Thursday, 15 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.08.2019 18.00



Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
देश आज ७३वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर राष्ट्राला संबोधित केलं. प्रत्येक घरात पिण्याचं पाणी पोचवण्यासाठी सरकारनं जलजीवन अभियान सरु केलं असून त्यासाठी साडेतीन लाख कोटी रुपये खर्च केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यात लोकसहभाग आवश्यक असल्याचं ते म्हणाले. देशात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शंभर लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून येत्या पाच वर्षात भारत पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होऊ शकेल, असा विश्र्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. संरक्षण दलांमध्ये समन्वय रहावा आणि तिनही सैन्य दलांना प्रभावी नेतृत्व प्राप्त व्हावं, यासाठी `चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ` हे नवं पद निर्माण करण्याची घोषणाही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केली.
****
राज्यातही स्वातंत्र्यदिन मोठया उत्साहात साजरा होत आहे. आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. पुरामुळे ज्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत, त्यांच्या भविष्याची चिंता आज आपल्यासमोर असून, अशा सर्वांना पुन्हा उभं करायचं काम राज्याला करावं लागेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकरानं दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यात थेट पन्नास हजार कोटी रुपये जमा करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. जलयुक्त शिवार सारख्या योजनेच्या माध्यमातून राज्याला जल परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्या सरकारनं केला असल्याचं स्पष्ट करताना आपल्याला येत्या काळात राज्य दुष्काळमुक्त करायचं असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुणे विधानभवनाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून राज्यपालांच्या हस्ते आज सकाळी राजभवन इथं वृक्षारोपणही करण्यात आलं.       
****
मराठवाड्यात सातत्यानं दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असून यासाठी मराठवाड्याला कोकणमधून पाणी देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्यानं मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केलं आहे. ते नांदेड इथं स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण केल्यानंतर बोलत होते. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या पुढाकारातून लोकसहभागातून पावसाच्या पाणी पुर्नभरणा उपक्रमाचं पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले.
****
लातूर जिल्ह्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियान आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना येत्या दोन सप्टेंबरपासून प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. लातूर इथं स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियान १५ जुलै ते १५ ऑगस्ट  कालावधीत राबविण्यात येत असून या अंतर्गत लातूर जिल्ह्यात या योजनेचे चार हजार चारशे आणि प्राधान्य कुटुंब योजनेचे ४० हजार चारशे असे एकूण ४४ हजार आठशे नवे लाभार्थी शोधण्यात आले असल्याची माहितीही पालकमंत्री निलंगेकर यांनी यावेळी दिली.
****
आश्र्वासक औद्योगिकरणामुळे राज्यानं देशातील प्रथम क्रमाकांचं राज्य असा नावलौकिक कमावला असल्याचं प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि खनीकर्म, अल्पसंख्याक विकास आणि वक्फ विभागाचे राज्यमंत्री तसंच हिंगोलीचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. ते आज हिंगोली इथं ध्वजारोहण केल्यानंतर बोलत होते. देशाच्या प्रगतीत राज्याचं कायम मोठं योगदान राहिलं असून ते यापुढंही कायम राहील, असा विश्र्वास सावे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
नाशिक इथं  विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. तर पालघर इथं पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं.
****

No comments:

Post a Comment