आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३१ जुलै २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय जनता पक्षात येणाऱ्या
इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला जात नसल्याचं, भाजप प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षातून बाहेर पडलेले आमदार तसंच पदाधिकारी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत,
त्यांच्या स्वागत कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या
उपस्थितीत शिवेंद्रराजे भोसले, मधूकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ यांच्यासह अनेक पदाधिकारी
आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
****
विधान परिषदेच्या औरंगाबाद
आणि जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने बाबुराव
उर्फ भवानीदास कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात
यांनी ही माहिती दिली. पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले कुलकर्णी यांचा औरंगाबाद आणि जालना
या दोन्ही जिल्ह्यात मोठा जनसंपर्क असल्यानं, त्यांना उमेदवारी दिल्याचं, थोरात यांनी
सांगितलं.
****
कोयना आणि वारणा
धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे सांगली जिल्ह्यात कृष्णा, वारणा आणि मोरणा
नद्यांचे पाणी अनेक ठिकाणी पात्राबाहेर पडले आहे. अनेक पूल, बंधारे आणि नदीकाठची पिकं
पाण्याखाली गेली आहेत. सांगली शहरालगत कृष्णानदीचे पाणी नागरी वसाहतीत घुसले आहे. त्यामुळे
पूरग्रस्त कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम लष्करीपातळीवर सुरू आहे. आज सकाळपर्यंत
कृष्णेची पाणी पातळी ३५ फुटापर्यंत पोहोचली आहे. कृष्णा
आणि वारणा नदीकाठावर असलेल्या लोकांना जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान आज सकाळी
वारणा धरणाचे चारही दरवाजे उघडले जाणार असल्याचं आमच्या वार्ताहराने कळवले आहे.
****
मराठवाड्यात बहुतांश
भागात आज सकाळपासून पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. औरंगाबाद परिसरात आज सकाळपासून
भीज पाऊस सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरात सूर्यदर्शनही झालेलं नाही. उस्मानाबाद,
लातूर तसंच नांदेड जिल्ह्यात आज सकाळपासून पाऊस सुरू आहे.
हिंगोली जिल्ह्यात रात्रीपासूनच संततधार पाऊस सुरू असून शेतकऱ्यांना समाधान देणारा
हा पाऊस ठरला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment