Monday, 5 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.08.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 August 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ ऑगस्ट २०१९ दुपारी .०० वा.
****

 जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत सादर केलं. या विधेयकातल्या तरतुदींनुसार, जम्मू काश्मीरचं विभाजन होऊन, जम्मू काश्मीर हा विधानसभा असलेला केंद्रशासीत प्रदेश असेल, तर लद्दाख हा विधानसभा नसलेला केंद्रशासीत प्रदेश असेल. या विधेयकात दुरुस्त्या सुचवण्यासाठी सभापतींनी सर्व सदस्यांना अर्धा तासाची मुदत दिली होती. तसंच या विधेयकावर चर्चेसाठी सभापतींनी चार तासांचा अवधी निश्चित केला आहे.

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत, हे विधेयक सादर करताच, काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरून या विधेयकाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी या विधेयकाचा पूर्ण विरोध करत असल्याचं सांगितलं.

 पीपल्स डेमोक्रेटीक पक्षाच्या दोन खासदारांनी, या विधेयकाचा विरोध करत, भारतीय संविधानाची प्रत फाडण्याचा प्रयत्न केला. सभापतींनी सदनात मार्शल बोलावून या दोन्ही खासदारांना सदनातून बाहेर काढलं.

 दरम्यान, विधी आणि न्याय मंत्रालयानं, जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याबाबतची सूचना जारी केली आहे. बहुजन समाज पार्टी, बिजू जनता दलाच्या सदस्यांनी कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.

 शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, या विधेयकाचं स्वागत करत, गेल्या सत्तर वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला निर्णय घेतल्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलं.

 जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय भारतीय उपमहाखंडासाठी विनाशकारी ठरेल, असा इशारा पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या प्रमुख महबुबा मुफ्ती यांनी दिला आहे. काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री असलेल्या महबुबा मुफ्ती यांच्यासह फारुख अब्दुल्ला तसंच उमर अब्दुल्ला या माजी मुख्यमंत्र्यांना काश्मीरमधल्या त्यांच्या निवासस्थानी कालपासून स्थानबद्ध करण्यात आलं आहे.
****

 दरम्यान, जम्मू काश्मीरच्या मुद्यावरून लोकसभेतही विरोधी पक्षांनी गदारोळ केला. अध्यक्षांनी या गदारोळातच विविध विधेयकांची पुनर्स्थापना तसंच त्यावर चर्चा सुरू ठेवली.
****

 नवीन संसद भवन उभारण्याबाबतचा प्रस्ताव संसदेच्या दोन्ही सदनात आज सादर करण्यात आला. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी, तर राज्यसभेत सभापती व्यंकय्या नायडू यांनी वाचून दाखवला. स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनापर्यंत अर्थात पुढच्या तीन वर्षांत नवीन संसद भवनाचं काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा या प्रस्तावातून व्यक्त करण्यात आली.
****

 काँग्रेसचे माजी नेते सज्जनकुमार यांच्या विरोधात दाखल असलेल्या १९८४ च्या शीख दंगलीबाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय २०२० च्या मे महिन्यात सुनावणी घेणार आहे. न्यायाधीश एस ए बोबडे आणि बी आर गवई यांच्या पीठानं आज झालेल्या सुनावणीत पुढच्या सुनावणीची तारीख निश्चित केली. उच्च न्यायालयाने ७३ वर्षीय सज्जनकुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यापासून ते कारागृहात आहेत.
****

राज्यातल्या पूरस्थितीवर आपलं पूर्ण लक्ष आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावेळी ते बोलत होते. आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी केलेल्या कामगिरीचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केलं. राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे नक्षली चळवळीला हादरा बसला आहे असं ते यावेळी म्हणाले. नक्षली चळवळीतल्या सर्वांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहनही त्यांनी केलं. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्हांमधल्या सिंचन प्रकल्पांचं काम पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, तसंच लवकरच इथल्या लोहमार्गाचं कामही पूर्ण केलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. 
****

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर आज सुद्धा कायम आहे. पावसासोबत वादळी वारे वाहत असल्याने पडझडीच्या घटना सुरू आहेत. आज सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात १११.३ मिलिमीटर पाउस पडला आहे. पावसामुळे जिल्हातील बरेच पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 दरम्यान रायगड जिल्हयातही काल रात्रभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी सावित्री नदीला पुन्हा मोठा पूर आला असून हे पाणी पुन्हा एकदा  महाड शहरात घुसले आहे.
****

 परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यातल्या महिला बचत गटांच्या नाविन्यपूर्ण व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी - हिरकणी नव उद्योजक महाराष्ट्राची - ही स्पर्धा काल पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. महाराष्ट्र शासनाच्या उमेद अभियानाच्या या संधीचा महिलांनी लाभ घेत समुहासह स्वतःचा विकास साधण्याचं आवाहन तहसीलदार अशिष बिरादार यांनी केलं.
*****
***

No comments:

Post a Comment