Saturday, 17 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.08.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 August 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ ऑगस्ट २०१९ दुपारी .०० वा.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या भूतान दौऱ्यावर असून ते नुकतेच थिंपू इथल्या पारो विमानतळावर पोहचले आहेत. यावेळी भूतानचे पंतप्रधान डॉ लोटाय त्शेरिंग यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी भूतानचे अनेक वरिष्ठ मंत्री आणि उच्चाधिकारीही उपस्थित होते. भारतातून दौऱ्यावर रवाना होताना पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पदाच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच भूतानच्या दौऱ्यावर जाणं यावरून भारत भूतानला किती महत्व देतं, ते दिसत असल्याचं म्हटलं आहे.
****
 काश्मीर खोऱ्यातल्या नागरिकांच्या हालचाली आणि दळणवळणावरील बंधनं हळूहळू कमी करण्यात येत असल्याचं जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव बी व्ही आर सुब्रमन्यम यांनी म्हटलं आहे. सरकारी कार्यालयं यापूर्वीच कार्यरत झाली असून सोमवारपासून प्रत्येक विभागनिहाय शाळा देखील सुरू करण्यात येतील, असंही ते म्हणाले. तसंच त्यांनी खोऱ्यातल्या नागरिकांनी या काळात शांतता पाळल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत. पाच ऑगस्टला अनुच्छेद ३७० हटवल्यापासून आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला आहे. सरकारनं केवळ सावधगिरीचा उपाय म्हणून या भागांमध्ये बंधने टाकली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
****
 संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेतल्या बैठकीत अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या मुद्द्यावर भारताला खिंडीत पकडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न पुरता फसला आहे. सुरक्षा परिषदेतल्या बहुतांशी सदस्यांनी भारताला पाठिंबा दर्शवल्यानं पाकिस्तानसह चीन देखील तोंडघशी पडला आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना भारताचे युनोमधले कायमस्वरुपी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानच्या आग्रहाखातर चीननं विनंती केल्यानंतर सुरक्षा परिषदेची ही बैठक बोलावण्यात आली होती. अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय ही पूर्णत: भारताची अंतर्गत बाब असल्याच्या भूमिकेवर भारत कायम राहिला असल्याचं अकबरुद्दीन यांनी नमूद केलं. तसंच या बैठकीमध्ये अकबरुद्दीन यांनी पाकिस्तान भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये विनाकारण ढवळाढवळ करत असल्याची टीकाही केली.  तसंच पाकिस्तान भारतात जिहादच्या नावाखाली दहशतवाद पसरवत असल्याचंही त्यांनी सदस्य राष्ट्रांना सांगितलं.
****

 कोल्हापूर जिल्ह्यातली पूरस्थिती आटोक्यात आली असून, ३६९ गावांमधल्या चार लाखांहून अधिक लोकांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितलं आहे. जिल्ह्यातल्या ३१० गावांच्या  स्वच्छता, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी २ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी दिली आहे.
****

 पुरामुळे बंद असलेली मिरज – मुंबई मार्गावरची रेल्वे वाहतूक आजपासून सुरू होणार आहे. गेले काही दिवस रद्द केलेल्या महालक्ष्मी, सह्याद्री, आणि कोयना एक्सप्रेस गाड्या आजपासून धावू लागतील. सांगली जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीचा तपशीलही हळूहळू कळू लागला आहे. सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या सुमारे ११२ रस्त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २२५ कोटी रुपयांची आवश्यकता असून, तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेनं शासनाकडे पाठवला आहे. जिल्ह्यातल्या ४३३, तर शहरातल्या हरीपूर या एकाच गावात २५० घरांची मोठी पडझड झाली तर, सुमारे तीन हजार घरांचं अंशतः नुकसान झालं आहे. हळदीच्या साठवणुकीसाठी वापरली जाणारी जमिनीतली १०० पेवं पाण्यात बुडाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 कोल्हापूरमधून पर्यटनासाठी आलेल्या दोन तरुणींचा रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे इथं समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. आज सकाळी घडलेल्या या दुर्घटनेत आणखी एक तरुण बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे. मूळचे कर्नाटकातल्या हुबळीचे रहिवासी असलेले हे पर्यटक सध्या कोल्हापूरच्या कसबा बावडा इथं राहत होते. त्यांच्यासोबत असलेल्या आणखी चार पर्यटकांना स्थानिक सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षकांनी वाचवलं आहे.
****

 नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात २० टक्के पाणी उपलब्ध झाल्यामुळे आता शहराला ४ दिवसा आड पाणी पुरवठा केला जाणार आहे. काल पासून नवीन वेळापत्रक अंमलात आणलं जात आहे. या आधी नांदेड शहराला सहा दिवसा आड पाणी पुरवठा केला जात होता.
****

 नाशिक रोड इथं बंद स्थितीत असलेल्या एका चित्रपटगृहाच्या छताला आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास आग लागली. अग्निशामक दलाच्या पथकाच्या एक तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.
*****
***

No comments:

Post a Comment