Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 14
September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीस कंपन्यांना
भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे दोन्ही देशांना तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासामध्ये मोठा फायदा होईल, असंही कोविंद
यांनी म्हटलं आहे. ते काल स्वित्झर्लंडमधल्या बर्न इथं भारत-स्वित्झर्लंड बिझिनेस राऊंड
टेबल परिषदेत बोलत होते. भारतात गुंतवणुकीच्या संधीचा अभ्यास करण्यासाठी गुंतवणूकदारांनी
इंडिया इनव्हेस्टमेंट ग्रीड या ऑनलाईल पोर्टला भेट देण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी
केलं. स्वित्झर्लंड हे तंत्रज्ञानाचं माहेरघर
आहे; तर भारत जागतीक दर्जाच्या मनुष्यबळाची राजधानी ठरत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना एकमेकांच्या सहकार्याचा मोठा वाव असून त्यामुळे भांडवल, तंत्रज्ञान, विज्ञान, कौशल्य
यांसारख्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांचा मोठा फायदा होऊ शकतो अशी पुष्टीही त्यांनी
यावेळी जोडली. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष माऊरर यांच्याशी काल चर्चा करताना राष्ट्रपती
कोविंद यांनी दोन्ही देशांदरम्यानचे व्यापारी संबंध अधिक बळकट करण्यावर भर दिला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचं
प्रदर्शन आणि लिलाव आजपासून सुरू होणार आहे. या लिलावातून मिळालेल्या निधीचा गंगा नदीच्या संवर्धनासाठी वापर करण्यात येणार आहे. हा लिलाव
डब्लु डब्लु डॉट पी एम मेमेंटोस डॉट जी ओ व्ही डॉट इनवर तीन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. पंतप्रधान मोदी
यांनी मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलावाची दुसरी फेरीमध्ये एकूण दोन हजारपेक्षा अधिक वस्तूंचा
लिलाव करण्यात येणार आहे.
****
केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर आणि देशांतर्गत
कांद्यांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांदा निर्यातीचे मूल्य प्रति क्विंटल
८५० डॉलर एवढे निश्चित केले आहे. या किंमतीच्या खाली कोणत्याही निर्यातदारास कांदा
परदेशात निर्यात करता येणार नाही. गेल्या महिन्यात सरकारनं अवैध कांदा साठवणूक करणाऱ्या
व्यापाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला होता. मध्यप्रदेश, कर्नाटकसारख्या मोठ्या
कांदा उत्पादक राज्यांमध्ये पुरामुळे कांदा उत्पादन घटल्यानं देशांतर्गत कांद्याच्या
किंमतीत वाढ झाली आहे. एम एम टी सी या सरकारी संस्थेनं आयातदारांना पाकिस्तान आणि चीनमधून
कांदा आयात करण्यास बंदी घातली असून दोन हजार क्विंटल कांद्याच्या आयातीच्या टेंडरमध्येही
अनुरूप बदल करण्यात आला असल्याचं या संस्थेनं म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत
भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
भोसले यांच्या पक्षप्रवेशानं येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये नक्कीच मदत होईल, असं शहा यांनी यावेळी सांगितलं. काल पुण्यात
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजे यांनी भाजप
पक्ष प्रवेशाचा निर्णय जाहीर केला होता.
****
पोलंड चे उच्चस्तरीय
शिष्टमंडळ गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहे. भारत आणि पोलंड यांच्यातील
संयुक्त व्यापार आणि औद्योगिक वाढीसाठी महत्वपूर्ण बैठक आज खासदार युवराज संभाजीराजे
छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अन्नप्रक्रिया उद्योग, चामडी उद्योग,
चांदी उद्योग, वस्त्रोद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासंबंधीची प्राथमिक चर्चा झाली. यावेळी
दोन्ही देशांदरम्यान ’बिझनेस फोरम’ स्थापन करण्याची शक्यता पडताळून पाहण्यात आली. कोल्हापुरातील
पोलंड उच्चस्तरिय शिष्टमंडळचा दौरा उभय देशांतील औद्योगिक आणि व्यापार विषयक परस्पर
संबंध प्रस्थापित करण्यासाठी यशस्वी ठरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जळगाव जिल्ह्यात
तापी नदीवरील हतनूर धरणाचे २२ दरवाजे २ मीटरनं
उघडण्यात आले आहे. या धरणातून ९४ हजार ७९८ घनफुट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा
विसर्ग सुरू आहे. नदीच्या पाणलोट क्षेत्रात म्हणजेच बऱ्हाणपूर भागात पडत असलेल्या संततधार
पावसामुळं धरणातून अजून पाण्याचा विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे प्रशासनानं तापी नदी काठावरील
गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन
केलं आहे.
****
बेल्जियम इथं सुरु असलेल्या
आंतरराष्ट्रीय बेल्जियन चषक स्पर्धेत भारताच्या बॅटमिंटनपटू लक्ष्य सेन यानं पुरुष
एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत डेनमार्कच्या
किम ब्रुन याला २१-१८, २१-११ असं हरवतं अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत लक्ष्यची
डेनमार्कच्या व्हिक्टर सेवन्डसेन याच्याशी लढत
होणार आहे
*****
***
No comments:
Post a Comment