूरदर्शनच्या सर्व चोवीस वाहिन्या दाखवाव्यात, असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. केबल चालकांनी दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या दाखवणं कायद्यानं बंधनकारक असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. लोकसभा आणि राज्यसभा वाहिन्यांबरोबर दूरदर्शनच्या इतर सर्व वाहिन्या आम्ही प्रसारित करतो, अशा आशयाचं प्रतिज्ञापत्र सर्व केबल चालकांनी एका महिन्याच्या आत केंद्र सरकारला सादर करावं, असंही जावडेकर यांनी बजावलं आहे.
*****

 भारतीय रेल्वेनं कालपासून निमवैद्यकीय प्रवर्गासाठी सर्वात मोठी भरती सुरु केली आहे. एक हजार ९२३ जागांसाठी ही परीक्षा घेतली जात आहे. देशभरातल्या १०७ शहरांमधल्या ३४५ केंद्रावर चार लाख ३९ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांची यावेळी चाचणी होणार आहे.
*****

 महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी महावितरणच्या अकोला परिमंडळात कार्यरत दोन कार्यकारी अभियंते आणि सहा उपविभागीय अधिकाऱ्यांसह एकूण आठ वरिष्ठ अभियंत्यांना कामातली अनियमितता आणि कार्यालयीन बेशिस्तीचा आरोप लावत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या अभियंत्यांच्या कामात सुधारणा न झाल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा इशाराही घुगल यांनी दिला आहे.
****

 कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यात गडहिंग्लज आणि हलकर्णी तर चंदगड तालुक्यातल्या शिनोली इथं २ पूर्णांक ४२ मेगावॅट क्षमतेचे लघु सौर ऊर्जा प्रकल्प साकारले आहेत. काल या तिनही  प्रकल्पाचं लोकार्पण गडहिंग्लज इथल्या महावितरण विभागीय कार्यालय परिसरात करण्यात आलं. राज्य शासनानं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती करण्यासाठी केंद्र शासनाच्या ई ई एस एल कंपनीसोबत २०० मेगावॅट वीज खरेदीचा करार केला आहे.
*****
***

No comments:

Post a Comment