Thursday, 1 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.08.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
मातंग समाजासाठी राज्य सरकारनं पंचवीस हजार घरं दिली असून आणखी पंचवीस हजार घरं लवकरच देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज मुंबईत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्यावरील टपाल तिकीट प्रकाशन समारंभात बोलत होते. राज्य सरकार मातंग समाजाला एक लाख घरं देणार असल्याच्या घोषणेचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या विचार आणि साहित्यातून वंचितांचा आवाज मांडला, त्यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त वंचितांसाठीच्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. चिरागनगर इथल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचं काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असून पुणे इथं लहूजी साळवे यांच्या स्मारकासाठी पाच एकर जमीन आरक्षित करण्यात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
लातूर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला आमदार अमित देशमुख, महापौर सुरेश पवार यांच्यासह सार्वजनिक जंयती उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यानी पुष्पहार घालुन अभिवादन केलं. जालना इथंही राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जयंती उत्सव समितीच्यावतीनं सकाळी शहरातून दुचाकी फेरी काढण्यात आली. परभणी शहर आणि जिल्ह्यातल्या विविध शाळा महाविद्यालयं आणि सामाजिक संघटनांच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथिनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाले.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज `महाजनादेश` यात्रेची सुरुवात अमरावती जिल्ह्यातल्या मोझरी इथं केली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या राज्यव्यापी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. मुख्यमंत्री फडणवीस या यात्रेच्या माध्यमातून बत्तीस जिल्ह्यांतल्या दिडशे विधानसभा क्षेत्रातून सुमारे चार हजार ३७४ किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी गुरूकुंज मोझरी इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी स्थळी अभिवादन केलं.
****
लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमीत्त आज विधानभवनातील आदरांजली कार्यक्रमात विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गो-हे यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केलं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक ऑगस्ट १९२० रोजी स्थापन झालेल्या औरंगाबाद शहरातल्या औरंगपुरा इथल्या  बलवंत वाचनालयाच्या शताब्दी महोत्सवाला  आज सुरवात झाली. यावेळी माजी न्यायमूर्ती  नरेंद्र चपळगावकर, सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाचक आणि  मान्यवर सभा घेण्यात आली.  बलवंत वाचनालय शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी शासनातर्फे दोन लाख रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी अध्यक्षीय भाषणात केली.
****
औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेना - भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवेसना -भाजप मित्रपक्षांच्या युतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी शहरातल्या क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्यातील शिवसेना, भाजपचे नगरसेवक, तसंच जिल्हा परिषद सदस्य यावेळी प्रमुख उपस्थित होते.
****
औरंगाबादच्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळीत पाच टक्क्यांपर्यत पोहोचली आहे. धरण क्षेत्रात चाळीस हजार घनफूट प्रती सेकंद - क्यूसेक क्षमतेनं पाणी दाखल होत आहे. यामध्ये नागमठाण, गंगापूर, वलवडी, दारणा, पालखेड आणि कडवा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचं जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी म्हटलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात आतापर्यंत खूप कमी पाऊस झाला असून जिल्ह्यात भीषण टंचाईची परिस्थिती आहे. जिल्हा प्रशासनामार्फत यावरील सर्व उपाययोजना प्रभावीपणे  राबवल्या जात असून प्रशासन या कालावधीत लोकांच्या सोबत असल्याचं लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी म्हटल आहे. ते विस्तारित समाधान योजनेंतर्गत संपर्क, संवाद आणि समाधान अभियानांतर्गत जिल्ह्यातल्या तांदुळजा इथं बोलत होते. या टंचाईच्या काळात ग्रामस्थांनी खचून न जाता धीर धरावा असं आवाहनही लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं.
****
परभणी इथं आज महसूल दिनानिमित्त सेलू आणि जिंतूर तालुक्यातं उत्कृष्ट काम करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारी तसंच महसूल कर्मचारी आणि पोलिस पाटील यांचा महसूल दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.
****

No comments:

Post a Comment