Thursday, 15 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.08.2019 06.45AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 August 2019
Time 6.45 AM to 6.55 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -१५ ऑगस्ट  २०१ सकाळी ६.४५ मि.
****

आमच्या सर्व श्रोत्यांना त्र्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
****

Ø  त्र्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वत्र उत्साह; ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन
Ø  नागरिकांनी सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करावं; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं आवाहन 
Ø  सशस्त्र सेना दलासाठीचे शौर्य पुरस्कार जाहीर; विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र
Ø  पूरग्रस्त शेतकऱ्यांचं पीककर्ज पूर्णपणे माफ करण्याची काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
आणि
Ø  प्रवरा परिवाराचे साहित्य आणि कलागौरव पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान
****

 त्र्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. सर्व शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालयं, विविध राजकीय पक्ष तसंच सामाजिक संघटना आणि आस्थापनांमधून आज सकाळी ध्वजारोहण करण्यात येत आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित करतील. राज्यात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात तर राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते पुण्यात राजभवन इथं मुख्य ध्वजारोहण करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 औरंगाबाद इथं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. नांदेड इथं पालकमंत्री रामदास कदम, जालना पालकमंत्री बबनराव लोणीकर, परभणी पालकमंत्री गुलाबराव पाटील, हिंगोली पालकमंत्री अतुल सावे,  बीड  पालकमंत्री पंकजा मुंडे, उस्मानाबाद पालकमंत्री तानाजी सावंत, लातूर इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. शैक्षणिक संस्था तसंच सामाजिक संघटनांच्यावतीनं प्रभातफेरी, वाहनफेरीसह देशभक्तीपर विविध कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलं आहे.

 दरम्यान, प्लॅस्टिकपासून बनलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये; खराब झालेले, फाटलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय राष्ट्रध्वज समित्यांकडे सुपूर्द करावेत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****

 नागरिकांनी सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करावं, असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला ते राष्ट्राला उद्देशून बोलत होते. जनतेच्या इच्छा, आशा- आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. कौशल्य, प्रतिभा, उद्योगशीलता, संशोधनवृत्ती या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासाच्या संधी सरकार उपलब्ध होऊ शकतात, जनतेनं दिलेल्या जनादेशात त्यांच्या या इच्छा स्पष्टपणे दिसत आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी सरकार काम करत असल्याचं कोविंद म्हणाले. विकासाची गती वाढवणं, शासन व्यवस्था अधिक पारदर्शी करणं  आणि जनतेचं राहणीमान उंचावण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज चांगल्या पद्धतीनं झाल्याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात आनंद व्यक्त केला. जम्मू काश्मीर आणि लडाखसंदर्भात घेतलेला निर्णय तिथल्या नागरिकांसाठी लाभदायी ठरेल, असा विश्वासही त्यानी यावेळी व्यक्त केला.
****

 स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सशस्त्र सेना दलासाठीचे १३५ शौर्य पुरस्कार जाहीर केले. यामध्ये दोन कीर्ती चक्र, एक वीर चक्र, १४ शौर्य पदकं आणि ११५ सेना पदकांचा समावेश आहे. राष्ट्रीय रायफलचे जवान प्रकाश जाधव आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उप समादेशक हर्षपाल सिंग यांना कीर्ती चक्र, हवाई दलाचे विंग कमांडर वर्धमान अभिनंदन यांना वीर चक्र पुरस्कार घोषित झाला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान ज्ञानेश्वर साबळे याला शौर्यचक्र पुरस्कार जाहीर झाला आहे.

 केंद्रीय गृह मंत्रालयाने पोलीस पदकांचीही काल घोषणा केली. देशभरातल्या एकूण ९४६ पोलिस कर्मचाऱ्यांना पदकं देऊन सन्मानित  करण्यात येणार आहे. यात वीरतेसाठी राष्ट्रपती पदक तीन पोलिस कर्मचाऱ्यांना, १७७ पोलिसांना पोलिस शौर्य पदकं आणि ८९ पोलिस कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपति पोलिस पदकं प्रदान केले जातील. ६७७ पोलिस कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी पोलिस पदकं देण्यात येणार आहेत.

 यामध्ये महाराष्टातल्या ४६ जणांचा समावेश आहे. यापैकी गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पोलीस पदकं प्राप्त कर्मचाऱ्यांमध्ये बीड इथले पोलीस निरीक्षक सय्यद शौकत अली, जालना इथले सहायक उपनिरीक्षक रामराव राठोड, औरंगाबाद इथले सहायक उपनिरीक्षक गोरख चव्हाण, नांदेड इथले सहायक उपनिरीक्षक खामराव वानखेडे, जालना इथले जमादार अंकुश राठोड, नांदेड इथले जमादार अविनाश सातपुते, आणि पूर्णा इथले जमादार मकसूद अहमद खाँ पठाण, यांचा समावेश आहे.
राष्ट्रपतींनी तुरुंग सेवेतल्या अधिकाऱ्यांसाठीच्या सेवा पदकाची घोषणा केली. यामध्ये राज्यातल्या सातारा जिल्हा तुरुंग विभागाचे सुभेदार शकील अल्लाउद्दीन शेख यांना वैशिष्टपूर्ण सेवेसाठी, मुंबईतल्या भायखळा तुरुंग विभागाचे शिपाई जितेंद्र काटे आणि ठाण्याचे शिपाई अशोक ठाकूर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठीची पदकं घोषीत झाली आहेत.

