Monday, 5 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.08.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०५ ऑगस्ट  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 केंद्रीय मंत्रिमंडळाची आज सकाळी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या घडामोडींबाबत या बैठकीत चर्चा होऊन, काही महत्त्वाचे निर्णय घेतले असण्याची शक्यता पीटीआयच्या बातमीत वर्तवली आहे. काश्मीर खोऱ्यातली सुरक्षा गेल्या आठवड्यात वाढवण्यात आली आहे. अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली असून, सर्व यात्रेकरू आणि पर्यटकांना काश्मीरसोडून जाण्यास सांगण्यात आलं आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था एनआयटीच्या श्रीनगर शाखेतल्या विद्यार्थ्यांनाही तत्काळ आपापल्या घरी परत जाण्याचे तसंच सूचना मिळेपर्यंत परत न येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट तसंच मोबाईल सेवा खंडीत करण्यात आली आहे. अनेक भागात संचारबंदी तर काही भागात जमावबंदी आदेश लागू आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला तसंच मेहबुबा मुफ्ती यांना त्यांच्या निवासस्थानी स्थानबद्ध करण्यात आलं असून, काँग्रेस नेता उस्मान माजीद तसंच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार एम वाय तारिगामी यांना काल रात्री अटक केल्याचं वृत्त आहे.
****

 नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाकडे येणारा पाण्याचा ओघ कमी झाला आहे. सध्या बंधाऱ्यातून सुमारे दोन लाख घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडलं जात आहे. रात्री हे प्रमाण सुमारे तीन लाख घनफूट प्रतिसेकंद एवढं झालं होतं.

गंगापूर तसंच दारणा धरणातून पाणी सोडण्याचं प्रमाण कमी करण्यात आलं आहे. आज सकाळी ९ वाजता जायकवाडी धरणातील पाणीसाठा जवळजवळ २२ टक्के झाला आहे.

 अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यात भीमानदी तसंच घोडनदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यामुळे, अहमदनगर-दौंड मार्गावरचा भीमा नदीवरचा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतुक सध्या बंद करण्यात आली आहे.

 मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरची उपनगरीय सेवा हळूहळू पूर्व पदावर येत आहे. मात्र कर्जत तसंच टिटवाळा ते कसारा या मार्गांवर रेल्वे सेवा अजूनही बंद आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं ट्विटरवरून दिली आहे.

 कसारा घाटात मुंबई नाशिक महामार्गावरचा एक रस्ता खचल्यामुळे वाहतूक एकेरी मार्गानं सुरु आहे.

 औरंगाबाद शहर परिसरातही पहाटेपासून पाऊस सुरू आहे.
*****
***

No comments:

Post a Comment