Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -१७ ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v कलम ३७० हटवण्याच्या
निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांतून काहीही अर्थबोध नाही - याचिकेत दुरुस्ती करण्याचे
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
v कृषी क्षेत्रात
परिवर्तनासंबंधीचा अहवाल पुढच्या दीड महिन्यात पंतप्रधानांना सादर केला जाणार
v माजी पंतप्रधान
अटल बिहारी वाजपेयी यांना काल पहिल्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली
v सरकारी गृहनिर्माण
धोरणात बदल; सरकारी गृहयोजनेतून एका व्यक्तीला एकच घर घेता येणार
आणि
v ७६ लाख रुपये
फसवणूक प्रकरणी औरंगाबाद इथं पेट्रोल पंपचालक अकील अब्बास याला अटक
****
जम्मू काश्मिरला विशेष
दर्जा देणारं कलम ३७० हटवल्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांतून काहीही अर्थबोध
होत नसल्याचं सर्वोच न्यायालयानं म्हटलं आहे. या याचिकांवर काल झालेल्या सुनावणी दरम्यान,
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याचिका दाखल करणारे वकील एम एल शर्मा यांना या याचिकेत
दुरुस्त्या करण्याचे निर्देश दिले. जम्मू काश्मीरच्या परिस्थितीत दिवसेंदिवस सुधारणा
होत असल्याचं केंद्र सरकारनं न्यायालयाला सांगितलं.
दरम्यान, काश्मीरमधून
कलम ३७० हटवल्याप्रश्नी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बैठक घेण्याचा पाकिस्तानाचा
प्रयत्न निष्फळ ठरला आहे. कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून, बाहेरच्या व्यक्तींना
त्यात हस्तक्षेप करण्याचा काहीही अधिकार नसल्याचं, संयुक्त राष्ट्रातले भारताचे दूत
सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटलं आहे. दहशतवाद थांबला, तरच दोन्ही देशांमध्ये चर्चा शक्य
आहे, असंही अकबरुद्दीन यांनी म्हटलं आहे.
****
अयोध्येतल्या बाबरी मशिदीच्या खांबांवर हिंदू देवदेवतांच्या
मूर्ती आढळून आल्या होत्या, अशी शिल्पं मशिदींमध्ये आढळून येत नाहीत, असा युक्तिवाद
रामलल्ला विराजमान या पक्षानं सर्वोच्च न्यायालयात केला आहे. काल झालेल्या सुनावणीत
या पक्षानं आपला युक्तिवाद सबळ करण्यासाठी १९५० साली झालेल्या पाहणी अहवालातले पुरावे
न्यायालयासमोर सादर केले. या पुराव्यानुसार मशिदीपूर्वी या ठिकाणी मंदीरच होतं, असं
दावा या पक्षानं केला आहे.
****
कृषी क्षेत्रात परिवर्तन
करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या
उच्चाधिकार समितीची दुसरी बैठक काल मुंबईत झाली. ही समिती पुढच्या दीड महिन्यात आपला
अंतिम अहवाल पंतप्रधानांना सादर करेल, अशी माहिती बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी
दिली. बाजार समिती कायद्यात सुधारणा, करार शेती, शेतीत नवीन तंत्रज्ञान, जीवनाश्यक
वस्तू कायद्यातून कृषी उत्पादनांना वगळणे, ई-नाम, कृषी निर्यात आदी विषयांवर या बैठकीत
चर्चा झाली. या सर्व मुद्यांवरील चर्चेवर पुढील आठवडाभरात सर्व राज्ये आपल्या सूचना
देणार असून त्यानुसार अहवाल अंतिम करून पंतप्रधानांना सादर केला जाईल, असं फडणवीस म्हणाले.
शेती क्षेत्राची उत्पादकता, विपणन आणि कृषीमालाची निर्यात या बाबींवर अधिक लक्ष करण्यात
येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
दिंडोरीचे माजी आमदार
धनराज महाले यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत
मातोश्री या आपल्या निवासस्थानी महाले यांचं स्वागत केलं.
****
पूर परिस्थितिच्या पार्श्वभूमीवर
राज्यातल्या कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी काल नवी दिल्लीत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया
गांधी यांची भेट घेऊन त्यांना पूरस्थितीची माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,
यांच्यासह पक्षाचे राज्यातले, राज्यातले ज्येष्ठ
नेते यावेळी उपस्थित होते.
****
माजी पंतप्रधान अटल बिहारी
वाजपेयी यांना काल त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली वाहण्यात
आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा,
यांनी दिल्लीत अटलजींच्या 'सदैव अटल' या स्मृती स्थळावर पुष्पांजली अर्पण केली.
अण्वस्त्राचा प्रथम वापर
न करणं, हे भारताचं सध्याचं धोरण आहे. मात्र भविष्यात काय होईल, हे परिस्थितीच ठरवेल
असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल पोखरण इथं बोलत होते. वाजपेयी
यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त राजनाथसिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
देशभरात ठिकठिकाणी अटलजींना
आदरांजली अर्पण करण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. औरंगाबाद इथं गारखेडा परिसरातल्या
जनुभाऊ रानडे सभागृहात अभिवादन सभा घेण्यात आली.
बीड इथं अटल जनसेवक संपर्क
कार्यालयात खासदार प्रीतम मुंडे यांनी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केलं.
****
भारत, प्रदूषणमुक्त करण्याचा
निर्धार केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत
एका कार्यक्रमात बोलत होते. आपल्या खात्यानं प्रत्येक प्रकल्प हाती घेण्याआधी त्यावर
सखोल प्रयोग केले आणि मगच अंमलबजावणी केली. असंही त्यांनी नमूद केलं.
