Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 09 August
2019
Time
1.00 to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ ऑगस्ट २०१९ दुपारी १.०० वा.
****
सर्वोच्च
न्यायालयात सुरू असलेल्या अयोध्या राम जन्मभूमी जमीन विवाद प्रकरणी आठवड्यात पाच दिवस
सुनावणी घेण्याला मुस्लीम गटानं नापसंती दर्शवली आहे. आठवड्यातल्या सर्व दिवसात घाई
गडबडीने सुनावणी होणार असेल तर कोर्टाला सहकार्य करणं शक्य नसल्याचं या गटाचे वकील
राजीव धवन यांनी आज न्यायालयाला सांगितलं. या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण
करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं, गेल्या मंगळवारपासून दररोज सुनावणीचा निर्णय घेतला
आहे, यानुसार सुनावणीचा आज चौथा दिवस आहे.
****
रेल्वे तिकिटांच्या ऑनलाईन बुकिंगवर सेवाकर लावण्याचा निर्णय
भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ आयआरसीटीसी ने पुन्हा लागू केला आहे. डिजिटल
व्यवहारांना चालना देण्यासाठी हा सेवा कर तीन वर्षांपूर्वी रद्द करण्यात आला होता.
त्यापूर्वी वातानुकुलीत तिकिटांच्या ऑनलाईन बुकिंगवर दर तिकिटामागे चाळीस रुपये तर
साध्या तिकिटांच्या ऑनलाईन बुकिंगसाठी दर तिकिटामागे वीस रुपये सेवा कर आकारला जात
होता.
****
तामिळनाडूत वेल्लोर लोकसभा मतदार संघात गेल्या सोमवारी पाच ऑगस्टला
झालेल्या मतदानाची मोजणी आज होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, वेल्लोर मतदार संघात
आयकर विभागाच्या धाडीत मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी रोकड सापडल्यामुळे, या मतदार संघाची
निवडणूक रद्द करण्यात आली होती.
****
बेरोजगारी आणि उद्योग क्षेत्रातल्या मंदीवरून महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. आज मुंबईत
पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, राज ठाकरे यांनी, देशासमोरच्या प्रश्नांवरून लक्ष
विचलित करण्यासाठी, कलम ३७०, राम मंदीर, समान नागरी कायदा, असे मुद्दे समोर आणले जात
असल्याची टीका केली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमुळे देशातल्या ३७१ मतदार संघात मतांचा
घोळ झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला. काश्मीरप्रमाणे महाराष्ट्राचेही
तुकडे पाडले जातील, अशी शक्यता ठाकरे यांनी व्यक्त केली.
****
इलेक्ट्रॉनिक
मतदान यंत्रांमध्ये फेरफार केली जात असल्याचा आरोप करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस
आणि डाव्या पक्षांनी आज नाशिकमधे निदर्शनं केली. ९ ऑगस्ट या क्रांती दिनाचं औचित्य
साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं. या पुढच्या
सर्व सार्वत्रिक निवडणूका मतपत्रिकांवरच घेण्याची मागणी करत, लोकशाही वाचवा अशा घोषणा
देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नंदुरबार
जिल्ह्यात कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या सर्व प्रमुख नद्यांना पूर
आला आहे, तापी , गोमाई, रंगावली, सुसरी, खर्डी, वरखेडी या सर्व नद्या धोक्याच्या पातळीवर
वाहत आहे. पावसामुळे वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. काल रात्री पासून
शहादा शहाराला वीज पुरवठा करणाऱ्या उप केंद्रामध्ये पाणी शिरल्यानं शहराचा वीज पुरवठा
खंडीत झाला आहे, अनेक नद्या, नाल्यांवरुन पाणी वाहत असल्यानं जिल्ह्यातली बससेवा बंद
ठेवण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
धुळे
शहरातही पावसामुळे आज शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातून इतर गावी जाणाऱ्या
बस गाड्यांच्या अनेक फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातले नऊ मध्यम प्रकल्प
ओसंडून वाहत आहेत
****
अमरावती
जिल्ह्यात गेल्या २४ तासापासून सातत्यानं पाऊस कोसळत आहे, नदी-नाल्यांच्या पुलावरून
पाणी वाहत असल्यानं जिल्ह्यातील १३ मार्ग काल सकाळपासून बंद आहेत. प्रमुख राज्यमार्ग
बंद असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
त्याचप्रमाणे दर्यापूर तालुक्यातल्या सांगोला इथले जलसंधारण विभागाची शेततळी फुटल्यानं
सुमारे दोनशे एक्कर जमिनीवरची पिके वाहून गेली आहेत. मेळघाटाच्या धारणी तालुक्यातील
चारही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं तापी आणि गडा नदीवरील पूलं पाण्याखाली
गेली आहेत, पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे
पथकं पोहोचली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी केरळच्या पुर परिस्थीतीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्याशी फोन वर संपर्क केल्याचं वृत्त आहे. वायनाडसहित केरळच्या पुरानं प्रभावित झालेल्या भागाला मदतीची मागणी त्यांनी
केली. पंतप्रधान मोदी यांनी पूर स्थीतीवर लागेल ती मदत करण्याचं
आश्वासन दिलं आहे, असं राहुल गांधी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.
****
अमरावती विभागातील बँकांनी खरिपासाठी दिलेल्या कर्जवाटपाच्या
फक्त २७ टक्के एवढंचं कर्ज वाटप केलं असून कर्ज वाटपाची मागणी शेतकरी करत आहेत. प्रशासनाने
बँकांना आदेश देऊऩही बॅँका कर्जवाटप करत नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment