Monday, 16 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.09.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१६  सप्टेंबर  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी भूमिकेमुळे उदयनराजेंसारख्या अनेक नाराजांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाजनादेश यात्रेदरम्यान ते आज कराड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काश्मीर आणि कलम ३७० संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशानंतर सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व राहणार नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेनेसोबत जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात सुरू असून भाजप शिवसेना युतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. येत्या एकोणीस तारखेला महाजनादेश यात्रेचा नाशिक इथं पंतप्रधानांच्या उपस्थितीत समारोप होणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****

 आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात गोदावरी नदीत बोट उलटून, बेपत्ता झालेल्या पर्यटकांचा शोध अजूनही सुरु आहे. काल हा अपघात झाला, दूर्घटनाग्रस्त बोटीत सुमारे ६० पर्यटक होते. त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला तर २५ जण अजूनही बेपत्ता आहेत. या शोधकार्यात नौदलाची दोन हेलिकॉप्टर्सही सहभागी झाली आहेत.  राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.
****

 अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणात काल एका महिलेचा मुलासह पाण्यात बुडून मृत्यू झाला. काल सायंकाळी ही दुर्घटना घडली. या अपघातातून महिलेचा पती गणेश सातपुते बचावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अहमदनगर इथल्या बोरुडे मळ्यात राहणारे  हे कुटुंबीय काल धरण परिसरात पर्यटनासाठी आले होते.
****

 जायकवाडी धरणातून सध्या सुमारे दहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातला पाणी साठा नव्व्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याहत्तर शतांश टक्के एवढा झाला असून, अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातून धरणात सध्या सुमारे दहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.
*****
***

No comments:

Post a Comment