****
पारशी नूतन वर्षानिमित्त
राज्यपाल सी.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शुभेछा दिल्या
आहेत. हा दिवस “उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती” या पारशी समाजाच्या मार्गदर्शक
त्रिसूत्रींचं स्मरण करुन देतो, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत
केलं जात आहे.
****
राज्य सरकारच्या कुठल्याही
गृह योजनेत यापुढे एकच घर घेता येणार असून घरांची मागणी जास्त आणि उपलब्धता कमी असल्यानं
सरकारी गृहनिर्माण धोरणात बदल केले जाणार आहेत. म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी काल
रत्नागिरीत ही माहिती दिली. या संदर्भातल्या नव्या धोरणाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव
विचाराधीन आहे, त्याला मान्यता मिळाल्यानंतर सरकारी योजनेतून आता एकदाच घर मिळेल. आधी
सरकारी योजनेतून घर मिळालेल्या व्यक्तीला त्यानंतर राज्यातल्या कोणत्याही गृहनिर्माण
योजनेत अर्ज सादर करता येणार नाही, असं सामंत यांनी सांगितलं.
****
राज्य शासनाचा ‘ज्ञानोबा-तुकाराम’
पुरस्कार यंदा नागपूरचे ज्येष्ठ साहित्य संशोधक आणि संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. म.रा.
जोशी यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
यांचे हस्ते उद्या नागपूर इथं या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्राचं शैक्षणिक विकासात मोठे योगदान आहे,
या उप केंद्राचं स्वतंत्र विद्यापीठात रूपांतर व्हावं यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही
उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी दिली. आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या उप केंद्राचा १५ वा वर्धापन दिन काल उस्मानाबाद इथं साजरा
झाला त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी
होते. यावेळी प्रख्यात सर्जन, समाजसेवक डॉ. दामोधर बळीराम पतंगे यांना ‘जीवन साधना
पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला.
****
औरंगाबाद इथला पेट्रोल
पंपचालक अकील फजल अब्बास याला एका महिलेची ७६ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी काल
अटक करण्यात आली. २०१५ मध्ये अब्बास यांनं एका महिलेस ५१ लाख रुपये
गुंतवल्यास त्यावर २० टक्के नफा देण्याचं अमिष दिलं होतं. मात्र, अशा प्रकारचा
नफा न मिळाल्यामुळे महिलेनं गेल्या २२ जून रोजी पोलिसात तक्रार केल्यानंतर त्याला अटक
करण्यात आली.
****
नाशिक कृषी उत्पन्न बाजार
समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना तीन लाख रूपयांची लाच स्वीकारतांना काल लाचलुचपत
प्रतिबंधक विभागान अटक केली. या बाजार समितीत काम करणाऱ्या दहा कर्मचाऱ्यांना पुन्हा
रूजू करून घेण्यासाठी चुंभळे यांनी दहा लाख रूपये लाच मागितली होती.
****
पैठण इथल्या जायकवाडी
धरणाचे आठ दरवाजे अर्ध्या फुटानं उघडून सुमारे चार हजार दोनशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं
गोदावरी नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे. सध्या धरणाच्या डाव्या कालव्यातून चौदाशे घनफूट
प्रतिसेकंद, उजव्या कालव्यातून नऊशे घनफूट प्रतिसेकंद, तर जलविद्युत प्रकल्पातून सुमारे
सोळाशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या
धरणातून जायकवाडी धरणात होणारी पाण्याची आवक आता मंदावली असून, सध्या धरणात एक्क्याण्णव
पूर्णांक ३५ शतांश टक्के एवढा पाणीसाठा झालेला आहे.
****
माहिती आणि जनसंपर्क
महासंचालनालय, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सायबर, राज्य मराठी विकास संस्था यांच्या
संयुक्त विद्यमानं आजपासून मुंबईत दोन दिवसाचं पहिलं राज्यस्तरीय ‘मराठी समाज माध्यम’
संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. मराठी भाषा समृद्ध करणं हा या संमेलनाच्या आयोजनाचा
उद्देश आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात वादविवाद, मुलाखती, काव्यवाचनासह विविध
विषयांवर चर्चासत्रं होणार आहेत.
****
मराठी पत्रकार परिषदेचं
बेचाळिसावं राष्ट्रीय अधिवेशन आज आणि उद्या नांदेड इथं होत आहे, मालेगाव रस्त्यावरच्या
भक्ती लॉन इथं होणाऱ्या या अधिवेशनात देशभरातून अडीच हजार प्रतिनिधी सहभागी होणार
आहेत.
****
भारतीय क्रिकेट
संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवि शास्त्री यांची फेरनिवड करण्यात आली आहे. कपिल देव
यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या त्रिसदस्यीय सल्लागार समितीनं काल ही घोषणा केली.
शास्त्री यांची ही नियुक्ती दोन वर्षांसाठी असेल. त्यांची चौथ्यांदा या पदी निवड झाली
आहे.
****
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वे दुहेरीकरणाच्या
कामामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले
आहेत. नांदेड-पनवेल ही गाडी आज, पनवेल-नांदेड ही गाडी उद्या तर नागपूर - कोल्हापूर ही गाडी
उद्या आणि मंगळवारी पूर्णतः रद्द करण्यात आली आहे.
उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागातील
बल्लभगड रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या कामांमुळे नांदेड विभागातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या
रेल्वे गाड्यांमध्ये बदल झाला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment