Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -११ ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø आपत्ती व्यवस्थापनासाठी कार्यक्षम यंत्रणा उभी करण्याची
मुख्यमंत्र्यांची घोषणा
Ø कोल्हापूर आणि सांगलीतल्या
पुराचं पाणी ओसरून परिस्थिीत सुधारणेला सुरुवात
Ø
मराठवाड्यासह राज्यभरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा
ओघ सुरू
Ø
काँग्रेस पक्षाच्या
हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांची निवड
आणि
Ø
जॉर्जिया तबलिसी
ग्रां प्री कुस्ती स्पर्धेत भारताच्या बजरंग पुनियाला सुवर्ण पदक
****
पूरस्थितीचं गांभीर्य
लक्षात घेऊन, आपत्ती व्यवस्थापनासाठी एक कार्यक्षम यंत्रणा उभी केली जाईल असं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल सांगलीत पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर
ते बोलत होते.
सांगली जिल्ह्यात गेल्या नऊ दिवसांत वार्षिक सरासरीच्या
सातशे पंचाऐंशी टक्के पावसाची नोंद झाली. दोन हजार पाच साली आलेल्या पुराच्यावेळी पावसाचं
प्रमाण वार्षिक सरासरीच्या दोनशे सतरा टक्के असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोल्हापुरात
दोन हजार पाच साली झालेल्या एकशे एकोणसाठ टक्के पावसाच्या तुलनेत यंदा चारशे ऐंशी टक्के
पाऊस नोंदवला गेल्याची माहिती त्यांनी दिली. या अभूतपूर्व पावसामुळे साडे सत्तावीस
हजार हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं असून, चारशे चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीचे रस्ते
खराब झाले आहेत. पूर ओसरल्यावर पाणी पुरवठा आणि विद्युत पुरवठा ही दोन कामं प्राधान्यानं
केली जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
पुराच्या पाण्याची पातळी पहिल्या दोन दिवसांत वाढत
असल्यानं, सरकारी मदत पोहोचण्यास उशीर झाला, पूरग्रस्तांसाठी मदतीची रक्कम वाढवण्यात
आली, मदतीचे निकष सात दिवसांवरून दोन दिवस केले, याचा अर्थ दोन दिवस पाण्यातच असलं
पाहिजे असं नाही, असे विविध मुद्यांवरचे खुलासेही मुख्यमंत्र्यांनी केले. मोफत धान्य
वितरणाच्या पाकिटांवर छायाचित्रांची आवश्यकता नव्हती, ही बाब मुख्यमंत्र्यांनी मान्य
केली. पुराच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुका पुढं ढकलायच्या किंवा
नाही याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी
मात्र, पूरग्रस्त भागातली स्थिती पूर्वपदावर येण्यास बराच अवधी लागू शकतो, त्यामुळे
सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता असलेल्या या निवडणुका पुढच्या वर्षापर्यंत
पुढे ढकलाव्यात, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, पूरग्रस्तांसाठी वाटपाच्या धान्याच्या पाकिटांवर
मुख्यमंत्री आणि आमदाराचा फोटो छापल्याबद्दल, राज ठाकरे यांच्यासह विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर
कडाडून टीका करण्यात आली. हा प्रकार अत्यंत घृणास्पद असून, सत्ताधारी पक्ष या माध्यमातून
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची जाहिरात करत असल्याचं, विरोधकांनी म्हटलं आहे.
कधी आणि कुठे जाहिरात करावी, याचं भान असलं पाहिजे,
असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं, तर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते
धनंजय मुंडे यांनी, सरकार पूरग्रस्तांना मदत देण्यापेक्षा स्वत:च्या जाहिरातीला प्राधान्य
देत असल्याचं म्हटलं.
या पाकिटांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह
इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर यांचं छायाचित्र आहे. ही पाकिटं सरकारकडून आलेली मोफत
मदतीची पाकिटं आहेत, हे स्पष्ट व्हावं, यासाठी पाकिटांवर स्टीकर्स चिकटवलेली असल्याचं
सांगत, हळवणकर यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले.
****
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी माणसानं एकी दाखवून
या संकटावर मात करण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं
आहे. ते काल सातारा जिल्ह्यातल्या पूरग्रस्त गावांत नागरिकांच्या भेटीनंतर बोलत होते.
महाराष्ट्रानं गुजरात, बिहार आणि आसाम सारख्या राज्यांना अनेकदा मदत केली, त्या मदतीची
परतफेड करण्याची ही वेळ असल्याचं पवार म्हणाले. पूरग्रस्तांना राज्य आणि केंद्र सरकारकडून
अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करू, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
****
कोल्हापूर आणि सांगली
जिल्ह्यातल्या पूरस्थितीत सुधारणा होत असल्याचं, प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. पुराच्या
पाण्याची पातळी हळूहळू कमी होत असल्याची माहिती कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख
यांनी दिली आहे.
कर्नाटकच्या
अलमाट्टी धरणातून ५ लाख दशलक्ष घनमीटर प्रतिसेकंद या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे
आणि राधानगरी धरणाचे स्वयंचलित ४ दरवाजे खुले असल्याची अशी माहिती पाटबंधारे विभागानं
दिली आहे.
