आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१४ सप्टेंबर
२०१९ सकाळी ११.००
वाजता
****
छत्तीसगड मधील दंतेवाडा जिल्ह्यात काल रात्री सुरक्षा
दलानं केलेल्या कारवाईत दोन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं. या दोन्ही नक्षलवाद्यांवर
पाच लाख रुपयांच बक्षिस ठेवण्यात आलं होतं. लच्छू मंडावी आणि पोडिया असं ठार करण्यात
आलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहे. त्यांच्याकडून विदेशी बनावटीची बंदुक जप्त करण्यात
आली असल्याचं दंतेवाडाचे पोलिस अधिक्षक अभिषेक पल्लावा यांनी म्हटलं आहे.
*****
राज्यात गाळमुक्त धरण
आणि गाळयुक्त शिवार या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळं ९ कोटी ६४ लाख घनमीटर गाळ
काढण्यात आला आहे. यामुळे ५२७० धरणं स्वच्छ झाली आहे. धरणातील गाळ काढल्यामुळं ४७ दशलक्ष
घनमीटर पाणी साठ्यात वाढ झाली आहे. काढलेला गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला असून
त्यामुळं शेतजमिनीच्या सुपिकतेत वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे.
*****
परिवहन विभागाने निवड रद्द झालेल्या सहायक मोटार
वाहन निरिक्षक पदावरच्या एकशे अठरा उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्याचा निर्णय
घेतला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती
दिली. लोकसेवा आयोगामार्फत झालेली या सर्व उमेदवारांची निवड समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावरून रद्द झाली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरुन आणि मानवतेच्या
दृष्टीकोनातून या सर्वांना सेवेत घेण्याचा निर्णय घेतल्याचं,
रावते यांनी सांगितलं.
*****
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला
‘सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. जगभरातील कॉमनवेल्थ
देशांतील मुक्त आणि दूरशिक्षण संस्थांची सर्वोच्च संस्था कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगच्या
वतीनं हा पुरस्कार देण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन आणि कुलसचिव
डॉ. दिनेश भोंडे यांनी स्कॉटलंडमधील इडनबर्ग इथं गुरुवारी एका भव्य समारंभात कोलच्या
अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशा कंवर यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
*****
***
No comments:
Post a Comment