Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 August 2019
Time 1.00 to
1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ ऑगस्ट २०१९ दुपारी १.०० वा.
****
वायुसेनेचे वैमानिक विंग
कमांडर अभिनंदन वर्तमान यांना वीरचक्र जाहीर झालं आहे. उद्या स्वातंत्र्यदिनी अभिनंदन
यांचा वीरचक्र देऊन गौरव करण्यात येईल. गेल्या २७ फेब्रुवारीला काश्मीरमध्ये पाकिस्ताननी
विमानांनी केलेली घुसखोरी हाणून पाडताना, अभिनंदन यांचं विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये
कोसळलं होतं. त्यानंतर तिसऱ्या दिवशी एक मार्चरोजी अभिनंदन वाघा सीमेमार्फत भारतात
सुखरुप परतले.
****
हिंदूमान्यतेनुसार अयोध्या ही रामाची जन्मभूमी
आहे, ही धारणा किती तर्कसंगत आहे, याच्या खोलात न्यायालयानं जाऊ नये, असं अयोध्येतल्या
रामजन्मभूमी वाद प्रकरणातल्या रामलला विराजमान या पक्षानं म्हटलं आहे. या प्रकरणी सर्वोच्च
न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान, रामलला विराजमान पक्षाचे वकील सी एस वैद्यनाथन
यांनी न्यायालयाच्या घटनापीठासमोर युक्तिवाद करताना, विवादास्पद जमिनीची तिन्ही पक्षकारांमध्ये
वाटणी करणं योग्य होणार नाही, कारण अशी वाटणी केल्यास, ती प्रत्यक्ष देवतेची विटंबना
ठरेल, असं मत मांडलं. अलाहाबाद उच्च न्यायालयानं २०१० मध्ये या प्रकरणी निकाल देताना,
विवादीत दोन पूर्णांक ७७ एकर जागा, रामलला विराजमान, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ
मंडळ या तिघांमध्ये समान वाटून देण्यास सांगितलं होतं. यानिर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात
१४ याचिका दाखल झाल्या आहेत.
****
जम्मूमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध पूर्णपणे
काढून टाकण्यात आले आहेत, पण काश्मिरमध्ये काही ठिकाणी हे निर्बंध काही काळ कायम राहतील,
अशी माहिती आज जम्मू-काश्मीरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. अतिरिक्त
महासंचालक मुनीर खान यांनी जम्मू-काश्मीरमधली परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं
यावेळी सांगितलं.
****
पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा
२०१९ मध्ये अमरावती जिल्ह्याच्या, वरुड तालुक्यातल्या जामठी गावाला तालुकास्तरावरचं
पहिलं पारितोषिक मिळालं आहे. पाणी फाउंडेशनचे प्रणेते अभिनेता आमिर खान यांनी जामठी
गावाला प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित केलं. पाणी फाउंडेशन कडून दहा लाख रुपये तर मुख्यमंत्री
निधीतून सहा लाख रुपये या गावाला पुरस्कार स्वरूपात मिळाले आहेत. द्वितीय बक्षीस मिळालेल्या
माणिकपूर गावाला मुख्यमंत्री निधीतून सहा लाख रुपये तसेच तृतीय बक्षीस मिळालेल्या या
उदापूर गावाला मुख्यमंत्री निधीतून चार लाख रुपये देण्यात आले आहे.
****
सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी ४१ फुटांपर्यंत खाली आली आहे. या ठिकाणी नदीची धोक्याची
पातळी ही ४५ फूट इतकी आहे. काल रात्री पासूनच कृष्णा नदी धोक्याच्या पातळीच्या खाली
वाहत आहे. पुरामुळे बंद असलेली सांगली कोल्हापूर रस्ते वाहतूक पूर्ववत झाली असून पुराच पाणी कमी
होत असल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.
****
हैदराबाद-मुंबई रेल्वे मार्गाचं कुर्डुवाडी ते दौंड
दरम्यान दुहेरीकरणाच्या अंतिम टप्प्याच्या कामासाठी मध्य रेल्वेनं १६ ते २८ ऑगस्ट दरम्यान
काही गाड्या अंशत: तर काही गाड्या पूर्णत: रद्द केल्या आहेत. काही गाड्यांचे मार्ग
बदलण्यात आले आहेत.
यानुसार कुर्ला नांदेड कुर्ला, कुर्ला बीदर कुर्ला, कोल्हापूर
बीदर कोल्हापूर, पनवेल नांदेड पनवेल, आणि परळी
मिरज परळी या गाड्या संबंधित कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई भुवनेश्वर मुंबई
तसंच मुंबई हैदराबाद मुंबई या दोन गाड्या मनमाड, औरंगाबाद, परभणी, परळी, विकाराबादमार्गे
धावणार आहेत.
****
पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा सुमारे
ब्याण्णव टक्के झाला आहे. धरणात सध्या सोळा हजार तीनशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची
आवक सुरू आहे. धरणाच्या उजवा कालव्यातून एक हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं, डाव्या कालव्यातून
९०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं, तर आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यांसाठी सुमारे १६०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे.
*****
***
No comments:
Post a Comment