▼

Saturday, 10 August 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 10.08.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला असून, पूरस्थितीत आज दुपारपासून सुधारणा होत असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. मात्र पुराचं पाणी ओसरण्यासाठी अजून दोन ते तीन दिवस लागतील असंही त्यांनी यावेळी सांगितले. कोल्हापूर इथं पाण्याची पातळी ५२ फूट तर सांगली जिल्ह्यातही पाण्याची पातळी हळूहळू कमी होत असल्याची माहिती कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे. 
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागातून आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. बचावकार्यासाठी विशाखापट्टणम इथून भारतीय नौदलाची अतिरिक्त १५ पथकं रवाना झाली असून, ती आज कोल्हापूर इथं पोहोचतील, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे. या जिल्ह्यांतल्या पूरग्रस्तांसाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातून जीवनावश्यक वस्तू असलेले दोन ट्रक आज रवाना झाली आहेत.
****
पूरस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन, आपत्ती व्यवस्थापनासाठी एक कार्यक्षम यंत्रणा उभी केली जाईल आणि त्यासाठी आवश्यक तो खर्च राज्य सरकार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सांगलीतील पूरग्रस्त भागांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. या पुरात ज्यांची घरं आणि जमिनीचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, तसंच काही ठिकाणी नियमांत बदल करून आणि अटी शिथील करून या पूरग्रस्त लोकांना मदत देण्याचा प्रयत्नही राज्य सरकार करेल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
दरम्यान, पुराच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुका पुढं ढकलायच्या किंवा नाही याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.
****
उस्मानाबाद इथल्या तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना २५ लाख रुपये रोख रक्कम, २५ लाख रुपये किंमतीच्या वस्तू अशी एकूण ५० लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी दिली आहे. तसंच, हिंगोली जिल्ह्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज ठिकठिकाणी मदत फेरी काढण्यात आली. आखाडा बाळापूर इथं विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांनी फेरी काढून मदत जमा केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी कर्नाटक इथल्या बेळगाव आणि बागलकोटला भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून देण्यात येणारी सर्व प्रकारची मदत केली जाईल, असं आश्वासन दिलं. पुरामध्ये आतापर्यंत कर्नाटकात २४ जण दगावले असल्याची माहिती मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी आज बंगळुरू इथं दिली. तसंच महापुरामुळं सोळा जिल्ह्यांत ८० तालुक्यांतल्या एक हजार चोवीस गावांमधील दोन ते चार लाख लोक विस्थापित झाले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यामध्ये प्राथमिक अंदाजानुसार सहा हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं असल्याचंही येडीयुरप्पा यांनी सांगितलं.
****
जम्मू आणि काश्मीरमधली परिस्थिती सुधारत असून जनजीवन सामान्य होत आहे. जम्मू विभागातल्या पाच जिल्ह्यांमध्ये कलम १४४ अंतर्गत जमावबंदीचा आदेश मागे घेण्यात आला आहे. तर डोडा आणि किश्तवर जिल्ह्यांमध्येही संचारबंदी काही प्रमाणात शिथील करण्यात आली आहे. तसंच या पाच जिल्ह्यांमधल्या शाळा आणि महाविद्यालयं पूर्ववत सुरू करण्यात आली आहेत. मात्र पूंछ, राजौरी, डोडा, किश्तवर आणि रामबाण जिल्ह्यांमध्ये अजूनही सुरक्षेसंबंधीची बंधनं कायम आहेत. तसंच श्रीनगरमधली परिस्थिती देखील शांततापूर्ण असल्याचं तिथल्या विभागीय आयुक्तांनी म्हटलं आहे. परवा सोमवारी होणाऱ्या ईद सणासाठी अडीच लाख मेंढ्या आणि शेळ्या तसंच ३० लाख कोंबड्यांची व्यवस्था करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सकाळी श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी भेटी देऊन जीवनावश्यक सोयी आणि परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, श्रीनगरमध्ये दहा हजार लोकांनी आंदोलन केल्याच्या वृत्ताचं परराष्ट्र विभागानं खंडण केलं आहे.
****
देशाच्या विविध भागांमध्ये पाऊस सुरूच असून या भागांमध्ये बचत कार्य वेगानं सुरु आहे. आत्तापर्यंत दोन लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. दीड लाख लोकांनी मदत छावण्यांचा आश्रय घेतला आहे.
****

No comments:

Post a Comment