Sunday, 4 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.08.2019 07.10AM

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०४ ऑगस्ट  २०१ सकाळी ७.१० मि.
****

v भारतात घुसखोरी करणारे पाकिस्तानी सीमा कृती दलाचे पाच ते सात ठार; छत्तीसगडमध्येही सात नक्षलवाद्यांचा खात्मा
v स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या इतर मागास प्रवर्गाचं आरक्षण कमी होणार नाही- मुख्यमंत्र्यांची ग्वाही
v राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस; नदी नाल्यांना पूर
 आणि
v थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकराज रानिकरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक
****

 पाकिस्तानमधून भारता घुसखोरी करू पाहणाऱ्या पाकिस्तानी सीमा कृती दलाच्या पाच ते सात जणांना काल भारताच्या सैनिकांनी ठार केलं. सीमारेषेवरील केरन क्षेत्रात काल रात्री ही कारवाई करण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यांनं दिली.

 पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यात तसंच अमरनाथ यात्रेदरम्यान सातत्याने अशांतता पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. बारामुल्ला आणि शोपियान या दोन जिल्ह्यांत सुरक्षा दलांशी झालेल्या वेगवेगळ्या चकमकींमध्ये काल चार दहशतवादी ठार झाले. जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेसाठी ते काम करत असल्याची माहितीही प्रवक्त्यांनी दिली.

 दरम्यान, महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या छत्तीसगडमधल्या राजनंदगाव जिल्ह्यात काल सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यात पाच महिलांचा समावेश आहे. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलवादविरोधी विशेष दलाच्या जवानांनी ही कारवाई केली. यावेळी काही शस्त्रसाठाही जप्त करण्यात आल्याचं संबंधित अधिकाऱ्यानं सांगितलं.

 अमरनाथ यात्रेकरु आणि पर्यटकांनी तातडीनं माघारी फिरावं अशा जारी केलेल्या सूचना, केवळ सुरक्षाविषयक उपाययोजना म्हणून जारी केल्या असल्याचं, जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे.

 दरम्यान, लातूर जिल्ह्यातून अमरनाथ यात्रेला गेलेल्या यात्रेकरूंची नावं तहसील कार्यालयाकडे द्यावीत, असं आवाहन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी केलं आहे.
****

 नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेनं सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना दंड ठोठावला आहे. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसिज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया यांना प्रत्येकी दिड कोटी रूपये, तर अलाहाबाद आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांना प्रत्येकी दोन कोटी रूपये दंड ठोठावण्यात आल्याचं आरबीआयनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
****

 स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या इतर मागास प्रवर्गाचं आरक्षण कमी होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. सरकारनं यासंदर्भात नुकत्याच जारी केलेल्या अध्यादेशाच्या अनुषंगानं त्यांनी ही बाब स्पष्ट केली. राज्यात आरक्षणाचं प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक होत असल्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती, या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थामधल्या इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सरकारनं एक अध्यादेश जारी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या आधारे सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष या पदांसाठी सत्तावीस टक्के आरक्षण लागू आहे.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे.
****

 राज्याच्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले असून नदी काठच्या लोकांना स्थानिक प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे.

 नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसामुळे बहुतांशी धरणांमधून नद पात्रात पाणी सोडण्यात आलं आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं गंगापूर धरणातून १४ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाणी नदी पात्रात सोडण्यात आलं आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे.

 अहमदनगर जिल्ह्यातलं भंडारदरा धरणातून सध्या चार हजार घनफूट प्रतीसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे. हे पाणी निळवंडे धरणात दाखल होणार असून निळवंडे धरण भरल्यानंतर प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं.

 दरम्यान, जायकवाडी धरणात सध्या ३२ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद  पाण्याची आवक होत असून पाणीसाठा १२ टक्क्यांपर्यंत गेल्याचं जायकवाडी पाटबंधारे विभागानं कळवलं आहे. गोदावरी नदीचा वाढता प्रवाह लक्षात घेता, नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा  इशारा देण्यात आला आहे.

 नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. जिल्ह्यातल्या किनवट हिमायतनगर आणि नांदेड  तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बिलोली आणि हिमायतनगर तालुक्यात दोघं जण वेगवेगळ्या घटनात  पुराच्या पाण्यात बुडून मरण पावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कयाधू नदी दुथडी भरून वाहत आहे. कळमनुरी तालुक्यातल्या नांदापूरजवळ रेल्वे पुलाखाली पाणी आल्यामुळे रहदारी बंद झाली आहे, तर वसमत तालुक्यात लोण शिवारातल्या रेल्वे पुलाखाली पाणी साचल्यामुळे चार गावांचा रस्ता बंद झाला आहे. कळमनुरी तालुक्यातल्या सांडस इथला पूल वाहून गेल्यामुळे रहदारी बंद झाली असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. पूर परिस्थिती कमी होईपर्यंत नागरिकांनी पुलावरून रहदारी करू नये असंही प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे.

 कोल्हापूर जिल्ह्यातही सम्तातधार पावसानं पंचगंगानदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

 मुंबई महानगर आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. काल दिवसभर रेल्वेसेवा ठप्प झाली होती. पावसामुळे वेगेवेळ्या घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

 दरम्यान, देशभरात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम असून, येत्या २४ तासात १५ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस होण्याची शक्यता विभागानं वर्तवली आहे.
****

 प्रत्येक कवी बाऊल अर्थात भटका असतो, जो बाऊल होऊ शकत नाही, तो कवी होऊ  शकत नाही, असं मत कवी इंद्रजीत भालेराव यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं प्रसिद्ध कवि, अभिनेते सौमित्र यांच्या बाऊल या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत काल होते. सौमित्र यांचा कवि, अभिनेता म्हणून असा संवेदनशील प्रवास भालेराव यांनी यावेळी प्रेक्षकां समोर मांडला. सौमित्र अर्थात किशोर कदम यांनी यावेळी कवितांचं सादरीकरण केलं.  
****
 थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकराज रानिकरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय जोडीनं कोरियाच्या जोडीचा पराभव केला. विजेतेपदासाठी चीनच्या ली जून हुई आणि लियु यु चेन या जोडीशी भारतीय जोडीचा आज सामना होणार आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला काल फ्लोरिडा इथं झालेला पहिला सामान भारतानं चार गडी राखून जिंकला. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम वेस्ट इंडिज संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. वेस्ट इंडिजनं निर्धारित २० षटकात ९ बाद ९५ धावा केल्या. भारताच्या नवदिप सैनीनं तीन तर भुवनेश्वर कुमारनं दोन बळी घेतले. भारतानं हे आव्हानं १८व्या षटकात चार गडी राखत पूर्ण केलं. मालिकेतला दुसरा सामना आज फ्लोरिडा इथंच होणार आहे.
*****
***

No comments:

Post a Comment