देशातल्या ५६ जणांना अग्निशमन सेवा पुरस्कारही काल जाहीर झाले.
****

 राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गतच्या पाच कोटी रुपयांपर्यंतच्या पाणीपुरवठा योजनेला आता प्रादेशिक स्तरावरची समिती मान्यता देईल, असं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल मुंबईत सांगितलं. ज्या गावांमध्ये पूर्वीची कोणतीही पाणीपुरवठा योजना नाही, त्याचप्रमाणे ज्या योजनांचं आर्युमान संपलेलं आहे, अशा पाच कोटी रूपयांपर्यंतच्या योजनेला मान्यता देण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे.
****

 पश्चिम महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचं पीककर्ज पूर्णपणे माफ करावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलं आहे. ते काल कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात कौठेसर गावातल्या सभेत बोलत होते. हजारो एकरावरचा ऊस पाण्याखाली गेला असल्यानं, पेरणीकरता काढलेलं कर्ज पूर्णत: माफ करण्याची मागणी आपण सरकारकडे करत असल्याचं, त्यांनी सांगितलं. दोन हजार पाच साली आलेल्या महापुरानंतर तत्कालीन आघाडी सरकारनं शेतकऱ्यांचं सत्तर हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं होतं, असं पवार म्हणाले.

 काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेऊन, राज्यातल्या पूरस्थितीबाबत चर्चा केली. पूरबाधीत शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करून त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून द्याव, प्रतिहेक्टरी साठ हजार रुपये मदत द्यावी, पशुधनाच्या नुकसानीची बाजारभावानुसार भरपाई द्यावी, आदी मागण्यांचं निवेदन यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं.
****

 पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त प्रवरा परिवाराच्या देण्यात येणाऱ्या राज्य आणि जिल्हा स्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्कार ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.अरूणा ढेरे यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, विचारवंत डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना पद्मश्री डॉ. विट्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार कोल्हापूर इथले किरण गुरव यांच्या जुगाड या कादंबरीस देण्यात आला. जालन्याचे रंगकर्मी राजकुमार तांगडे यांना नाट्यसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****

 रक्षाबंधनाचा सण आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी ठिकठिकाणच्या बाजारपेठा राखी तसंच भेटवस्तूंच्या खरेदीसाठी गजबजून गेल्या होत्या.
****

 परभणी इथं बसस्थानकाच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते काल करण्यात आलं. पाथरी इथं नवीन बसस्थानकाच्या इमारतीला मान्यता देण्यात येईल, तसंच परिवहन व्यवस्थेत आमुलाग्र बदल करून, प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असं रावते यावेळी म्हणाले.

 हिंगोली इथं उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटनही काल रावते यांच्या हस्ते झालं. वाढत्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी परिवहन कायदा करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं रावते यांनी यावेळी सांगितलं.
****

 लातूर जिल्ह्यात फक्त दिव्यांगासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था- आयटीआय स्थापन करण्यात येणार आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही महिती दिली. काल निलंगा इथं मुंबईच्या भगवान महावीर विकलांग सहायता समिती मार्फत दिव्यांगाना विविध सहाय्यक उपकरणांचं वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या आयटीआयमधून दिव्यांगाना कौशल्याधारित ज्ञान देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
****

 माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त बाभळगाव इथं विलासबाग परिसरात काल प्रार्थना सभा घेण्यात आली. देशमुख कुटुंबीयांसह, विविध क्षेत्रातले मान्यवर आणि अनेक नागरिकांनी विलासरावांच्या स्मृतीस्थळी पुष्पांजली अर्पण करुन त्यांना आदरांजली आर्पण केली.
****

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपपरिसरासाठी उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा जीवनसाधना पुरस्कार प्रख्यात शल्य चिकित्सक, सामाजिक कार्यकर्ते डॉ.दामोदर बळीराम पतंगे यांना जाहीर झाला आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी काल ही घोषणा केली. उद्या उस्मानाबाद उपकेंद्राच्या १५ व्या वर्धापानदिनी या पुरस्काराचं विरतण करण्यात येणार आहे.
****

 हैदराबाद- मुंबई रेल्वे मार्गाचं कुर्डुवाडी ते दौंड दरम्यान दुहेरीकरणाच्या अंतिम टप्प्याच्या कामासाठी मध्य रेल्वेनं उद्यापासून २८ ऑगस्टदरम्यान काही गाड्या अंशत: तर काही गाड्या पूर्णत: रद्द केल्या आहेत. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यानुसार  कुर्ला -नांदेड -कुर्ला, कुर्ला -बीदर- कुर्ला, कोल्हापूर -बीदर -कोल्हापूर, पनवेल- नांदेड -पनवेल,  आणि परळी -मिरज -परळी या गाड्या संबंधित कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत.
*****
***

No comments:

Post a Comment