Saturday, 13 July 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 13.07.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
नवी दिल्लीत संसद भवनाच्या प्रांगणात दोन दिवसीय स्वच्छता अभियानाला आजपासून सुरुवात झाली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीप पुरी, आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह संसदेतले इतर अधिकारी आणि कर्मचारी यात सहभागी झाले. स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्याआधी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. सर्वांनी यावेळी स्वच्छतेबाबत प्रतिज्ञाही घेतली.
****
कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी विधानसभेत विश्वासमत सिद्ध करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून नाराज आमदारांपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न सुरू आहे. उपमुख्यमंत्री जी परमेश्वरा आणि जलसंधारण मंत्री डी के शिवकुमार यांनी गृहनिर्माण मंत्री एम टी बी नागराज यांची भेट घेऊन राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. त्याचप्रमाणे रामलिंग रेड्डी, मुनीरत्ना आणि रोशन बेग यांचंही मन वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री कुमारस्वामी किमान चार मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचंही सूत्रांनी म्हटलं आहे.
****
दूरसंचार कंपन्यांनी देशातल्या ग्राहकांना दर्जेदार, गतीमान आणि अबाधित सेवा द्यावी, असा आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिला आहे. अकोला इथं भारत संचार निगम लिमिटेड च्या कार्यालयात  खाजगी दूरसंचार ऑपरेटर आणि भारत संचार निगम लिमिटेड यांच्या सेवाविषयीच्या आढावा बैठकीत आज ते बोलत होते.
***
शैक्षणिक आणि औद्योगिक दृष्टीनं विकसित होत असलेल्या अमरावती इथल्या बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचं भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या विस्तारीकरणामुळे ७२ आणि ९० आसन क्षमता असलेली विमानं बेलोरा इथं उतरु शकतील. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी यवतमाळ बडनेरा पाणीपुरवठा योजना, विद्युत वाहिनी हलवणं आदी कामांचं लोकार्पण ही करण्यात आलं.
***
पशूवैद्यक क्षेत्राचा संतुलित प्रादेशिक विकास साधत असतांना विविध पशुवैद्यक क्षेत्रातल्या उद्योजकतेच्या संधी युवा पशुपालक, बेरोजगार तरुण तसंच ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचवण ही काळाची गरज असल्याचं मत पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नागपूर इथं ‘पशुवैद्यक शास्त्रातील प्रगती तसंच शेतकऱ्यांची समृध्दता’ या विषयावरील परिषदेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. पारंपरिक पुरक व्यवसायाच्या मर्यादांमुळे शेतीला सहाय्य व्हावं अशा प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. त्यावर मात करण्यासाठी पशुवैद्यक क्षेत्रातलं आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे, असं ते म्हणाले.
****
लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर पोलीस ठाण्यातला हवालदार उल्हास चव्हाण याला एक हजार रूपयांची लाच घेतांना आज लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहाथ पकडलं. पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी चव्हाण यानं पाच हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती एक हजार रूपये ठरल्यानंतर त्याला लाचेची रक्कम घेतांना पथकानं सापळा रचून अटक केली.
****
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर सुनील कदम यांची आज निवड करण्यात आली.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई-करजगावसह १७ गावांची पाणी योजना पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी राहुरी-शिंगणापूर रस्त्यावर सोनईकरांनी आज सकाळी रास्तारोको आंदोलन केलं. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे संबधीत गावं पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिली असल्याची टीका गडाख यांनी यावेळी केली.
****
विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटात रॉजर फेडररनं राफेल नदालचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला असून त्याची अव्वल मानांकित नोवाक जोकोविच याच्याशी उद्या लढत होणार आहे. दरम्यान, महिला एकेरीचा अंतिम सामना आज अकराव्या मानांकित सेरेना विल्यम्स आणि सातव्या मानांकित सिमोना हॅलेप यांच्यात होणार आहे.
****

No comments:

Post a Comment