Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 11
September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील मथुरा येथून राष्ट्रीय पशू रोग नियंत्रण कार्यक्रमाची
सुरवात केली. पशूंच्या खुरांना आणि तोंडाला होणाऱ्या रोगांमुळे अनेक जनावरांना आपला
प्राण गमवावा लागल्यानं हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत सुमारे पन्नास कोटी जनावरांना लस टोचली जाणार असुन यात गायी,
बैल, शेळ्या, मेंढ्या,
डुक्करांचा समावेश आहे. हा कार्यक्रम देशातल्या सहाशे सत्त्याऐंशी जिल्ह्यांमध्ये राबवण्यात
येणार असून हे लसीकरण पुढील पाच वर्षांपर्यंत
चालणार आहे. या मोहिमेसाठी बारा हजार सहाशे
बावन्न कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय कृत्रिम गर्भ धारणा कार्यक्रमाचं उदघाटनही यावेळी झालं. त्यानंतर पंतप्रधान
मोदी यांनी पशू विज्ञान आणि आरोग्य मेळ्याला
भेट देऊन "स्वच्छ ही सेवा" अभियानचीही सुरुवात केली.
****
काश्मीरमधील
बारामुल्ला जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार
झाला. या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम
हाती घेतली होती. त्यावेळी झालेल्या चकमकीत हा दहशतवादी मारला गेला.
****
जीवनाच्या मूलभूत मानवाधिकाराला क्षती पोहचवणा-या
दहशतवादी संघटना आणि त्यांना आश्रय देणाऱ्या विरोधात एकत्रितपणे निर्णायक आणि ठोस कारवाई
करण्याची वेळ आली आहे, असं भारतानं म्हटलं आहे. जिनेवा इथं संयुक्त राष्ट् मानवाधिकार
परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव विजय ठाकुर सिंग यांनी निवेदन दिलं. मानवाधिकारच्या
नावाखाली राजकीय हित साधण्यासाठी मानव परिषदेच्या मंचापा गैरवापर करणाऱ्यावर जागतिक
समुदायानं नजर ठेवणं गरजेचं आहे, असं त्या म्हणाल्या.
****
आगामी विधानसभा निवडणूकीत
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुमारे 248 जागा
एकत्रितपणे लढवणार असून, उर्वरित मतदारसंघ मित्र पक्षांसाठी
सोडणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत ही
माहिती दिली. दोन्ही पक्षांच्या सहमतीनं काही जागांची आदलाबदल होईल, असं ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीशी, तसंच
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि समाजवादी पक्षाशी चर्चा सुरु
असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
सांगली आणि परिसरातील पुर आपत्ती निवारणासाठी जागतिक बँक
आणि एशियन बँकेच्या पथकाकडे तिनशे कोटी रुपये
खर्चाचा आराखडा सादर करण्यात आल्याचं महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी
सांगितलं आहे. सांगली जिल्ह्यात एकशे चार गावांना पुराचा
तडाखा बसला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात सध्या सोळा हजार चारशे तेरा घनफूट प्रतिसेकंद क्षमतेनं
पाण्याची आवक सुरू असून, धरणात सध्या अठ्ठ्याऐँशी पूर्णांक एकोणचाळीस शतांश टक्के पाणी साठा आहे.
उजव्या कालव्यातून नऊशे घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा
विसर्ग करण्यात येत आहे.
***
सहकारी संस्थेच्या
पदाधिकारी आणि सदस्यांनी सभासदांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या
वैभवासाठी विश्वस्त म्हणून काम करावं, असं आवाहन सहकार, मदत आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. राज्य शासनाच्या सहकार, पणन आणि
वस्त्रोद्योग विभागातर्फे मुंबईत आयोजित सहकार पुरस्कार वितरण
सोहळ्यात ते बोलत होते. सहकार समृद्ध झाल्याशिवाय राज्य
समृद्ध होणार नसल्यानं या क्षेत्रात काम करताना राजकीय विचार बाजूला सारून संस्था मोठी
करण्याचे प्रयत्न आवश्यक असल्याचं प्रतिपादनही मंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी केलं.
****
जळगाव इथल्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी
उच्च न्यायालयात राज्य सरकारनं नियुक्ती केलेले वकील अमोल सावंत यांच्याऐवजी वकील प्रवीण
चव्हाण यांनाच नियुक्ती द्यावी अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शिक्षा झालेल्या आरोपींशी
सावंत यांचे संबंध असल्याचं स्पष्ट झालं असल्यानं त्यांची नियुक्ती रद्द करावी,
असं अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
मुंबईमध्ये काल रात्री कोसळलेल्या एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या चौदा जणांना
वाचवण्यात आलं आहे. क्रॉफर्ड मार्केट इथं ही दूर्घटना घडली होती. बृहण मुंबई महापालिकेच्या
आपत्ती निवारण कक्षानं दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे.
****
पुरुषांच्या
फुटबॉल विश्वचषक पात्रता फेरीत, काल दोहा इथं झालेल्या सामन्यात भारतानं आशियाई स्पर्धेच्या
विजेत्या कतारविरुद्ध शून्य- शुन्य अशी बरोबरी साधली. फीफा क्रमवारीमध्ये कतार बासष्ट तर भारत
एकशे तिन क्रमांकावर आहे. नुकतेच अर्जुन पुरस्कारानं सन्मानित गोलरक्षक गुरप्रितनं
कतारची २७ आक्रमणं या लढतीत अयशस्वी ठरवली.
*****
***
No comments:
Post a Comment