Friday, 16 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.08.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 August 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑगस्ट २०१९ दुपारी .०० वा.
****
जम्मू काश्मिरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवल्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका निरर्थक असल्याचं सर्वोच न्यायालयानं म्हटलं आहे. या याचिकांवर आज झालेल्या सुनावणी दरम्यान, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याचिका दाखल करणारे वकिल एम एल शर्मा यांना या याचिकेत  दुरुस्या करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, जम्मू काश्मिरमध्ये इंटरनेट तसंच दूरसंचार सेवा टप्प्याटप्प्यानं बहाल करण्यात येत असून, संवाद माध्यमांवरचं निर्बंध लवकर उठवले जावेत, या आशयाच्या याचिकांवर इतर संबंधीत प्रकरणांसोबत सुनावणी घेतली जाईल असं न्यायालयानं म्हटलं आहे. जम्मू काश्मिरच्या परिस्थितीत दिवसेंदिवस सुधारणा होत असल्याचं केंद्र सरकारनं न्यायालयाला कळवलं आहे.
****
जम्मू काश्मिरच्या सचिवालयातले सचिव आणि राज्यातल्या कर्मचाऱ्यांनी नियमीत कामावर हजर होण्याचे निर्देश राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिले आहेत. आज नमाज पठणानंतर या कर्मचाऱ्यांना नियमित कामासाठी सर्व सुविधा देण्यात याव्यात असंही मलिक यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मिर आणि लड्डाख मधे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाल्याची माहीती त्यांनी दिली.
****
एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकविरोधात लोकचळवळ राबवण्याचा संकल्प केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे. ते काल ब्राझील इथं स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ते बोलत होते. पर्यावरण रक्षणासाठी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पंतप्रधानांनी, काल स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, प्लास्टिकचा वापर थांबवण्याचं आवाहन केलं आहे.
****
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपयी यांची आज पहिली पुण्यतिथी. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्लीत अटलजींच्या 'सदैव अटल' या स्मृती स्थळावर जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, डॉ. हर्षवर्धन यांनीही अटलजींना अभिवादन केलं. या वेळी झालेल्या प्रार्थना सभेत अटलजींचे कुटूंबीय उपस्थित होते, गेल्या वर्षी १६ ऑगस्ट रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं होतं. देशभरात ठिकठिकाणी अटलजींना आदरांजली अर्पण करण्यासाठी आज विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. औरंगाबाद इथं गारखेडा परिसरात नंदीग्राम कॉलनीतल्या जनुभाऊ रानडे सभागृहात आज सायंकाळी अभिवादन सभा घेण्यात येणार आहे.
****
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपयी यांना कोलकत्ता इथं आदरांजली अर्पण केली. ममता बॅनर्जी या अटल बिहारी वाजपयी पंतप्रधान असतांना त्यांच्या मंत्री मंडळात रेल्वे मंत्री होत्या.
****
भारतीय क्रिकेट संघाचे माजी सलामीवीर आणि राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य व्ही बी चंद्रशेखर यांचं आज चेन्नई इथं निधन झालं. त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगीतलं आहे. चंद्रशेखर यांनी १९८८ ते १९९० या कालावधीत सात एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. भारतीय क्रिकेट मंडळ -बी सी सी आय नं त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
***
सातारा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तसंच ज्येष्ठ संचालक यशंवतराव उर्फ दादाराजे खर्डेकर यांचं आज ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. फलटण तालुक्यातल्या आसू या गावात आज सायंकाळी वाजता खर्डेकर यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्री या आपल्या निवासस्थानी महाले यांचं स्वागत केलं. महाले शिवसेनेतूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले होते. ते आज दिलीप राऊत आणि इतर सहकाऱ्यांसह स्वगृही परतले, असं शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.
****
हैदराबाद- मुंबई रेल्वे मार्गाचं कुर्डुवाडी ते दौंड दरम्यान दुहेरीकरणाच्या अंतिम टप्प्याच्या कामासाठी मध्य रेल्वेनं आजपासून २८ ऑगस्टदरम्यान काही गाड्या अंशत: तर काही गाड्या पूर्णत: रद्द केल्या आहेत. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यानुसार  कुर्ला -नांदेड -कुर्ला, कुर्ला -बीदर- कुर्ला, कोल्हापूर -बीदर -कोल्हापूर, पनवेल- नांदेड -पनवेल,  आणि परळी -मिरज -परळी या गाड्या संबंधित कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई -भुवनेश्वर -मुंबई तसंच मुंबई -हैदराबाद -मुंबई या दोन गाड्या मनमाड, औरंगाबाद, परभणी, परळी, विकाराबादमार्गे धावणार आहेत.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्राचा १५ वा वर्धापनदिन आज साजरा होत आहे. यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोलन करण्यात आलं आहे. विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार प्रख्यात शल्य चिकित्सक, सामाजिक कार्यकर्ते डॉ.दामोदर बळीराम पतंगे यांना आज समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. उपपरिसरासाठी उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो.
****

No comments:

Post a Comment