Tuesday, 1 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.10.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 October 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१  ऑक्टोबर २०१ दुपारी .०० वा.
****

 जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील सीमावर्ती भागामध्ये पाकिस्ताननं आज संघर्षविरामाचं उल्लंघन करत भारतीय चौक्या आणि निवासी भागावर अकारण गोळीबार केला. पुंछ जिल्ह्यातील शाहपूर आणि किरनी भागाला लक्ष्य करून सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला. भारतानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं असल्याचं संरक्षण विभागाच्या प्रवक्यानं जम्मूत आमच्या वार्ताहराला सांगितलं.
****

 जम्मू काश्मीर प्रशासनानं परवा गुरूवारपासून काश्मीर खोऱ्यातल्या उच्च माध्यमिक स्तरावरच्या सर्व शाळा आणि नऊ ऑक्टोबरपासून सर्व महाविद्यालयं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा आणि महाविद्यालयांनी बंद राहिलेल्या कालावधीसाठी कोणतही शुल्क विद्यार्थ्यांकडून घेवू नये असंही सरकारनं सूचित केलं आहे.
****

 जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणीला आज सुरूवात झाली. या प्रकरणी पुढील सुनावणी १४ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.  सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या एका पीठानं, या सर्व याचिका घटनापीठाकडे वर्ग केल्या आहेत. कलम ३७० हटवण्याच्या तसंच जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन करण्यासंदर्भात अनेक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. जम्मू काश्मीर आणि  लडाख  हे दोन्ही केंद्र शासित प्रदेश येत्या एकतीस ऑक्टोबरपासून अस्तित्वात येणार आहेत.
****

 बिहार राज्यात आलेल्या पुराचा आतापर्यंत अठरा जिल्ह्यांतल्या सोळा लाख लोकांना फटका बसला आहे. पाटणा बक्सर, भागलपूर, पूर्णिया, अररिया या जिल्ह्यांसह अनेक भागात मदत आणि बचावकार्य जोरात सुरू आहे.
****

 वर्ष २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयानं निकाल देतांना या प्रकरणाची सत्र न्यायालयातली सुनावणी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली होती. त्यानंतर ती सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
****

 विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आज आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यात पक्षाचे नेते राज्य सचिव नरसय्या आडम यांना सोलापूर मध्य मधून तर कळवण इथून विद्यमान आमदार जे. पी. गावित, नाशिक पश्चिम मधून डॉ. डी. एल. कराड आणि डहाणू इथून विनोद निकोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****

 यंदाची निवडणूक पर्यावरण स्नेही निवडणूक म्हणून केंद्रीय आयोगाने जाहीर केली असून त्यामुळेच प्लॅस्टिकचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने करू नये असं आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ . दीपक म्हैसेकर यांनी आज पुण्यात केलं . पुणे आकाशवाणी केंद्राच्या वृत्त विभागांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आकाशवाणीच्या राज्यभरातील अंशकालीन वार्ताहरांच्या राज्यव्यापी कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. आकाशवाणीच्या प्रधान महानिदेशक इरा जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. डॉ.म्हैसेकर यांनी आपल्या भाषणात प्रामुख्यानं आदर्श आचार संहितेबद्दलची सविस्तर माहिती दिली. अस्तित्वात असलेल्या कायद्याचं तंतोतंत पालन म्हणजेच आदर्श आचारसंहिता असं ते म्हणाले. निवडणूक काळात आकाशवाणीच्या वार्ताहरानीं निःपक्षपातीपणे वार्तांकन करावे अशी अपेक्षा इरा जोशी यांनी यावेळी व्यक्त केली .  
****

 विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेली तीस वर्ष ते या मतदार संघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची पाटील यांची ही सातवी वेळ आहे.
****

 महात्मा गांधींजीच्या उद्या साजऱ्या  होत असलेल्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतिनिमित्त चित्रपट विभाग भारत पर्यटनाच्या सहयोगातून उद्यापासून सहा तारखेपर्यंत मुंबईत गांधी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करणार आहे. महोत्सवात गांधी, द मेकिंग ऑफ महात्मा आणि मैने गांधी को नही मारा हे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.
****

 भारतीय सेनेची सुश्रुशा सेवा एमएनएस आज आपला चौऱ्यान्नववा स्थापना दिवस साजरा करत आहे. या अनुशंगानं भारतीय सेनेचे सर्व संबंधित अधिकारी देशभरातल्या आपल्या रूग्णांना निस्वार्थ सेवा देण्यासाठी शपथ घेत आहेत.
****

 अन्नू राणी हिनं कतारमधील दोहा इथं सुरू असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अशी कामगिरी साधणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. अंतिम फेरी आज होणार आहे.
****

 भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या महिलांच्या ट्वेंटी- ट्वेंटी क्रिक़ेट मालिकेतला चौथा सामना आज सायकांळी सात वाजता सूरत इथं खेळला जाणार आहे. भारत पाच सामन्यांच्या मालिकेत एक शून्यनं पुढं आहे. पावसामुळं दोन सामने खेळले गेले नाहीत.
*****
***

No comments:

Post a Comment