Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 August 2019
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
३० ऑगस्ट २०१९ दुपारी
१.०० वा.
****
शरीर, बुद्धी आणि आत्म्याला
परस्परांशी जोडणारा योग, आता जगाला एकसंध करत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे, आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते योग पुरस्कार प्रदान करण्यात आले,
त्यावेळी ते बोलत होते. निरोगी तसंच रोग प्रतिबंधात्मक जीवनशैलीचं महत्त्व सांगताना
पंतप्रधानांनी भारतीय आहार पद्धती स्वीकारण्यावर अधिक भर दिला. शेतकऱ्यांनी भरड उत्पादन
वाढवावं, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. कमी पाण्यात, सर्व प्रकारच्या जमिनीत उगवणारं
ज्वारी, बाजरी, नाचणी आणि जवासारखं भरड धान्य शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळवून देईल,
त्याबरोबरच देशवासियांना उत्तम पोषण आहार मिळेल, असं पंतप्रधान म्हणाले.
आयुष मंत्रालयानं पुढच्या साडे
तीन वर्षांत देशभरात बारा हजार आरोग्य केंद्र उभारण्याचा निर्धार केला असून, यापैकी
हरयाणातल्या दहा आरोग्य केंद्रांचं उद्धाटन पंतप्रधानांनी केलं. आयुष प्रणालीचे तज्ज्ञ
तसंच डॉक्टरांच्या सन्मानार्थ १२ आयुष स्मृती टपाल तिकीटांचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या
हस्ते करण्यात आलं.
****
पाकिस्तान स्थित कर्तारपूर
गुरूद्वारा मार्गिकेच्या बांधकामासंदर्भात भारत पाकिस्तान यांच्यात गुरूदासपूर इथं
तांत्रिक मुद्यावर चर्चा सुरू झाली आहे. जम्मू काश्मिरचा विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतर
पहिल्यांदाच ही चर्चा होत आहे. या पूर्वीही या मुद्यावर अनेक बैठका झाल्या आहेत. जुलैमहिन्यात
भारत पाकिस्तान सीमेवर अटारी इथं शेवटची बैठक झाली होती.
****
लष्कर प्रमुख विपीन रावत आज
जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते काश्मीरच्या सुरक्षा स्थिती आणि
सुरक्षा रक्षकांच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. जम्मू काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा
देणारं ३७० कलम हटवल्यानंतर लष्कर प्रमुखांचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. दरम्यान,
राज्यातल्या पाच जिल्ह्यात मोबाइल सेवा पुन्हा सुरू केल्याची माहीती आयुक्ता संजीव
वर्मा यांनी दिली आहे.
****
मुंबईत चेंबूर इथं लैंगिक अत्याचार
प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीनं आज मुंबईत निषेध मोर्चा काढला.
खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात निघालेल्या
या मोर्चात पक्षाच्या अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. गुन्हा
होऊन महिनाभरानेही आरोपी पकडले जात नाहीत, हे राज्य सरकारच्या गृहखात्याचं अपयश असल्याचं
सांगतानाच, त्यांनी हे निष्क्रीय सरकार असल्याची टीकाही केली.
आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या
मागणीचं निवेदन यावेळी पोलिसांना देण्यात आलं. विशेष तपास पथकामार्फत या प्रकरणांची
चौकशी करण्याची मागणी खासदार सुळे यांनी केली. कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देण्याऐवजी
सरकार यात्रा काढण्यात मग्न असल्याची टीका त्यांनी केली.
या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने
गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल सादर करावा आणि आरोपींना
तातडीने अटक करण्याच्या सूचना आयोगाने मुंबई पोलिसांना दिल्या आहेत. गेल्या सात जुलैला
मुंबईत चुनाभट्टी इथं ही घटना घडली होती.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची महाजनादेश यात्रा आज लातूर तसंच नांदेड जिल्ह्यात पोहोचणार आहे. नांदेड इथं या
यात्रेच्या स्वागतासाठी दुचाकी फेरी काढली जाणार आहे. उद्या मोंढा मैदानावर मुख्यमंत्र्यांची
सभा होणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, युवा सेना नेते आदित्य
ठाकरे यांची जनाशिर्वाद यात्रा आज औरंगाबाद इथं दाखल होत आहे.
****
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या
पूरस्थीतीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक
सध्या राज्यात दाखल झालं आहे. आज हे पथक सांगली जिल्ह्यात पाहणी करणार आहे. आज सांगली
शहर आणि सांगलीवाडी तर उद्या म्हणजेच ३१ ऑगस्टला ब्रम्हनाळ, भिलवाडी, बुर्ली, शिरगाव
आणि वाळवा या गावांना भेटी देणार आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी
या पथकानं काल पुण्यात आढावा बैठक घेतली. मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे
निंबाळकर यांनी या पथकाला जीवित तसंच आर्थिक नुकसानाची माहिती दिली.
****
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं
जुलै महिन्यात घेतलेल्या इयत्ता दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर
होणार आहे. मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महारिझल्ट डॉट निक डॉट इन या संकेतस्थळावर
हा निकाल जाहीर होईल. विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटही काढता येईल.
****
बैलपोळा सण आज सर्वत्र साजरा
होत आहे. शेतकऱ्यांनी काल सायंकाळी बैलांची हळद दुधानं खांदेमळणी केली. आज बैलाला झूल
पांघरून, विविध आभुषणांनी सजवून संध्याकाळी मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. या निमित्तानं
बैलांना पुरण पोळी खाऊ घातली जाते.
****
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या
दुसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्याला आजपासून किंगस्टन इथं सुरूवात होत आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी आठ वाजता हा सामना सुरू होईल. दोन सामन्यांच्या या
मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे.
****
No comments:
Post a Comment