Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 09 August
2019
Time 18.00 to
18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि केरळमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीच्या
पार्श्वभूमीवर बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची ८३ पथकं पाठवली असल्याचं,
केंद्रीय गृहमंत्रालयानं सांगितलं आहे. या आधीपासून बचावकार्यात कार्यरत असलेल्या १७३
पथकांसोबत ही ८३ पथकं काम करतील. सैन्यदल, नौदल, वायूदल आणि तटरक्षक दलाच्या सैनिकांचा
या पथकात समावेश आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या एका पथकात ४५ सैनिक असतात.
गृह मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षातून सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष असल्याचं, या बातमीत
म्हटलं आहे.
सांगली जिल्ह्यातील
पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी ७६ बोटी उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. सध्या सांगलीवाडी परिसरात अन्नाची सुमारे तीन हजार पाकिटे हेलिकॉप्टर
आणि बोटीद्वारे पोहोचवण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त शहरासाठी
जवळपास ५ हजार अन्न पाकीटे आणि पाण्याच्या बाटल्या बोटीव्दारे
वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्यात येत आहेत. पुराची पाणीपातळी कमीही होत असल्याचं, जिल्हाधिकाऱ्यांनी
सांगितलं.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता
गोव्याच्या धर्तीवर स्वतःची आपत्कालीन यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचं पालकमंत्री
दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य खरेदी करण्याच्या सूचना त्यांनी
संबंधित विभागांना दिल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पूरस्थितीचा आढावा पालकमंत्री
केसरकर यांनी कुडाळ इथं घेतला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
नंदुरबार जिल्ह्यातही पूरस्थिती
गंभीर होत असून, शहादा, अक्कलकुवा आदी गावातल्या दोनशेहून अधिक कुटुंबांना सुरक्षित
स्थळी हलवण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यात कृत्रीम पावसाच्या प्रयोगाला आजपासून सुरूवात
झाली. औरंगाबाद विभागीय आयुक्तालयातल्या डॉपलर रडारच्या ठिकाणी असलेल्या नियंत्रण कक्षाकडून
वैमानिक आणि शास्त्रज्ञांना ढगांचं छायाचित्र पाठवण्यात आलं. त्यानंतर दुपारच्या सुमारास
हे विमान आकाशात झेपावलं.
****
अयोध्येतल्या रामजन्मभूमी
बाबरी मशीद जमीन विवाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय
कायम ठेवला आहे. या प्रकरणी मुस्लिम पक्ष तसंच अखिल भारतीय सुन्नी वक्फ मंडळानं, दररोज
सुनावणी घेण्याच्या निर्णयावर नापसंती दर्शवली होती. मात्र युक्तिवादाच्या तयारीसाठी
आठवड्यात एखादा दिवस सुनावणीस सुटी देण्याबाबत विचार केला जाईल, असं न्यायालयानं मुस्लिम
पक्षांचे वकील ज्येष्ठ विधीज्ञ राजीव धवन यांना सांगितलं.
****
सहासष्टावे राष्ट्रीय चित्रपट
पुरस्कार आज जाहीर झाले. ‘हेलारो’ या गुजराथी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार
पटकावला आहे. आयुष्मान खुराणा आणि विकी कौशल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
विभागून तर तेलगू अभिनेत्री कीर्ती सुरेश हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर
झाला आहे. सर्वोत्तम गायक पुरस्कार अरिजीत सिंह यांना तर स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्तम
गीतकार पुरस्कार मिळाला आहे. ‘भोंगा’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर अंधाधुन हा
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे.
****
आपल्या देशातला शेतकरी आणि
आदिवासी देशासाठी लागणारे इंधन बनवू शकतात, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी
यांनी म्हटलं आहे. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागातर्फे नागपूर इथं
घेतलेल्या राज्यस्तरीय गौरव सोहळ्यात ते बोलत होते. मिशन शौर्य मध्ये भाग घेऊन एव्हरेस्ट
शिखर सर केलेल्या ९ विद्यार्थ्यांना गडकरी यांच्या हस्ते या कार्यक्रमात पुरस्कार देऊन
गौरवण्यात आलं.
****
मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांसाठी सूक्ष्मसिंचनाकरता अतिरिक्त
३३७ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी दिली. ते आज
बुलडाणा इथं बोलत होते. हा निधी तीन वर्षांच्या कालावधीसाठी मंजूर केल्याचं त्यांनी
सांगितलं. राज्यात सुमारे ९ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्मसिंचनाखाली आलं असून, या योजनेच्या
पूर्व संमतीचा ३० दिवसांचा कालावधी संपल्यानंतर देखील नव्यानं अर्ज करण्याची सुविधा
उपलब्ध करुन दिल्याचं, डॉ.बोंडे यांनी सांगितलं. राज्यात गेल्या पाच वर्षात सूक्ष्म
सिंचन योजना प्रभावी आणि पारदर्शकपणे राबवल्यानं सुमारे ११ लाख शेतकऱ्यांचा आर्थिक
स्तर उंचावण्यास मदत झाली असल्याचं कृषीमंत्री म्हणाले.
****
विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमधल्या शिक्षकांना
वेतन सुरू करण्यात यावं, या मागणीसाठी जालना जिल्ह्यात विनाअनुदानित उच्च माध्यमिक
शाळा कृती समितीच्या वतीनं आज रस्ता बंद आंदोलन करण्यात आलं. १५ ऑगस्टपर्यंत वेतनाच्या
प्रश्नावर तोडगा न निघाल्यास आत्मदहनाचा इशारा आंदोलक शिक्षकांनी प्रशासनाला दिल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड - पनवेल - नांदेड एक्सप्रेस रेल्वेगाडी पुणे ते
पनवेल दरम्यान १२ ऑगस्ट पर्यंत अंशत: रद्द करण्यात आली आहे. तर लोकमान्य टिळक टर्मिनस
- काझीपेट - लोकमान्य टिळक टर्मिनस ताडोबा एक्सप्रेस ही गाडी आज रद्द करण्यात आली आहे.
मुंबई, पुणे आणि कोल्हापूर परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे
हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment