Wednesday, 4 September 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 04.09.2019....Morning Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०४ सप्टेंबर २०१सकाळी ७.१० मि.
****
·      भारतीय औद्योगिक विकास बँकेला नऊ हजार तीनशे कोटी रुपयांची भांडवली मदत देण्यास मंजुरी
·      इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय
·      राज्यात येत्या पाच वर्षात दहा लाख रोजगार निर्मितीचं लक्ष्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
·      अनुसूचित जमातीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीकरता सात नवीन समित्या स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
आणि
·      औरंगाबाद जिल्ह्यातल्या सहाशे कोटी रुपयांच्या अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी राज्य शासनाला ११ सप्टेबरपर्यंत मुदत
****
आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या भारतीय औद्योगिक विकास बँक - आयडीबीआयला नऊ हजार तीनशे कोटी रुपयांची भांडवली मदत देण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. आयुर्विमा महामंडळ - एलआयसी आणि केंद्र सरकार मिळून हा आर्थिक पुरवठा करणार आहेत. यापैकी ५१ टक्के रक्कम एलआयसी तर उर्वरित एकोणपन्नास टक्के रक्कम केंद्र सरकार देणार आहे.
****
सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्या खरेदी करत असलेल्या इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सी वर्गवारीतल्या मळीपासून तयार केल्या जाणाऱ्या इथेनॉलचा खरेदी दर ४३ रुपये ४६ पैसे प्रति लिटरवरून ४३ रुपये ७५ पैसे प्रति लिटर, तर बी वर्गवारीतल्या मळीपासून तयार केल्या जाणाऱ्या इथेनॉलचा खरेदी दर ५२ रुपये ४३ पैसे प्रति लिटरवरून ५४ रुपये २७ पैसे प्रतिलिटर केला आहे. याशिवाय ऊस आणि ऊसाच्या इतर उत्पादनांपासून तयार होणाऱ्या इथेलॉनचा खरेदी दर ५९ रुपये ४३ पैसे इतका निश्चित केला आहे. हा दर डिसेंबर २०१९ पासून एका वर्षासाठी लागू राहील.
****
राज्यात येत्या पाच वर्षात दहा लाख रोजगार निर्मितीचं लक्ष्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या युवा उद्योजकांसाठी स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणाऱ्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा’चा शुभारंभ काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावर्षी या योजनेकरता पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली असून, यातून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार होतील आणि रोजगाराला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
धरण व्यवस्थापनासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य सरकार एक उच्चस्तरीय समिती नियुक्त करणार आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नुकत्याच उद्भवलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. कर्नाटकातल्या अलमाटी धरणातून पुरेसा विसर्ग न झाल्यानं, कोल्हापूर तसंच सांगली जिल्ह्यात पूर आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या, आंध्रप्रदेशच्या पाणी पुनर्वाटपाच्या मागणीचा दोन्ही नेत्यांनी एकमुखानं विरोध केला.
****
राज्य शासनाकडून नांदेड गुरुद्वारा बोर्डास गुरु-त्ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यासाठी बिनव्याजी स्वरुपात देण्यात आलेली ६१ कोटी रुपयांची रक्कम अनुदानामध्ये रुपांतरित करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्यातल्या अनुसूचित जमातीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक गतिमान आणि सुलभ होण्यासाठी सात ठिकाणी नवीन समिती कार्यालयं स्थापन करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. पालघर, नाशिक, धुळे, किनवट, गोंदिया, यवतमाळ आणि चंद्रपूर इथं ही कार्यालयं स्थापन असतील. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार, विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव जागांचा लाभ घेणाऱ्या उमेदवारानं प्रवेशाच्या वेळीच त्याचं जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे, या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.
राज्यातल्या आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी विज्ञान शिक्षकांची अतिरिक्त पदे निर्माण करण्यास आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या भिलार इथं सुरु करण्यात आलेला पुस्तकांचे गांव हा उपक्रम आता नियमित योजना स्वरुपात रुपांतरित करून राबवण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
जळगांव घरकुल घोटाळ्याचे प्रमुख आरोपी माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह ३८ आरोपींना काल धुळे जिल्हा कारागृहातून नाशिक इथल्या कारागृहात पाठवण्यात आलं. अन्य दहा आरोपी हे धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. जळगांव घरकुल घोटाळ्यात ४८ आरोपींना धुळे विशेष न्यायालयात शनिवारी शिक्षा सुनावली होती, त्यानंतर या सर्व आरोपींची धुळे जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या सहाशे कोटी रुपयांच्या अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी कोणतीही कारवाई न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं नाराजी व्यक्त केली आहे. काल यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती टी.व्ही.नलावडे आणि न्यायमूर्ती के.के.सोनवणे यांनी, दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी, तसंच गुन्हा दाखल करण्यासाठी शासनाला ११ सप्टेबरपर्यंत मुदत दिली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव नगर पंचायतीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा प्रतिभा बोडखे यांच्या विरोधातला अविश्वास ठराव काल मंजूर झाला. भारतीय जनता पक्षाच्या नऊ नगरसेवकांनी हा अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यावर काल चर्चा होऊन १३ विरूध्द शून्य मतांनी हा प्रस्ताव मंजूर झाला. शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन सदस्य मतदानाला गैरहजर राहिले.
****
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि वीज बीलमाफी देण्यात यावी, शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य देण्यात यावं, पिकांच्या जीएम बियाणांना परवानगी देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला सादर करण्यात आलं.
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेनंही काल खुलताबाद तहसील कार्यालयावर शेतकरी बचाव बैलगाडी मोर्चा काढला होता.
****
उस्मानाबादचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे यांनी काल मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित होते.
****
राज्य शासनाच्या महाराष्ट्र आदर्श गाव भूषण पुरस्काराची काल घोषणा करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातल्या कोठोडा या गावाला पाच लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार, तर नांदेड जिल्ह्यातल्या शेळगाव गौरी या गावाला तीन लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात ३१० गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना प्रत्यक्षात राबवली जात आहे. जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी केलं आहे.
दरम्यान, राज्यभरात दीड दिवसांच्या गणपतींचं काल विसर्जन करण्यात आलं.
****
नाशिक- मुंबई -आग्रा रस्त्यावर वाडीव्हरे इथं काल झालेल्या अपघातात नाशिक इथल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या इनोव्हा मोटारीचे टायर फुटुन ती मालवाहु ट्रकवर आदळल्यानं हा अपघात झाला. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या रायगड जिल्ह्यातल्या उरण इथल्या प्रकल्पाला काल सकाळी आग लागली, या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. जमिनीखाली असलेल्या नाफ्ता टाक्यांच्या गळतीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या २२ बंबांनी सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं.
****
नांदेड-औरंगाबाद-नांदेड या रेल्वेगाडीला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद पाहता, या गाडीला आणखी सात डबे वाढवण्याची मागणी प्रवासी संघटनेनं केली आहे. यापैकी एक डबा वातानुकुलीत असावा, तसंच चार आरक्षित डबे असावेत, असं प्रवासी संघटनेनं म्हटलं आहे.
दरम्यान, या रेल्वे गाडीचं काल पहिल्या दिवशी परभणी रेल्वे स्थानकावर मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघातर्फे ढोल ताशे वाजवून स्वागत करण्यात आलं. 
****

No comments:

Post a Comment