Saturday, 14 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 14.09.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -१४ सप्टेंबर २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  विधीमंडळाचे सदस्य नसलेले दोन मंत्री आणि एका राज्यमंत्र्यांचा मंत्रिमंडळातला समावेश रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
Ø  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार भास्कर जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश
Ø  विनापरवानगी पुतळा बसवल्याप्रकरणी आमदार नारायण कुचे यांना दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी
आणि
Ø  औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीन इथं औषधनिर्मिती क्षेत्राचं केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करणार - अन्न औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांची ग्वाही
****

 विधीमंडळाचे सदस्य नसलेले दोन मंत्री आणि अन्य एका राज्यमंत्र्याचा मंत्रिमंडळातला समावेश रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. मात्र राजकीय लाभासाठी केलेल्या अशा नियुक्त्या नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे.

 कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना आणि विधानसभा निवडणुकीस सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिला असताना, काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात आलेले राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अविनाश महातेकर यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलं. त्यांच्या या समावेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. मंत्री पदावर असताना हे तिघेही कोणत्याही सभागृहाचे सदस्य होण्याची शक्यता नसल्यामुळे, त्यांना मंत्रिपदावरून दूर करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान, अशा पद्धतीनं मंत्रिमंडळात घेणं नैतिकदृष्ट्या योग्य नसलं, तरी न्यायालय त्यांना अपात्र ठरवू शकत नाही, असं न्यायालयानं नमूद केलं आहे.
****

 अहमदनगर जिल्ह्यातला अकोले हा बेघर मुक्त तालुका तयार करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल अकोले इथं, महाजनादेश यात्रेदरम्यान जाहीर सभेत बोलत होते. या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला कालपासून प्रारंभ झाला. अकोले, संगमनेर, राहुरी मार्गे ही यात्रा काल सायंकाळी अहमदनगर शहरात दाखल झाली. महाजनादेश यात्रेचं शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं.
****

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून जाधव यांचं पक्षात स्वागत केलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याचं सांगितलं. भाजपनं शिवसेनेला देऊ केलेल्या जागांसंदर्भात पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं, ठाकरे म्हणाले.

 माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांनीही काल शिवसेनेत प्रवेश केला.
****

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. उदयनराजे यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली.
****

 निवड रद्द झालेल्या सहायक मोटार वाहन निरिक्षक पदावरच्या एकशे अठरा उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लोकसेवा आयोगामार्फत या सर्वांची निवड करण्यात आली होती, पण समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर ही निवड रद्द झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरुन आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करुन हा निर्णय घेतल्याचं, रावते यांनी सांगितलं.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 जालना जिल्ह्यात अंबड इथं विनापरवानगी पुतळा बसवल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार नारायण कुचे यांच्यासह ४३ संशयितांना अंबड न्यायालयानं दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र राज्य पुतळा पावित्र्यभंग प्रतिबंध अधिनियमान्वये आमदार कुचे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड इथं पाचोड चौकात काल पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा विनापरवानगी बसवण्यात आला, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

 दरम्यान, अंबड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, असा ठराव मंजूर करण्यात आला होता, असं आमदार कुचे यांनी सांगितल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 औरंगाबाद जिल्ह्यातलं बिडकीन हे औषधनिर्मिती क्षेत्राचं केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं अन्न आणि औषध प्रशासन संकुलाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. औरंगाबाद परिसरात औषध निर्मिती कंपन्यांसह मोठे उद्योग यावेत यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही राज्यमंत्री सावे यांनी दिली.
****

 परभणी जिल्ह्यात झरी परिसरात अद्ययावत साखर कारखाना उभारण्याची घोषणा आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केली आहे. झरी इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन तसंच तीन कोटी रुपयांच्या कामांचं लोकार्पण काल पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ऊस लागवडीसाठी या भागात उपलब्ध सुपीक जमीन, आणि लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याची उपलब्धता, यामुळे हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५९ वा दीक्षांत समारंभ आज होत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या नाट्यगृहात आज सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. यावर्षीपासून क्यू आर कोड असलेल्या पदव्याचं वितरण करण्यात येणार असल्याचं कुलगुरुंनी सांगितलं.
****

 औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथलं जायकवाडी धरण ९७ पूर्णांक २४ शतांश टक्के भरलं आहे. सध्या धरणात नऊ हजार सातशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. आवक वाढल्यास कुठल्याही क्षणी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येऊ शकते. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना आणि यंत्रणेला सर्तकतेचा इशारा देण्यात आला असल्याचं जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितलं.
****

 रेल्वेनं मालवाहतुकीच्या दरात सवलत जाहीर केली आहे. लोखंड आणि पेट्रोलियम पदार्थ वगळता इतर माल वाहतुकीवरचा १५ टक्के अधिभार रद्द करण्यात आला आहे.  सिमेंट, धान्य तसंच खतांची वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
*****
***

No comments:

Post a Comment