Friday, 2 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.08.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०२ ऑगस्ट  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार रवीशकुमार यांना मिळाला आहे. निवड समितीनं आज ट्वीट करून रवीशकुमार यांच्यासह एकूण पाच जणांना हा पुरस्कार देत असल्याचं जाहीर केलं. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक असलेले रवीशकुमार यांचा प्राईम टाईम हा कार्यक्रम वास्तवाची ओळख करून देणारा, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा असल्याचं, या बाबतच्या पत्रात म्हटलं आहे.
****
अयोध्या जमीन विवाद प्रकरणी मध्यस्थाच्या अहवालावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशानुसार सदस्यीय मध्यस्थ मंडळानं आपला अहवाल बंद लिफाप्यात काल सादर केला. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस अब्दूल नझीर यांच्या घटनापीठापुढं या प्रकरणाची सुनावणी होत आहे.
****
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला राज्यसभेनं काही दुरुस्त्यांसह मंजुरी दिली आहे. त्यामुळे हे विधेयक लोकसभेत पुन्हा मंजुरीसाठी येईल. १९५६ च्या भारतीय वैद्यकीय परिषद कायद्यात सुधारणा करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. गुणवत्तापूर्ण आणि सर्वसामांन्याच्या आवाक्यातलं वैद्यकीय शिक्षण उपलब्ध व्हावं, देशाच्या सर्व भागांमधे चांगल्या दर्जाचे, पुरेसे वैद्यकीय व्यावसायिक उपलब्ध व्हावेत, तसंच आरोग्य सुविधा सार्वत्रिक आणि समान मिळाव्यात यादृष्टीनं प्रोत्साहनपर तरतूदी करणं हा या विधेयकाचा हेतू आहे.
****
जनतेचा पाच वर्ष पाठींबा हीच खरी पावती असून आम्ही जनतेप्रती उत्तरदायी असल्याचं,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजपची महाजनादेश यात्रा आज वर्धात पोहोचली, याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विरोधकांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला दोष देण्याएवजी आत्मचिंतन करावं, असं ते म्हणाले. भारतीय जनता पक्षात आता कुणालाही प्रवेश मिळणार नसून, आता जागा संपली आहे, शिवसेना आणि मित्रपक्षांसोबतचा जागावाटपाचा मुद्दा वाद न होता सुटेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
****

No comments:

Post a Comment