Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date –14 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ सप्टेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
हिंदी भाषा आणि इतर भाषांचा एकत्रितरित्या विकास होणं आवश्यक असल्याचं गृहमंत्री
अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत हिंदी दिनानिमीत्त आयोजित विशेष कार्यक्रमात
बोलत होते. १९४९ रोजी आजच्या दिवशी घटना सभेनं देवनागरीमधील हिंदी भाषेला कार्यालयीन
भाषेचा दर्जा दिला होता. हिंदी भाषेमधे देशाला एका धाग्याने जोडण्याचं सामर्थ्य असल्याचं
शाह म्हणाले. कोणत्याही देशाला त्याची ओळख म्हणून एक सामुहिक भाषा असणं अत्यंत आवश्यक
असल्याचही ते म्हणाले. कायदा, न्याय, विज्ञान, औषधीसह सर्वच क्षेत्रांमध्ये हिंदीचा
वापर करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असंही शाह यावेळी म्हणाले.
****
भारतीय जनता पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबरला असणाऱ्या वाढदिवसानिमीत्त
’सेवा सप्ताहा’ची सुरुवात केली आहे. गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी नवी
दिल्लीत स्वच्छता मोहीम राबवून आणि एम्स रुग्णालयात रुग्णांना फळे वाटून या सप्ताहाची
सुरुवात केली. या सप्ताहभरात भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर,
अनाथाश्रमांना भेटी देऊन वस्तूंचं वाटप करणे यासारखे कार्यक्रम आयोजित करणार आहेत.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा
तालुक्यातल्या काष्टी इथं पोहचली. अहमदनगर जिल्ह्यातल्या दक्षिण भागाचा पाणी प्रश्न
सोडविण्यासाठी वाहून जाणारे अतिरिक्त पाणी नगर आणि मराठवाड्यात आणणार असून, साकळाई
उपसा सिंचन योजनेचं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असल्याचे ते म्हणाले. कुकडी प्रकल्पातील
डिंभे ते माणिकडोह पर्यंतच्या कामाला सुधारित मान्यता देण्यात आली असल्याचं त्यांनी
यावेळी सांगितलं.
****
विद्यार्थ्यांनी आव्हानांचा सामना करतानाच, उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन
डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी केलं
आहे. ते आज विद्यापीठाच्या ५९ व्या पदवी प्रदान समारंभात बोलत होते. विद्यापीठ अनुदान
आयोगाचे उपाध्यक्ष डॉ भूषण पटवर्धन यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. गुणवत्ता
हा शिक्षणाचा गाभा असून, ती कायम राखण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग प्रयत्नशील असल्याचं
डॉ पटवर्धन यांनी सांगितलं. यंदा प्रथमच क्यू आर कोड असलेली पदवी प्रमाणपत्र प्रदान
करण्यात आली.
****
बँक ऑफ
महाराष्ट्र १६ सप्टेंबरला सोमवारी बँकेचा ८५वा स्थापना दिवस ‘कृतज्ञता दिवस’ म्हणून
साजरा करणार आहे. उद्यापासून २२ सप्टेंबरपर्यंत कृतज्ञता सप्ताह पाळण्यात येणार असून
दीड कोटी ग्राहकांशी या माध्यमातून संपर्क साधण्यात येणार असल्याचं प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळवण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद
इथं विधीज्ञ प्रवीण वाघ यांच्या स्मृती दिनानिमित्त लोक स्वतंत्रता संघटन आणि अमन समितीच्या
वतीनं उद्या एक दिवसीय नागरी हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या शासकीय
ग्रंथालयाजवळील गांधी भवन इथं सकाळी १० वाजता न्यायमूर्ती बी.एन. देशमुख यांच्या हस्ते
या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. राष्ट्रीय नागरिक रजिस्टर, पर्यावरण आणि वन हक्क, मराठवाड्याच्या
विकासाचे प्रश्न यासह अन्य विषयांवर तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.
****
औरंगाबाद
इथलं जायकवाडी धरण ९८ टक्के भरलं आहे. सध्या धरणात १८ हजार ४६९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाण्याची आवक होत आहे. धरण ९९ टक्के भरल्यानंतर गोदापात्रात पाणी सोडण्यात येणार असून
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असल्याचं जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी
अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितलं.
****
धुळे शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून पाऊस सुरु आहे. आज सकाळी अक्कलपाडा धरणातून
तब्बल १२ हजार घनफुट प्रती सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तसंच
वाडी शेवाडी धरणातून ३ हजार ६०० घनफुट प्रती सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात
येत आहे.
****
अमरावती-पुणे-अमरावती आणि नागपूर-कोल्हापूर-नागपूर या रेल्वे गाड्यांचा वसमत रेल्वे
स्थानकावरील थांबा वाढवण्यात आला आहे. या दोन्ही गाड्यांचा वसमत रेल्वे स्थानकावरील
थांबा तीन महिन्यांकरीता तात्पुरत्या स्वरूपात वाढवला असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या
नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
व्हिएतनाम खुल्या बी डब्ल्यू एफ टूर सुपर हंड्रेड बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या
सौरभ वर्मानं पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
****
No comments:
Post a Comment