Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -११ सप्टेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v औरंगाबाद
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १६८० कोटी ५० लाख रूपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला
शासनाची मंजुरी
v एमआयएमची वंचित बहुजन आघाडीसोबतची
युती संपुष्टात आणण्याच्या निर्णयावर पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचं शिक्कामोर्तब;
v काँग्रेस नेते, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांचा
पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; मात्र भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्टीकरण
आणि
v पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात गणेश मूर्तींचं
विसर्जन न करता मूर्ती स्वतःकडचं ठेवण्याचं किंवा प्रशासनाला दान करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं
आवाहन
****
औरंगाबाद शहराला पैठण
इथल्या जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी १६८० कोटी ५० लाख रूपयांच्या नवीन पाणीपुरवठा
योजनेला शासनानं मंजुरी दिल्याची माहिती, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी काल औरंगाबाद
इथं वार्ताहरांशी बोलतांना दिली. राज्य शासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि औरंगाबाद
महानगरपालिकेच्या माध्यमातून ही योजना अंमलात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते
म्हणाले..
एन.जे.पी. औरंगाबाद महानगरपालिका आणि शासन यांच्या माध्यमातून महराष्ट्रामध्ये जी
सर्वांत पहिली ऐवढी मोठी पाणीपुरवठ्याची येाजना आहे, ती संपूर्ण शहरासाठी आहे, याच्या
मध्ये सातारा, देवळाई, पडेगाव छार्लर क्षेत्र सर्व याच्या मध्ये कव्हर करतोय. पूर्ण
पैसा हा शासनचं देणार आहेत. शासनाने एकदा का मंजूरी दिली की शासनाने प्रव्हीजन करूनचं
ते मंजूरी देतात ते.
२०५२ पर्यंत शहराची लोकसंख्या
३३ लाख होईल, ही बाब लक्षात घेऊन या योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. तसंच
३५६ ते ६०४ दसलक्ष लिटर्स प्रतिदिनपर्यंत पाणी उपसाची ही नवी योजना असल्याचं महानगरपालिका
आयुक्त निपुण विनायक यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद
इथं जाहीर सभेत या योजनेची घोषणा केली होती. नगरविकास विभागानं मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी
काल या योजनेला मंजुरी दिली.
****
अखिल भारतीय मजलिस इ
इत्तेहादुल मुस्लिमीन -एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काल वंचित
बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याच्या निर्णयाचं हैदराबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना समर्थन
केलं. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांचा निर्णय पक्षाचा अधिकृत निर्णय
असल्याचं ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीनं विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी केवळ आठ
जागा देण्याची तयारी दाखवल्यानंतर खासदार जलील यांनी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय
जाहीर केला होता.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष
जलिल यांनी काल विधानसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावं घोषित केली. यामध्ये नांदेड
उत्तर विधानसभा मतदारसंघातून मोहम्मद फिरोज खान, वडगावशेरी पुणे मतदारसंघातून डॅनियल
रमेश लांडगे, तर मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून मुफ्ती मोहम्मद इस्माइल अब्दुल
खालिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
काँग्रेस नेते, राज्याचे
माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी काल पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. जम्मू काश्मीरला
विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला काँग्रेस पक्षानं केलेला
विरोध मान्य नसल्यामुळे आपण राजीनामा देत असून, आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार
नसल्याचं सिंह यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं. काँग्रेसकडून लोकसभा
निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून
पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
वर्धा जिल्ह्यातले राष्ट्रवादी
काँग्रेसचे नेते समीर देशमुख यांनी काल मुंबईत, कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत
शिवसेनेत प्रवेश केला. समीर देशमुख हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विदर्भ
पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश देशमुख यांचे सुपुत्र
आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
गेल्या सलग सहा तिमाहीत
देशाचा विकासदर घसरत असून, ठप्प झालेली गुंतवणूक, व्याजदर कपातीचा शून्य परिणाम आणि
कमी होत असलेल्या अप्रत्यक्ष कर संकलनाचा थेट
परिणाम गंभीर आर्थिक मंदीत झाला, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं
आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. विविध बँकांमध्ये १५ टक्क्यांनी वाढलेल्या
बँक घोटाळ्यांचा तपशील जाहीर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी
काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची १२३-१२५ जागांची अंतिम यादी तयार झाली असून,
इतर पक्षांशी बोलणी सुरु असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या
सर्व गणेश मंडळांनी त्यांच्याकडच्या गणेश मूर्तींचं विसर्जन न करता त्या मूर्ती स्वतःकडचं
सुरक्षित ठेवाव्यात अथवा प्रशासनाला दान कराव्यात, असं आवाहन जिल्हाधिकारी जी श्रीकांत
यांनी केलं आहे. लातूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे टंचाईची परिस्थिती
आहे, त्यामुळे गणेश मूर्तीच्या विसर्जनाला पाणी नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी काल झालेल्या
शांतता समितीच्या बैठकीत सांगितलं. जी गणेश मंडळे मूर्ती विसर्जनासाठी जिल्ह्याबाहेर
घेऊन जात असतील, तर त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी त्या गणेश मंडळाची राहील असंही यावेळी
सांगण्यात आलं. लातूर शहरातल्या गणेश विसर्जनाच्या सर्व पारंपारिक ठिकाणी महापालिकेच्यावतीनं
गणेश मंडळांकडून मुर्त्या स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या
सरकारने केलेली नोटबंदी सपशेल फसली असून, देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आल्याचं राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर
इथं काल संवाद यात्रेनिमित्त झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. पाच वर्षात देशात
सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्याचं सांगतानाच त्यांनी सरकारवर टीका केली. यावेळी
सुळे यांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
*****
***
No comments:
Post a Comment