आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०६ ऑगस्ट २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
जम्मू काश्मीर पुनर्गठन
विधेयक आज लोकसभेत सादर होईल. या विधेयकावर चर्चा करून ते संमत करण्यासाठी विचारात
घेण्याला काल सदनानं मान्यता दिली. या विधेयकासोबतच जम्मू काश्मीर आरक्षण संशोधन विधेयकही
आज लोकसभेत सादर होईल.
दरम्यान, ही दोन्ही विधेयकं काल राज्यसभेत १२५ विरुद्ध ६१ मतांनी
संमत झाली. या विधेयकामुळे काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द होणार
असून, देशभरात लागू असलेले सर्व कायदे जम्मू काश्मीरमध्येही लागू होतील. जम्मू काश्मीरचं
विभाजन होणार असून, जम्मू काश्मीर हा विधानसभा असलेला केंद्रशासीत प्रदेश तर लद्दाख
हा विधानसभा नसलेला केंद्रशासीत प्रदेश होणार आहे.
****
सर्वोच्च न्यायालय आजपासून अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी
मशीद प्रकरणी नियमित सुनावणी करणार आहे. या संदर्भात
नेमलेल्या मध्यस्थता समितीकडून निर्धारित मुदतीत कोणताही
समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे आता या प्रकरणी दररोज सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
****
नाशिक तसंच अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झालेला असला, तरी तिथल्या धरणांतून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येत असल्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत
मोठी वाढ होत आहे. सध्या धरणात सुमारे एक
लाख चाळीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. सकाळी
९ वाजेर्यंत धरणातला पाणीसाठा ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
****
राज्य महिला आयोगामार्फत लातूर जिल्ह्यात औसा आणि निलंगा इथं प्रज्ज्वला योजनेंतर्गत महिला बचत गटातल्या महिलांकरिता कायदेविषयक तसेच सामाजिक
आणि आर्थिक प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या
हस्ते काल करण्यात आलं. राज्यात सर्वाधिक २४ कोटी रुपयांचा निधी
महिला बचत गटांसाठी लातूर जिल्हयाला मिळाला असून, या पुढील काळात जिल्ह्यातल्या महिला बचत गटांना
शून्य टक्के दरानं कर्ज पुरवठा करणार असल्याचं पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment