Friday, 2 August 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 02.08.2019....18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
अयोध्येतल्या राम जन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालय दररोज सुनावणी घेणार आहे. या प्रकरणी नेमलेली मध्यस्थ समिती, ३१ जुलैपर्यंत दिलेल्या मुदतीत तोडगा काढू न शकल्यानं, दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय न्यायालयाच्या घटनापीठानं आज घेतला. येत्या मंगळवारी सहा तारखेपासून या सुनावणीला प्रारंभ होईल, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण होईपर्यंत सुनावणी सुरू राहणार असल्याचं, न्यायालयानं नमूद केलं आहे.
****
बेकायदा कारवाया प्रतिबंधक विधेयक आज राज्यसभेनी संमत केलं. विधेयकाच्या बाजूने एकशे सत्तेचाळीस तर विरोधात बेचाळीस मतं पडली. त्यापूर्वी विधेयकावरच्या चर्चेदरम्यान, काँग्रेस पक्षानं, हे विधेयक घटनात्मकदृष्ट्या अवैध तसंच व्यक्ति स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचं सांगत, या विधेयकाला विरोध केला. या चर्चेला उत्तर देताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, दहशतवादाचा बिमोड करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं सांगत, दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं.
****
अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांनी काश्मीर खोऱ्यातला मुक्काम तत्काळ आटोपता घेऊन, आपापल्या घरी परतावं, असं आवाहन जम्मू काश्मीर प्रशासनानं केलं आहे. काश्मीर खोऱ्यात यात्रेकरुंवर संभाव्य दहशतवादी हल्ल्याची भीती गुप्तचर यंत्रणेकडून वर्तवल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरच्या गृह सचिवांनी, या संदर्भात एक पत्रक जारी करत, यात्रेकरू आणि पर्यटकांना काश्मीर खोऱ्यातून तत्काळ परतण्याचं आवाहन केलं आहे.
****
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी, इन कॅमेरा सुनावणी घेण्याची आवश्यकता राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा-एनआयए नं व्यक्त केली आहे. या सुनावणीला मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो, यामुळे ही सुनावणी इन कॅमेरा करावी, असं एनआयएनं विशेष न्यायालयाकडे दाखल याचिकेत म्हटलं आहे.
****
राज्यभरातल्या ४८ हजार ४५५ शेतकऱ्यांनी वनशेतीसाठी ऐच्छिक नोंदणी केली असून या शेतकऱ्यांच्या शेतात जवळपास २२ लाख २४ हजार फळझाडं आणि इतर वृक्षांची लागवड केली जाणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई इथं ही माहिती दिली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या हेतूनं वन विभागानं शेतकऱ्यांना वनशेतीकडे वळण्याचं आवाहन केलं होतं, त्यास राज्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. “महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनें”अंतर्गत वैयक्तिक लाभार्थींच्या शेताच्या बांधावर, शेतजमिनीवर वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत वन शेती फुलवण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक लाभार्थींना वनशेती योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर ते संबंधित ग्रामपंचायतीकडे अर्ज करू शकतात, अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्यानं पर्लकोटा नदीला पूर आला आहे, त्यामुळं भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. हेमलकसा-आलापल्ली हा मार्गही पुन्हा बंद झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आज सलग दहाव्या दिवशी जोरदार पाऊस झाला, पंचगंगा नदीसह जिल्ह्यातल्या सर्व नद्यांची पूरस्थिती कायम आहे. जिल्हा प्रशासनानं अतिदक्षतेचा इशारा दिला असून, ४८ कुटूंबांना आणि ३३० जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. 
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यासह आज सुमारे अर्धातास जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातही आज सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.
****
शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं येत्या १५ नोव्हेंबर २०१९ पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेशिका मागवण्यात येत आहेत. ५९ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक १५ नोव्हेंबर, २०१९ पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसंच गतवर्षी राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका आणि नियम संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. औरंगाबाद महसूल विभागातल्या संस्थांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रवेशिका ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, एमटीडीसी बिल्डिंग, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात. असं सांस्कृतिक कार्याच्या प्रभारी संचालक मीनल जोगळेकर यांनी कळविले आहे.
****
जालना जिल्हा परिषदेअंतर्गत भोकरदन इथल्या जलसंधारण कार्यालयातला टंकलेखक अनिल कुलकर्णी याला पाचशे रुपयांची लाच घेताना आल रंगेहाथ अटक करण्यात आली. अकृषक परवाना देण्यासाठी त्यानं तक्रारदाराकडे एक हजार रुपये लाचेची मागणी केली होती, त्यापैकी पाचशे रुपये घेताना, त्याला सापळा रचून अटक करण्यात आली.
****

No comments:

Post a Comment