Wednesday, 11 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 11.09.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ सप्टेंबर २०१सायंकाळी ६.००
****
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एका आत्मसमर्पित नक्षलवाद्याचा आज मृत्यू झाला तर अन्य एक आत्मसमर्पित नक्षलवादी जखमी झाला आहे. नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यात गिलनगुडा इथं गोळीबार करत हा हल्ला केला. नैनवाडी इथले रहिवासी बत्तीस वर्षीय मधुकर मट्टामी यांचा यात मृत्यू झाला असून झारेवाडा इथले रहिवासी तीस वर्षीय अशोक होळी जखमी झाले आहेत. गडचिरोली इथं सध्या रहात असलेले हे आत्मसमर्पित नक्षलवादी आपल्या गावी आले होते. ते दुचाकीवर परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. होळी यांनी या हल्ल्यातून स्वतःची सुटका करून घेतं जखमी अवस्थेत जांभीया पोलिस मदत केंद्र गाठल्यानंतर त्यांना उपचारांसाठी हेलीकॉप्टरनं गडचिरोली रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नक्षलवाद्यांचा क्रूर चेहरा या हल्ल्यामुळं जगापुढं आला असल्याची प्रतिक्रीया गडचिरोली पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केली आहे.   
****
सरकार विषयी सर्वच क्षेत्रात प्रचंड नाराजी असून हे सरकार मनमानी करत असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना नीट असलेली अर्थव्यवस्था या सरकारच्या कार्यकाळात विस्कटली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या `ओला-उबेर`मुळे वाहन उद्योग अडचणीत आला असल्याचं हास्यास्पद विधान करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. ज्या नेत्यांना भाजपनं चोर म्हटलं तेच नेते पक्षांतर करून भाजप प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सुप्रिया सुळे यांनी महात्मा गांधी मिशन संस्थेतले विद्यार्थी, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संवाद कार्यक्रमाद्वारे चर्चाही केली.
****
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. या निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत एक मेळावा झाला. भाजप देईल ती जबाबदारी घेण्यास तयार असल्याचं यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वप्नं लोकांना भाजपकडे आकर्षित करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी नमुद केलं.
****
लातूर जिल्हातील निलंगा नगर परिषदेच्या वतीनं आज निलंगा इथं एकशे पाच फूट उंचीचा राष्ट्रध्वज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे हस्ते करण्यात आलं. युवकांनी राष्ट्रहित आणि निष्ठा जोपासावी तसंच तंत्रज्ञानाच्या कुशल उपयोगाद्वारे  देशाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केलं.
 ****
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं सतरा अंगणवाडी सेविका प्रशिक्षणावेळी आग्या मोहळाच्या माशांनी हल्ला चढवल्यानं जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारांसाठी औंढा नागनाथ इथं ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महिला आणि बाल विकास कार्यालयात जागा नसल्यानं मोबाईल ॲपच्या प्रशिक्षणासाठी त्यांना एका शेतावर बोलावण्यात आलं होतं, त्यावेळी हा हल्ला झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद शहर - जिल्हा  काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली.  शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी  आदोलकांचं नेतृत्व केलं. वाढती महागाई, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, बेरोजगारी आणि ठप्प झालेले उद्योगधंदे या समस्यांसदर्भात निदर्शनं करून प्रशासनाला यावेळी निवेदन सादर करण्यात आलं.
****
राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये आज बीड जिल्ह्यातल्या धनगरवाडी इथं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून राष्ट्रीय महामार्ग २११ ते धनगरवाडी रस्ता सुधारणा, सभा मंडप तसंच राष्ट्रीय महामार्ग २११  ते कोळवाडी रस्ता सुधारणा कामांचा प्रारंभ झाला. क्षीरसागर यांच्या हस्ते यावेळी धनगरवाडी इथं प्रातिनिधीक स्वरूपात शिधा पत्रिकांचं वाटपही करण्यात आलं.
****
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बीड जिल्हात गेवराई तालुक्यातील रेवती इथल्या मंडल अधिकाऱ्याला आज एका कारवाईत अटक केली. श्रीधर साळुंके असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. त्यानं शेताच्या दाखल्यावरील नाव कमी करण्यासाठी साडे आठ हजार रुपये लाच मागितली होती.  ती स्वीकारताना ही अटक करण्यात आली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****


No comments:

Post a Comment