Monday, 2 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.09.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०२ सप्टेंबर २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  राज्यातल्या स्थिर सरकारमुळे विकास झाल्याचा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमीत शाह यांचा दावा
Ø  देशाच्या खालावत चाललेल्या आर्थिक स्थितीला केंद्र सरकार जबाबदार - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग
Ø  महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोशियारी यांची नियुक्ती
Ø  सार्वजनिक गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात  
आणि
Ø  वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातही भारत विजयाच्या उंबरठ्यावर
****

 भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा काल सोलापूर इथं, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत समारोप झाला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपनं स्थिर सरकार दिलं, स्थिर सरकारमुळे विकास होत असल्याचं शहा यांनी नमूद केलं. ते म्हणाले...
 मित्रौं महाराष्ट्र के अंदर सत्ता की खिचतान एक संस्कृती बनकर रह गई थी | 1972 के बाद  पहिली बार कोई मुख्यमंत्रीने पाच साल समाप्त किये है तो  मेरे भाई देवेंद्र फडणवीस ने समाप्त किये हे. वसंतराव नाईक के बाद देवेंद्र फडणवीस पहिले मुख्यमंत्री हे. जिसनें पाच साल समाप्त किये हे. और इस स्तिरता से ही विकास आया हे.

 या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, उस्मानाबादचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील, आणि सातारा जिल्ह्यातल्या माण खटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलेल्या भाषणात, महाजनादेश यात्रेला नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले. या दुसऱ्या टप्प्यात काल अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी लातूर तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातही जाहीर सभांना संबोधित केलं. तुळजापूर इथल्या तुळजाभवानी संस्थानच्या वतीने पूरग्रस्तांसाठी दिलेल्या २५ लाख रुपयांचा धनादेश उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी काल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.

 दरम्यान, उजनी धरणाचं पाणी लातूरपर्यंत आणलं जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. लातूर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. वॉटर ग्रीड योजनेच्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांच्या निविदा निघाल्या असून, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी निविदा काढण्याचा आपला प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले.

 निलंगा इथंही मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचं काल स्वागत करण्यात आलं. देवणी परिसरातून रेल्वेमार्ग जाण्यासाठी मंजुरी मिळवून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. औसा इथं महाजनादेश यात्रेच्या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी, औसा शहराला माकणी धरणाचे पाणी आणण्यासाठी ४५ कोटी रूपयांच्या योजनेला आठ दिवसात मंजूरी देण्यात येणार असल्याचं सांगितलं.
****

 देशाच्या खालावत चाललेल्या आर्थिक स्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे. मागील तिमाहीमध्ये देशाचा आर्थिक विकास दर पाच टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. आर्थिक विकास दर घटल्यामुळं भारत आर्थिक मंदीचा शिकार बनू शकतो, अशी भिती त्यांनी यावेळी व्यक्त केली. देशातल्या युवक, शेतकरी, कामगार, उद्योजक आणि वंचित घटकांच्या विकासासाठी आर्थिक विकास दर चांगला ठेवणे आवश्यक असल्याचंही सिंग यांनी स्पष्ट केलं.
****

 देशातल्या पाच राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोशियारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान हे केरळचे, कलराज मिश्र हे राजस्थानचे, तर माजी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असतील. तेलंगणाच्या राज्यपालपदाची जबाबदारी डॉक्टर तमिलीसाई सुंदरराजन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 
****

 शेतकऱ्यांनी आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी रेशीम उद्योगाकडे वळावं, असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. जालन्यात रेशीम कोष बाजारपेठेच्या नियोजित इमारतीचं भूमीपूजन काल दानवे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यावेळी उपस्थित होते. रेशीम अळी विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक हजार रुपये तसंच रेशीम कोष विक्रीसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्यमंत्री खोतकर यांनी यावेळी केली. मराठवाड्यात रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी उपसंचालक कार्यालयाची स्थापना करण्यात येणार असल्याचं खोतकर यांनी सांगितलं.    
****
 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची, तर हिंगोली, जालना, उस्मानाबाद, बीड, लातूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या काही भागात तुरळक पावसाची काल नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड, अर्धापूर, नायगाव आणि हदगाव या तालुक्यातल्या १९ महसूल मंडळात आणि परभणी जिल्ह्यातल्या चार महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीनं शेतातल्या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या गल्ले बोरगावात गाव नदीला आलेल्या पुरात अनिल येडू बोडखे हा युवक वाहून गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला तर देवगाव रंगारी ते लामणगाव रस्त्यावर असलेल्या खडकी नदीच्या पुलावरून परसराम मळे हा इसम वाहून गेला.  रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्यात येत होता.
****

 औरंगाबाद जिल्ह्यातल्या पितळखोरा लेणीजवळील कुंडात बुडून दोन युवकांचा काल मृत्यु झाला.  लेणीजवळील धबधब्याजवळ सेल्फी काढण्यासाठी जात असताना पाय घसरून योगेश भोंगळे हा युवक कुंडात पडला. त्याला वाचविण्यासाठी शरद साळुंखे या युवकाने पाण्यात उडी घेतली असता, दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यु झाला.
****

 सार्वजनिक गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. सगळीकडे गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी झाली आहे. पावसाचं वातावरण असतानाही गणपतीच्या स्वागतासाठी विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी काल बाजारपेठा गर्दीनं फुलून गेल्या होत्या. सकाळी घरगुती गणपतींच्या स्थापनेनंतर दुपारनंतर मंडळांच्या गणपतींची स्थापना होईल. १२ सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव चालणार आहे.
****

 यजमान वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातही भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. जमैका इथं सुरु असलेल्या या सामन्यात भारतानं इंडिजला विजयासाठी ४६८ धावांचं आव्हान दिलं आहे. तिसऱ्या दिवसाअखेर या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं दोन बाद ४५ धावा केल्या आहेत. तत्पूर्वी वेस्ट इंडिजचा पहिला डाव ११७ धावात संपुष्टात आला. त्यानंतर भारतानं फॉलोऑन न देता दुसरा डाव सुरू केला, चार बाद १६८ धावा केल्यानंतर भारतानं दुसरा डाव घोषित केला. यामुळे विजयासाठी ४६८ धावा करण्याचं इंडिजला आव्हानं मिळालं.
****

 औरंगाबाद इथल्या देवगिरी महानंद जिल्हा दूध उत्पादक संघानं, दुधाच्या दरात लीटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे दुधाचा किरकोळ विक्री दर ४२ रुपये प्रतिलीटर असा राहील. दुधाच्या खरेदी दरातही महानंदनं प्रतिलीटर एक रुपयानं वाढ केली आहे. त्यानुसार दूध उत्पादकांना लीटरमागे २८ रुपये दर दिला जाणार आहे.
****

 परभणी विधानसभा मतदारसंघातल्या ब्राह्मणगाव ते मांडाखळी या सिमेंट कॉक्रीट रस्त्याचं भूमीपूजन आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आलं. दुरावस्था झालेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीची ग्रामस्थांकडून मागणी होती.
****

 सांगली जिल्ह्यात तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माजी मंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांच्या हस्ते काल झालं.
*****
***

No comments:

Post a Comment