Tuesday, 10 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 10.09.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -१० सप्टेंबर २०१ सकाळी ७.१० मि.
****

v विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाचे ३७ निर्णय; लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी प्रस्तावित वॉटर ग्रीडच्या कामांसाठी तीन हजार १२२ कोटी रूपयांच्या प्रस्तावास मान्यता; सावकारांचे क्षेत्राबाहेरचे बेकायदेशिर कर्ज माफ
v काँग्रेससोबत युती न करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्णय; मात्र एमआयएमसोबत युतीची अजुनही आशा
v आमच्यात चर्चा नाही, मात्र वंचित बहुजन आघाडीनं झुलवत ठेवण्यापेक्षा योग्य निर्णय घेण्याचं एमआयएमचं आवाहन
 आणि
v ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना अंबाजोगाईचा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार जाहीर
****

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल राज्य मंत्रीमंडळानं एकूण ३७ निर्णय घेतले. मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांसाठी प्रस्तावित ग्रीडच्या मुख्य आणि दुय्यम जलवाहिन्या, जलशुद्धीकरण यंत्रणा आदी कामांसाठी तीन हजार १२२ कोटी रूपयांच्या पहिल्या प्रस्तावास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

 विदर्भ आणि मराठवाड्यातल्या परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरच्या शेतकऱ्यांना दिलेली बेकायदेशिर कर्ज माफ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. दिव्यांगांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापणे, सोलापूरच्या अहिल्याबाई होळकर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र स्थापन करून त्यांच्या जीवन कार्यावर संशोधन आणि प्रबोधन करण्यास,  शासन सेवेत दीर्घकाळ काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना वैद्यकीय प्रवेशाच्या वेळेस आरक्षण देण्यासाठी कायदा करण्यास, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध योजनांतर्गत रस्ते आणि पुलांच्या बांधकामांसाठी लागणाऱ्या खडी, रेती, माती, मुरूम यासारख्या गौण खनिजांवरचं स्वामित्वधन माफ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. औरंगाबाद इथल्या नवलभाऊ प्रतिष्ठानच्या विधि महाविद्यालय आणि  संगमनेरच्या ओमकारनाथ मालपाणी विधि महाविद्यालयास अनुदान मंजूर, पीएचडी झालेल्या अधिव्याख्यात्यांना १ जानेवारी १९९६ पासून दोन वेतनवाढी देण्यास मान्यता देण्याबरोबरच विदर्भ आणि मराठवाड्यातल्या १९ जिल्ह्यांमधल्या बचतगटांच्या १९ हजार लाभार्थ्यांना अंड्यावरील कोंबड्याचे गट वाटप करण्यासह कुक्कुट विकासाचे निर्धारित उपक्रम राबवण्यास मंत्रीमंडळानं मंजुरी दिली.
****

 राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे श्रीवर्धनचे आमदार ज्येष्ठ आमदार अवधूत तटकरे आणि त्यांचे वडील माजी आमदार अनिल तटकरे यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे.

 दरम्यान, येत्या १३ सप्टेंबर रोजी आपण शिवसेनेत पुन्हा प्रवेश करणार असल्याचं रत्नागिरी जिल्ह्यातले गुहागर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  आमदार भास्कर जाधव यांनी काल चिपळूण इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. यावेळी जिल्हा परिषदेचे नऊ सदस्यही आणि ६३ सरपंच आपल्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाधव म्हणाले.
****

 विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत चर्चेची दारे आता बंद झाली असून युतीची शक्यता संपल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना केली. यामुळे वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आणि माणिकराव ठाकरे यांच्याबरोबर युतीसाठी बैठक झाली. त्यावेळी एकूण जागांचं समान वाटप करण्याच्या दिलेल्या प्रस्तावाला काँग्रेसन अद्यापपर्यंत उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्यात रस नसल्याचं आंबेडकर म्हणाले. एआयएमआयएमसोबत मात्र मैत्रीपूर्ण चर्चा सुरू असून, उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत ही चर्चा सुरू राहील, असं आंबेडकर यांनी सांगितलं.

 दरम्यान, युतीबाबत आमच्यात कोणतीही चर्चा सुरू नाही, मात्र वंचित बहुजन आघाडीनं एमआयएमला झुलवत ठेवण्यापेक्षा युतीबद्दल योग्य निर्णय घ्यावा अस आवाहन, खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात वंचित बहुजन आघाडी - एमआयएम युतीला सुवर्णसंधी असून, अजुनही वेळ गेली नसल्याचं ते म्हणाले.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अंबादास दानवे यांनी काल विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्यांना सदस्यत्वाची शपथ दिली.
****

 जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात यावी या मागणीसह अन्य मागण्यांकरिता शासकीय-निमशासकीय कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समन्वय समितीनं काल राज्यात लाक्षणिक संप पुकारला. या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद इथं या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परीषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं. परभणी जिल्ह्यात शाळा, कार्यालयं बंद होती.
****

 अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दिला जाणारा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र, अस या पुरस्काराच स्वरूप आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी ही माहिती दिली. भगवानराव लोमटे यांच्या स्मृतिदिनी येत्या १९ सप्टेंबरला हा पुरस्कार भावे यांना अंबाजोगाई इथं समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
****

 भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे मंदीची लाट आली असून, जीएसटी, नोटबंदी हेच मंदीचं मुख्य कारण असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्या काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना पदाचं आमिष दाखवून भाजप पक्षात घेत असून, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री बनणार असतील, तर सत्ता कोणाचीही असली तरीही सरकार आमचंच असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
*****
***

No comments:

Post a Comment