Monday, 9 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 09.09.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक सप्टेंबर २०१ सायंकाळी ६.००
****
मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेअंतर्गत लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतल्या कामांसाठी निविदा काढण्यास राज्यमंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.   
विदर्भ तसंच मराठवाड्यात परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद असलेल्या क्षेत्राबाहेरच्या शेतकऱ्यांना दिलेली कर्ज माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला. कुष्ठरोग पीडितांसाठी मुख्यमंत्री आवास योजना, दिव्यांगांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र स्थापना, अहमदनगर जिल्ह्यात राजूर इथं कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश तसंच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापना, नवलभाऊ प्रतिष्ठानच्या औरंगाबाद इथल्या विधि महाविद्यालयाला अनुदान, पीएचडी झालेल्या अधिव्याख्यात्यांना १ जानेवारी १९९६ पासून दोन वेतनवाढी, महाराष्ट्र परिचारिका अधिनियमात सुधारणा यासह एकूण सदतीस निर्णयांवर मंत्रिमंडळानं आज शिक्कामोर्तब केलं.
****
आर्थिक आणि सामाजिक विषमता दूर होईपर्यंत तसंच लाभार्थींना आवश्यकता वाटते, तोपर्यंत आरक्षण सुरू ठेवायला हवं, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मत आहे. संघाचे सह सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी आज राजस्थानात पुष्कर इथं ही माहिती दिली. संघाच्या तीन दिवसीय समन्वय परिषदेच्या समारोप सत्रानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मंदीरं, स्मशानभूमी आणि जलाशयं कोणत्याही विशिष्ट जातीसाठी राखून न ठेवता, सर्वांसाठी खुली असावीत, असं मत ही होसबळे यांनी व्यक्त केलं.
****
चांद्रयान मोहिमेतल्या विक्रम लँडरने चंद्रावर हार्ड लँडिंग झालं असलं तरीही विक्रम लँडरचं काहीही नुकसान झालं नसल्याचं, भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोनं सांगितलं आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी निर्धारित असलेल्या ठिकाणापासून जवळच उतरलेलं विक्रम लँडर एका बाजूला झुकलेलं असून, त्याच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून, हे प्रयत्न येत्या चौदा तारखेपर्यंत सुरू ठेवले जाणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
काँग्रेससोबत आघाडीसाठी न थांबता, आपण आपले उमेदवार जाहीर करू अशी घोषणा, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. आघाडीसाठी वंचित बहुजन आघाडीच तयार नसल्याचा देखावा काँग्रेसला उभा करायचा आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला. एमआयएमसोबत मात्र मैत्रीपूर्ण चर्चा सुरू असून, उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत ही चर्चा सुरू राहील, असं आंबेडकर यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री भास्कर जाधव यांनी शिवसेनेत परतण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जाधव यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर इथं आपल्या समर्थकांशी चर्चेनंतर ही घोषणा केली. येत्या शुक्रवारी तेरा तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विधानसभेच्या गुहागर मतदार संघातून निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक असून, याबाबतचा अंतिम निर्णय मात्र शिवसेना पक्षप्रमुख घेतील, असं जाधव यांनी स्पष्ट केलं.
****
जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात यावी या मागणीसह अन्य मागण्यांकरिता शासकीय-निमशासकीय कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समन्वय समितीनं आज यवतमाळ आणि धुळे इथं लाक्षणिक संप पुकारला. परभणी इथंही शाळा, कार्यालयं बंद ठेवत हा संप पाळला गेला. 
****
लोकशाहीत एक सक्षम नागरिक घडवण्यासाठी उच्च शिक्षण संस्थातल्या निवडणुका आवश्यक असल्याचं मत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन यांनी व्यक्त केलं आहे. ते आज औेरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं आयोजित “उच्च शिक्षण संस्थातील निवडणुका : युवा नेतृत्वाचा उदय” या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. २०१६ चा विद्यापीठ निवडणूक कायदा हा विद्यार्थी केंद्रीत असून यामुळे समाजासाठी काम करण्याची संधी युवकांना मिळणार असल्याचं ते म्हणाले. पुढील निवडणुकांमध्ये समाजहित आणि राष्ट्रहितासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीमागं समाज राहणार असून असं नेतृत्व निर्माण करण्यासाठी हा कायदा उपयुक्त असल्याचं त्यांनी सांगितलं.  
****
राज्याच्या विधान परिषदेचे औरंगाबाद तथा जालना स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अंबादास दानवे यांनी आज शपथ घेतली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्यांना सदस्यत्वाची शपथ दिली.
****
नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे धरणातला पाणीसाठा वाढला आहे. आज सकाळपासून गंगापूर धरणातून सुमारे साडे तीन हजार घनफूट प्रतिसेकंद, दारणा धरणातून साडे सात हजार तर नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून सुमारे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****



No comments:

Post a Comment