कोल्हापूर आणि सांगली
जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत सव्वा चार लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित
स्थळी हलवण्यात आलं असून, तीनशे सहा छावण्यांमधून पूरग्रस्तांची निवासाची सोय करण्यात
आली आहे. या तात्पुरत्या निवाऱ्यांमधून नागरिकांना स्वच्छ पाणी, जेवणाची व्यवस्था आणि
औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. पूरग्रस्त भागात ३२५ वैद्यकीय पथकं कार्यरत असून
आवश्यक औषधांसह आणि पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनच्या एक कोटी गोळ्यांचं वाटप केलं जात
आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत
केलं जात आहे.
****
सांगली आणि कोल्हापूरसह
राज्याच्या अन्य भागातल्या पुराच्या पार्श्वभूमीवर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात
पुढे येत आहे. शिर्डीतल्या साईबाबा न्यासानं पूरग्रस्तांना दहा कोटी रुपयांची मदत जाहीर
केली आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून
सांगली आणि कोल्हापूर इथल्या पूरग्रस्तांना २५ लाख रुपये रोख रक्कम, २५ लाख रुपये किंमतीच्या
वस्तू अशी एकूण ५० लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असल्याची
माहिती उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यात पूरग्रस्तांच्या
मदतीसाठी काल ठिकठिकाणी मदत फेरी काढण्यात आली. आखाडा बाळापूर इथं विविध शैक्षणिक आणि
सामाजिक संस्थांनी फेरी काढून मदत जमा केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली.
अंबाजोगाई शहरातूनही
काल पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली. औरंगाबाद शहरातही क्रांतीचौक परिसरात काल
सामाजिक संघटनांनी पूरग्रस्तांसाठी मदत संकलित केली.
पूरग्रस्तांना मदत म्हणून
एका महिन्याचं मानधन देण्याचा निर्णय मुंबईतल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतला आहे,
काँग्रेसचे आमदार आणि खासदार एका महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी देणार आहेत.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित
अधिकारी संघानं एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री मदत निधीला देणार असल्याचं सांगितलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यात विविध
संघटना पक्ष यांच्याकडून पूरग्रस्तांना मदत गोळा करण्याचे सुरू आहे . शिर्डी शहरातूनही
पोलिस विभाग, विमानतळ कर्मचारी तसंच शिर्डी शहर परिसरातले नागरिकही या अभियानात सहभागी
झाले आहेत.
****
पूरपरिस्थितीमुळे वैद्यकीय
अभ्यासक्रमाच्या एमबीबीएस, बीडीएसच्या दुसऱ्या फेरीच्या तसंच बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएसच्या
पहिल्या फेरीतल्या प्रवेश प्रक्रियेसाठी १२ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन तसंच राज्याच्या सीईटी विभागाकडे निवेदनाद्वारे
ही मागणी केली होती.
****
काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड
करण्यात आली आहे. काल झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीची बैठकीत अध्यक्षपदासाठी कुठल्याही
नेत्याच्या नावावर एकमत न झाल्यानं सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची
सूत्र सोपवण्यात आली.
लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा
राजीनामा दिला होता, तसंच गांधी कुटुंबातली कुठलीही व्यक्ती काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार
नाही, असंही स्पष्ट केलं होतं.
****
जॉर्जिया इथं सुरु झालेल्या
तबलिसी ग्रां प्री कुस्ती स्पर्धेच्या पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात भारताच्या बजरंग
पुनियानं सुवर्ण पदक पटकावलं आहे. अंतिम फेरीत त्यानं इराणच्या पेइमन बिब्यानी याला
हरवलं. बजरंगचं या हंगामातलं हे चौथं सुवर्ण पदक असून गेल्या वर्षीही त्यानं या स्पर्धेचं
सुवर्ण पदक पटकावलं होतं.
****
भारत आणि वेस्ट इंडिज
दरम्यान सुरु असलेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या मालिकेतला दुसरा सामना आज
त्रिनिदाद इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामना सुरू होईल.
गेल्या गुरुवारी आठ तारखेला गयाना इथं झालेला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला.
****
सुशिक्षित तरुणांनी कौशल्य
विकसित करून उद्योजक बनावं, असं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केलं
आहे. काल परभणी इथं दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीज - डिक्की च्या कार्यालयाचं
उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेती उत्पादनावर आधारित
प्रक्रिया उद्योग डिक्कीच्या माधमातून सुरू करावेत, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
आयुर्वेदात नवनवीन संशोधनाची
गरज नांदेड इथल्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर यशवंत पाटील यांनी
व्यक्त केली आहे. आयुर्वेद डॉक्टरांसाठी नांदेड इथं घेण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय
शोध निबंध स्पर्धेत ते काल बोलत होते. आयुर्वेदात संशोधनासाठी महाराष्ट्र वैद्यकीय
विद्यापीठानं सुमारे १ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई-लातूर
रस्त्यावर काल झालेल्या ३ वाहनांच्या अपघातात २ जण ठार तर ५ जण जखमी झाले. २ कार आणि
एक रिक्षा एकमेकांवर आदळल्यानं हा अपघात झाला. यामध्ये एका दाम्पत्याचा मृत्यू झाला.
लातूर जिल्ह्यातल्या
जळकोट इथं झालेल्या अन्य एका अपघातात, ट्रक उलटून २ जण जागीच ठार झाले. मालवाहू ट्रकचालकाचा
वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या या अपघातात, ट्रकचालकासह एकाचा मृत्यू झाला.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी
इथं विक्रीसाठी आणलेला २३ लाख रुपये किमतीचा गुटखा अंबाजोगाईच्या विशेष पोलीस पथकानं
पकडला. गुरुवारी रात्री उशीराही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात
आली असून, ट्रकमालक आणि गुटखा व्यापारी मात्र फरार झाले आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment